Wednesday 31 May 2023

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे रत्नागिरी येथे गोशाळेला मदतीचा हात !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे रत्नागिरी येथे गोशाळेला मदतीचा हात !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              शिवसेना नेते व माजी केंद्रीय कॅबिनेट अवजड उघोगमंत्री / माजी खासदार श्री.अनंत गीते साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे शिरसाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे कामधेनू गोमाता रक्षण जीवदाई सेवा संगोपन संस्था या गोशाळेला गाईंच्या औषधोपचारासाठी रूपये ११,१११/- रोख रक्कम व गाईंसाठी चारा देऊन मदत करण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक सरपंच श्री. सिध्दार्थ गमरे, ग्राम-अध्यक्ष श्री.महेंद्र चव्हाण व मायेची सावली एकहात कर्तव्याचा या सथेचे संस्थापक/अध्यक्ष श्री.यशवंत खोपकर, सचिव श्री.प्रमोद चौंडकर, संचालक श्री.सदाशिव लाड़, खजिनंदार श्री.संदीप चांदिवडे, सहखजिनदार श्री.श्रीकांत चिंचपूर / श्री दौलत बेल्हेकर, कार्यकारणी सदस्य श्री.वसंत घडशी / श्री विनायक जाधव या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत गोशाळेचे संस्थापक श्री.वसंत वाजे यांना गोशाळेसाठी मदत करण्यात आली.या उपक्रमचे ग्रामीण भागात कौतुक होत असून मुक्या प्राण्यांना मदत करणाऱ्या सर्व मान्यवर यांचे आभार व्यक्त करत यानिमित्ताने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

स्फूर्ती फाउंडेशन आयोजित - एक दिवसीय शासकीय योजना व भारत सरकार पोस्ट कार्यालय योजना शिबिर !!

स्फूर्ती फाउंडेशन आयोजित - एक दिवसीय शासकीय योजना व भारत सरकार पोस्ट कार्यालय योजना शिबिर !!

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी*

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना व भारत सरकार पोस्ट कार्यालय योजना शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ११ जून 2023, वेळ सकाळी १० ते २ या वेळेत ठिकाण- शंकेश्वर प्रसिडेन्सी बिल्डिंग १/ए विंग, टावरीपाडा, आर.टि.ओ.जवळ,कल्याण पश्चिम येथे करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये विधवा महिलांसाठी तसेच नागरिकांसाठी संजय गांधी, बालसंगोपन, श्रावण बाळ, माझी कन्या भाग्यश्री योजना पोस्ट कार्यालयाच्या सुकन्या समृद्धी योजना, महिला बचत योजना, आरोग्य विमा योजना, महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना, ई श्रम कार्ड योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व विधवा महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी स्फूर्ती फाउंडेशन व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे या योजनेसाठी आवश्यक गुगल फाॅर्म भरण्यासाठी, 7977728435  नंबर वर महिलेचे नाव,वय, मोबाईल, पत्ता,२ पाल्यांचे नाव, इयत्ता, वय ,शाळेचे नाव पाठवावे त्यानुसार आपल्याला आवश्यक कागदपत्रे व फॉर्म ची माहिती देण्यात येईल अशी माहिती "स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व सदस्य शिल्पा तांगडकर" यांनी केली आहे तसेच जास्तीत जास्त विधवा महिलांनी व  नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा व इतर नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आव्हान बजरंग तांगडकर यांनी केले.

श्री क्षेत्र वेरूळ येथे वीर शैव कक्कया समाजाच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

श्री क्षेत्र वेरूळ येथे वीर शैव कक्कया समाजाच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर ) :
              वीर शैव कक्कया समाज सेवा मंडळ, वेरूळ, ता. खुलताबाद यांनी श्री क्षेत्र वेरूळ येथे इयत्ता ८ वी ते १०वीच्या विध्यार्थीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करून स्थानिक व समाजातील विचारवंत यांना निमंत्रित केले होते. 

          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.भोलेनाथ गणपतराव मुने, श्री.डॉ. पाटणी, श्री.जितेंद्र तांदळे, श्री.दिलीप नारद (पी.एस.आय), श्री. सूर्यकांत इंगळे (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघ) तसेच विशेष निमंत्रित श्री पंकज पाटेकर, श्री किरण नरहिरे, सौ रंजना शिंदे, सौ.ज्योती इंगळे, श्री.सुरेश खरात, तसेच निमंत्रित शिक्षक श्री.लक्ष्मण जाधव, श्री.अमोल भगवान सोनटक्के, श्री.कचरू डहाके, श्री. सुरेश त्रिबके व इत्तर शिक्षक उपस्थित होते. शनिवारी सकाळी श्री वीर शैव संत कक्कया महाराज यांची प्रतिमा पूजन तसेच द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री पुंडलिक वाघ (गुरुकुल चालक) यांनी विदयार्थाची शैक्षणिक वाटचाल व शिक्षण पद्धती तसेच श्री दिलीपराव भिवाजी नारद साहेब (पो. नि.) यांनी शिक्षण व संस्कार यावर बहूमोलाचं मार्गदर्शन केले. तसेच सूर्यकांत इंगळे यांनी विद्यार्थी शिक्षण व उद्योग यावर सविस्तर ज्ञान दिले.

              श्री भोलेनाथ गणपतराव मुने यांनी सामाजिक उत्कर्ष व शिक्षणाचे महत्व विषद केले.श्री दिलीप इंगळे यांनी शिक्षणातील नवोदय विद्यालयाचे महत्व व शिक्षण यावर उपयुक्त माहिती दिली. ऍड. सर्जेराव साळवे यांनी समाज प्रबोधन व भविष्यातील शिक्षण यासह संविधानाचे महत्व सांगितले. श्री शरद बापूराव इंगोले यांनी आजच्या युगातील व्यवसाय व उद्योजकता या विषयावर सखोल ज्ञान दान केले.रविवारी सकाळी श्री वीर शैव संत कक्कया महाराज प्रतिमा पूजन आणि द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ह. भ. प. श्री नारायण महाराज कोरडे यांनी पर्यावरण व सामाजिक जीवन या अंतर्गत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ व मनुष्य जीवनावर उत्तम असे विवेचन केले. ह. भ.प श्री भाऊसाहेब महाराज वाकळे यांनी समाज जीवन व जीवनातील कुशलता यावर उत्तम विचार प्रकट केले. श्री विलास नारायने यांनी शिक्षण व सामाजिक सहकार्य हिच प्रगतीची दिशा असे विचार दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अति सुंदर स्वरूपात वि. क. स. सेवा मंडळाचे सचिव श्री अशोक पाटेकर यांनी मोठया कुशलतेने करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. मंडळाचे अध्यक्ष राधाकिसन सोनाजी त्रिबके यांनी आपले सामाजिक विचार प्रगट करून उपस्थित मान्यवर व समाज बांधवाचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी श्री दादाराव खाटीकमारे, श्री अशोक खाटीकमारे, श्री संदीपान पाटेकर, श्री सोमनाथ इंगळे, श्री महादेव इंगोले आणि श्री माणिकराव सोनटक्के आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

सौ.पूर्वा लवू धावडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित !!

सौ.पूर्वा लवू धावडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित !!

लांजा, (केतन भोज) ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आज जयंती निमित्त कोचरी येथील सौ. पूर्वा लवू धावडे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२३-२०२४ या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार गौरव सोहळा ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कोचरी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. 

यावेळी या कार्यक्रमाला कोचरी गावचे माजी सरपंच तथा समाजसेवक वसंत बेंद्रे तसेच लवू धावडे व ग्रामसेवक उपस्थित होते. सौ.पूर्वा लवू धावडे यांनी कोरोना काळात देखील आशा सेविका म्हणून चांगले अभिमानास्पद कार्य केले आहे. पूर्वा लवू धावडे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठपुराव्यातुन समेळगाव स्मशानभूमीत सुशोभिकरण व लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम पुर्ण महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता नाईक यांच्या हस्ते उध्दघाटन संपन्न !!

बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्या पाठपुराव्यातुन समेळगाव स्मशानभूमीत सुशोभिकरण व लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम पुर्ण महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता  नाईक यांच्या हस्ते उध्दघाटन संपन्न !!

वसई, प्रतिनिधी : अनेक वर्षापासुन रखडलेल्या स्मशानभुमी शेडचे काम बाळासाहेबांची शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटक सौ रूचिता नाईक यांच्या प्रयत्नातुन आज पुर्ण झाले. मरणपावलेल्या व्यक्तीवर चांगल्या वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत अशी आप्तेष्ठांची अपेक्षा असते. मात्र अस्वच्छता, लाकडे ठेवण्यासाठी कोणतेही शेड नव्हते,  अर्धवट  विद्युत शवदाहिनेचे काम, पडक्या भिंती, पिण्याच्या पाण्याची  अपुरी व्यवस्था अशा अनेक समस्यांमुळे समेळगाव परिसरातील स्मशानभूमींची दूरवस्था झाली होती यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागत होता . स्मशानभूमीसाठी लाखो रुपये दरवर्षी महापालिकेतर्फे खर्च केले जातात मात्र प्रत्यक्षात स्मशानभूमीत विकासकामेच झाली नसल्याचे समोर आले होते. मग हा पैसा कुठे जातो. 

स्मशानभूमीत लाकडे ठेवण्यासाठी कोणते हि शेड नसल्याने पावसाळ्यात ओले लाकडे असल्याने 2 दिवस सतत टायर ऑईल टाकुन अत्यंसंस्कारासाठी वेळ लागायचा याबाबत शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी स्मशानभूमीचा कामासाठी महानगरपालिके समोर आमरण उपोषण केले होते याची दखल घेत महानगरपालिकेच्या वतिने स्मशानभूमीतील कामास सुरूवात केली व लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम पुर्ण झाले, आज स्मशानभूमीतील लाकडे ठेवण्यासाठी शेडचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उपशहरप्रमुख आनंद नगरकर, उपशहरप्रमुख महेश निकम, उपविभाग प्रमुख महेंद्र पाटील, उपशाखा प्रमुख अभिषेक गोरूले, विद्यार्थी सेना प्रमुख अभिषेक गायकवाड उपस्थित होते.

Tuesday 30 May 2023

मनरेगा बचाओ ग्रामीण भारत बचाओ भारतीय खेत मजदुर युनियनची जंतर मंतर धरणे !!

मनरेगा बचाओ ग्रामीण भारत बचाओ भारतीय खेत मजदुर युनियनची जंतर मंतर धरणे !!

दिल्ली, प्रतिनिधी.. भारतीय खेत मजदुर युनियन यांच्या लाल झेंडे हाती घेऊन देशातील हजारो शेतमजुरांनी भारतीय पार्लमेंट समोर मनरेगा बचाव ..ग्रामीण भारत बचाओ यासाठी जोरदार धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनाचे नेतृत्व नेते सर्वश्री काँ अध्यक्ष पेरीया स्वामी, सचिव गुलजार सिंग गोरिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष जानकी पासवान, माजी खासदार नागेंद्रनाथ ओझा, माजी खासदार के .ई. इस्माईल राष्ट्रीय सचिव वी एस निर्मल आदींनी केले .

 *कॉ डी .राजा यांचा सरकारला  इशारा*

या धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड डी राजा यांनी पक्षाचा पाठिंबा दिला. त्यात पाठिंबापर भाषणात ते म्हणाले की, 2006 साली डाव्या पक्षांच्या पाठपुराव्याने युपी मनमोहन सिंग सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा केला त्यामुळे देशातील करोडो ग्रामीण शहरी  मजुरांचे हाताला काम मिळाले, परंतु गेल्या नऊ वर्षापासून सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने मात्र गरिबांचा योजनांवर जे हल्ले केले, त्या मध्ये मनरेगा वर सुद्धा हल्ला केला आहे. या योजने अंतर्गत यावर्षी 32 टक्के निधी कमी देण्यात आला असून सोशल ऑडिट नसल्यामुळे भ्रष्टाचारही खूप आहे. त्यामुळे मजुरांना खूपच कमी काम मिलते शहरी भागातील मजुरांना सुद्धा मनरेगा अंतर्गत कामाचे प्रावधान आहे परंतु त्यांना कामच मिळत नाही..यासाठी देशभरातील शेत मजुरांनी गाव शहर पातळीवर संघर्ष करावा. असे सांगून सध्याचे मोदी सरकार हे सबका साथ सबका विकास सबका विश्वास वगैरे गप्पा मारत असून ते  म्हणजे  मायबाप सरकार आहे असे समजणे म्हणजे गैरसमज आहे. मोदी सरकार हे फक्त दोन-तीन कार्पोरेट घराण्याचे सरकार असून  देशातील कष्टकरी.. शेतकरी जनतेचे विरोधातील सरकार आहे. सांगून या सरकारचे वर्तन संविधान विरोधात चालले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना लोकसभा उद्घाटनास बोलवण्याचे अवचित्य सुद्धा दाखवले नाही. असे सांगून प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात एकदाही संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ते सरकार सत्तेवरून घालवणे जरुरीचे आहे म्हणून भाजप सरकार हटाव.. देश बचाव लढा पुढील काळात तीव्र करावा लागणार आहे. ते पुढे असेही म्हणाले की, गरीब जनतेच्या विरोधात वागणारी कोणतीच सरकारे टिकली नाहीत.तेव्हा मोदी सरकारची सुद्धा गच्छंती अटळ आहे असा इशारा केंद्र सरकारला दिला. या धरणे आंदोलनाला आयटक सचिव कॉम्रेड सुकुमार दामले यांनी पाठिंबा देताना सांगितले की, कामगारांना कायद्यानुसार 16 हजार रुपये पगार आहे. परंतु आठ हजार रुपये मिळतात कुठे? याबाबतीत सरकारचे संरक्षण? ऑल ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष तिरुमला रामन यांनीही पाठिंबा दिला.
*नेत्यांची भाषणे*

प. बंगालचे सचिव तपण गांगुली म्हणाले की, बंगालमध्ये तर मनरेगाचे सात हजार कोटी रुपये खर्च न करता पडून राहिले.

या धरणे आंदोलनात मनरेगा बचाव साठी प्रस्ताव तयार करण्यात आला त्या प्रस्तावात पुढे म्हटले आहे की, हीच अवस्था देशांमध्ये सर्वत्र कमी अधिक प्रमाणात असून शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे त्यांना सामाजिक संरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क असून या हक्कांचे संरक्षण करावे आंदोलनात मनरेगा कायद्याअंतर्गत 200 दिवस कामाचे आम्ही सहाशे रुपये वेतन, प्रत्येक घरात पती पत्नी याना जाब कार्ड ध्या .55 वर्षे वरील शेतमजुरांना पाच हजार रुपये पेन्शन मिळावा. आणि भरिव निधीची तरतूद करावी. असे नमूद करण्यात आले तो ठराव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पेरिया स्वामी व सचिव गुलजारसिंग गोरीया यांनी शेतमजुरांसमोर अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषेत आपल्या भाषणात समजून सांगितला व त्या ठरावाची कॉपी राष्ट्रपती महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मु यांना सादर करण्यात आली.. या धरणे आंदोलनात राज्या राज्यातील नेत्यांनीही आपले मते व्यक्त केले.. त्यावेळी तडाखे बंद भाषण करताना उत्तर प्रदेशचे शेतमजुर युनियनचे राज्य सचिव फुलचंद यादव म्हणाले की, योगिंचे राज्यात कष्टकरांचा आंदोलनाला परवानगी मिळत नाही .वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी विशिष्ट वर्णतील आहेत त्यामुळे आंदोलनाला परवानगी मिळणे अशक्य झाले आहे. . किसान सभेचे अध्यक्ष का. के व्यंकय्या यांनी लढेंगे जितेंगे या निरधारासह शेतकरी शेतमजुरांना त्रासदायक  मोदी सरकार सत्तेवरून घालवावे असे आवाहन केले.

याशिवाय धरणे आंदोलनात ज्यांनी मार्गदर्शन केले त्यात माजी खासदार के ई इस्माईल, कॉम्रेड जानकी पासवान, बिहारचे आमदार सूर्यकांत पासवान,,मध्य प्रदेशचे सचिव कैलाश कुशवाह, महाराष्ट्र चे सचिव कॉ. अमृत महाजन पंजाब..चे  तसेच दक्षिणेकडील राज्यातील पदाधिकारी नेत्यांचा सहभाग होता. 

*महाराष्ट्रातील जंगल गायरान जमिनी हिस्कवण्याचे प्रयत्न तेथील सरकार करीत आहे याबाबत सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती  का महाजन यांनी आपल्या भाषणात केली. शेतमजुरांच्या रोटी, कपडा, मकान, रोजगार मोफत शिक्षण या हक्कांवर गदा आणल्यास शेतमजूर सहन करणार नाही असा इशारा दिला* 

खडुळ तलाव अमृत सरोवर अभियान अंतर्गत तलाव सुशोभीकरण कामाला सुरवात !

खडुळ तलाव अमृत सरोवर अभियान अंतर्गत तलाव सुशोभीकरण कामाला सुरवात !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद पालघर, नरेगा विभाग पंचायत समिती जव्हार टाटा मोटर्स आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी अंतर्गत खडुळ तलाव अमृत सरोवर अभियाना अंतर्गत तलाव  सुशोभीकरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सध्या पूर्ण तलावाला दगडांच्या पीचींगचे काम चालू झाले असून अजून सुसोभीकरणाची बरीच कामे चालू होणार आहेत या कामातून सुशोभीकरण होऊन हा तलाव लवकरच पर्यटनासाठी साठी खुला करून दिला जाणार आहे. त्यामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल.

म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर !

म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्राम पंचायत म्हारळ च्या उपसरपंच सौ अश्विनी निलेश देशमुख यांच्या विरोधात दाखल केलेला  अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला,यावेळी तहसीलदार जयराज देशमुख यांनी निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

तहसीलदार जयराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच सौ. अश्विनी निलेश देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणेसाठी विशेष सभा आज आयोजित केली होती. यावेळी सूचक दिपक वामश अहिरे तर अनुमोदन विकास गोपाळ पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सभेत उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला, ठरावाच्या बाजूने १२ सदस्यांनी सहमती दर्शवली, यामध्ये. 
निलिमा नंदू म्हात्रे ,सरपंच 
. प्रमोद देशमुख, सदस्य 
. लक्ष्मण गोविंद काँगेरे सदस्य, 
. दिपक वामन आहिरे  
. योगेश देशमुख, सदस्य 
. विकास पवार सदस्य  
. सौ. मोनिका मुकेश गायकवाड, सदस्य 
. सौ. नंदा पांडुरंग म्हात्रे,सदस्य 
. सौ. अमृता महेश देशमुख, सदस्य. 
. सौ. बेबी दत्तू सांगळे, सदस्य 
. श्रीमती. मंगला सिद्धार्थ इंगळे, सदस्य 
. अनिता बाळकृष्ण देशमुख, सदस्य.
यांचा समावेश आहे तर अश्विनी देशमुख, किशोरी वाडेकर, वेदिका गंभीरराव, आणि प्रगती कोंगिरे हे सदस्य गैरहजर राहिले. यातील प्रकाश चौधरी यांचे सदस्य पद रद्द झाल्याने आता १२ विरुद्ध ४अशी स्थिती म्हारळ ग्रामपंचायत मध्ये निर्माण झाली आहे. आजच्या उपसरपंचा विरोधातील अविश्वास ठरावामुळे कल्याण तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत भाजपा व मुख्यमंत्री शिंदे यांच्या  गटाच्या एकहाती अमलाखाली आली आहे. आता उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते लवकरच स्पष्ट होईल. आजच्या या अविश्वास ठरावामुळे भाजपाच्या व शिंदे गटात आनदांचे वातावरण पसरले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ तर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर सह मोफत वह्या वाटप आणि जेष्ठ नागरिकांना छत्री वाटपचे आयोजन !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ तर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर सह मोफत वह्या वाटप आणि जेष्ठ नागरिकांना छत्री वाटपचे आयोजन !

मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
             शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ आणि मुंबई युथ असोसिएशन (एन.जी.ओ ) तर्फे उपविभाग प्रमुख मा.श्री. दामोदर म्हात्रे यांच्या वाढदिवसनिमित्त भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर सह मोफत वह्या वाटप आणि जेष्ठ नागरिकांना छत्री वाटपचे आयोजन गुरुवार दि.१ जून २०२३ रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत साईकृपा गार्डन, म्हात्रे वाडी, राम नगर, बोरिवली (प.) येथे करण्यात आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ शाखा प्रमुख सचिन दामोदर म्हात्रे, म.शा. संघटक सौ. प्रियंका करलकर तसेच मुंबई युथ असोसिएशन (एन.जी.ओ) अध्यक्ष वैभव दामोदर म्हात्रे, उपाध्यक्ष अशरफ शेख, संदीप मेहता, सेक्रेटरी विरल दोषी, खजिनदार नितीन देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तरी विभागातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१५ चे सर्व महिला शाखा संघटक, समस्त महिला, युवती, युवक, पुरुष शाखा समन्व्यक, ग्राहक सं. कक्ष शाखाध्यक्ष, विधानसभा समन्व्यक, युवा शाखाधिकारी, सर्व उप शाखाप्रमुख, महिला उप शाखा संघटक आणि समस्त महिला /पुरुष गटप्रमुख, युवा सेना, भा. वि. सेना पदाधिकारी, सर्व महिला /पुरुष, युवा /युवती पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी केले आहे.

कापूस खरेदी फेडरेशन सुरू करा किसान सभेची मागणी !!

कापूस खरेदी फेडरेशन सुरू करा किसान सभेची मागणी !!

* शेतकरी करणार कपास फेको आंदोलन*

चोपडा,, प्रतिनिधी.. यावर्षी कापूस फेडरेशन सुरू नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस अत्यंत कवडी मोलाने मागत आहेत.. सध्याच्या व्यापारी देत असलेला भाव कापसाची लागवडीला येणारा खर्च पाहता अत्यंत भाव तुटपुंजा आहे. जर फेडरेशन चालू राहिले तर मग खुल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू मिळतो. खरीप हंगाम लागवडीला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही, दुसरीकडे ऑस्ट्रेलियाहून शेतकऱ्यांच्या विचार न करता कापसाच्या गाठी खरेदी करून या सरकारने आणून ठेवलेले आहे त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक कोंडी मध्ये सापडलेला आहे. कपाशीचे उत्पन्न हे शेतकऱ्यांवरील कर्ज फेडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे आणि म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर तरी सरकारने फेडरेशन चालू करावे व हमीभाव मध्ये कापूस खरेदी करावा अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा कपाशीला भावने मिळाल्यास शेतकरी रस्त्यावर "*कपास फेको*" आंदोलन करतील असा इशारा अखिल भारतीय किसान सभेतर्फे रमेश पाटील, संजू पाटील, राजाराम पाटील, दुकानदार धोंडू पाटील, कॉ. शांताराम पाटील, अनंता चौधरी, सुकलाल सोनू कोळी, आसाराम कोळी, कॉ. अमृत महाजन आदींनी केली आहे

Monday 29 May 2023

किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब

किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब 

*अनिल परब यांच्याकडून किरीट सोमय्या यांचा समाचार*


मुंबई, प्रतिनिधी : दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे. विनापरवाना रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात आले आहे. तसेच रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आघाडी सरकार असताना हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले होते. हरित लवादाकडेही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. हरित लवादाने यात तथ्य नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली. यानंतर दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाची हरित लवादाकडील याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली. 

अनिल परब यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही असे मी सातत्याने सांगत होतो. मात्र मला दोन वर्ष बदनाम करण्यात आले. आता प्रकरण अंगलट येणार असे, लक्षात येताच माघार घेतली. सोमय्यांनी पळवाट काढली असली तरी एकवेळ नाक घासून माफी त्यांना मागावीच लागेल किंवा शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा द्यावा लागेल, असे परब म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा बैठक संपन्न !!

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा बैठक संपन्न !!


मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्वपूर्ण असे निर्देशही दिले. ते म्हणाले, आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजीटल मॅपींग करा. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

तसेच आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. वीज पुरवठा सुरळीत राहील याची महावितरणने काळजी घ्यावी. एनडीआरएफ, एसडीआरफशी संपर्क-समन्वय राखा. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहा.  राज्यातील सर्वच महापालिकांनी, नगरपालिका यांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.

महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरआफच्या बरोबरीनेच या तीनही दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केल्याचे आणि उत्तम कामगिरी बजावल्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत असे सांगितले.

रब्बीच्या बाजरीच्या शेतात थप्पीच्या थप्पी भाव गडगडले ; खरिपाच्या पेरणीची चिंता !

रब्बीच्या बाजरीच्या शेतात थप्पीच्या थप्पी भाव गडगडले ; खरिपाच्या पेरणीची चिंता !

सोयगाव, बाळू शिंदे, ता.. ३० कपाशी पाठोपाठ आता रब्बीच्या ज्वारी व बाजरी पिकांनाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, पंधरा दिवसांवर खरिपाच्या हंगाम डोक्यावर येवून ठेपला परंतु कपाशी अद्यापही घरात असताना रब्बीच्या बाजरीलाही भाव मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहे, दरम्यान सोयगाव तालुक्यात रब्बीच्या बाजरीची काढणीची कामे सोयगाव शिवारात सुरू आहे, शेतात मात्र बाजरी च्या थप्पीच्या थप्पी लागून आहे, भाव नसल्याने बाजरी चे उत्पन्नही कापसाप्रमाणे घरात ठेवण्याची वेळ आली आहे.
    मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळीच्या पावसामुळे सोयगाव तालुक्यात रब्बीच्या ज्वारी व बाजरी पिकांची काढणी लांबणीवर गेली होती, त्यामुळे आगामी खरिपाच्या पूर्वतयारी ची चाहूल लक्षात घेताच शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांची काढणीची कामे हाती घेतली आहे, भर उन्हात बाजरी व ज्वारी काढणी सुरू आहे परंतु भाव नसल्याने काढणी करण्यात आलेल्या बाजरी च्या पिकांची थप्पी घरात साठवून ठेवावी लागत आहे, शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतात माल पिकवून घरात साठवून ठेवणे हे आता नित्याचे च झाले आहे, शेतकऱ्यांचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असे नेहमी म्हणणाऱ्या सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांना कधीही शेतकऱ्यांचा शेती माल दिसत नसून सन २०२३ हे वर्ष पौष्टिक तुर्णधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा नुकताच निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र पौष्टिक तृणधान्य वर्षात तृणधान्य ला भाव मिळत नाही.

----खरिपाच्या पेरणीची चिंता __
आगामी खरिपाच्या पेरण्या चे दिवस डोक्यावर आले आहे परंतु शेतकऱ्यांच्या खिशात दमादीही नाही, त्यामुळे आगामी पेरण्या कशा करावयाची अशी चिंता भेडसावत असून मे महिन्यात च वातावरणात बदल झाल्याचे पहावयास मिळत आहे, त्यामुळे यंदा मॉन्सूनच्या पाऊस वेळेवर येण्याची चिन्हे हवामान विभागाने वर्तविला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरण्याची लगीनघाई सुरू आहे परंतु बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक मदत मिळत नाही.

Sunday 28 May 2023

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये पुतळ्याचे अनावरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मॉरिशसमध्ये पुतळ्याचे अनावरण !


डोंबिवली, प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १४० वी जयंती आहे. त्यानिमित्त मॉरिशसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन मॉरिशसमध्ये संपन्न होतंय. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी सावरकरप्रेमींमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला.

जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन !!

जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

बाळासाहेब पाटील (आय पी एस) पोलीस अधिक्षक पालघर यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियान अंतर्गत महिलांना बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी जनजागृती करण्यासाठी २७ मे २०२३ शनिवारी रोजी सकाळी ११.३० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथील सभागृहात सामाजिक बांधिलकी जपत बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह केल्याने महिलांवर होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हे पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाच्या वेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.अनिता पाटील व पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांनी तांत्रिकदृष्ट्या बालविवाहाचे तोटे किती याची शास्त्रोक्त तसेच बालविवाह मुळे होणारे कुपोषण समस्या, सध्याची जव्हार तालुक्यातील लहान बालकांची स्थिती, महिलांचे आजार, बालविवाह प्रतिबंध कायदा, आदिवासी भागातील पारंपरिक लग्नपद्धती व त्यामुळे होणारे बालविवाह याविषयी सखोल असे आपल्या अनुभवातून आदिवासी बोली भाषेतुन महिलांना मार्गदर्शन केले, त्यानंतर पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी संपूर्ण जिल्हाभरात बालविवाह होऊ नये आणि लग्न समारंभात खर्च करण्याच्या दृष्टीने स्पर्धा करणे किती निरर्थक आहे याचे अनेक उदाहरणे दिली, शिवाय महिलांनी इकडचा विषय तिकडे करण्यापेक्षा बालविवाह रोखण्यासाठी असणारे कायदे व कलमांची माहिती दिली तर बालविवाह रोखण्यास मदत होईल असे बोलताना सांगितले. आपल्या मुलीचे वय वर्ष २१ झाल्याशिवाय लग्न करू नये असे ठाम पणे सांगितले.

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की माता आणि सुदृढ बालक हे या देशासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही फक्त पोलिसांची नाही, तर तुमच्या आमच्या सगळ्यांचीच आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात बालमृत्यू आणि कुपोषण यावर यशस्वीपणे मात करता येईल, याकरिता पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, राजकीय पुढारी, पत्रकार आणि महिला वर्ग व सुशिक्षित तरुण यांनी एकत्र येऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावे आणि ही बाब एका बंधनात बंधिस्त व्हावी याकरिता सर्वांना बालविवाह रोखण्याची शपथ दिली.

या कार्यक्रमाला खेड्यापाड्यातील आदिवासी ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्त्रियांचे आरोग्य केंद्रस्थानी ठरवीत आपणही आपापल्या गावपाड्यात बालविवाह रोखण्यास मदत करू असा निश्चय यावेळी करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी युवा उद्योजक कॅप्टन विनीत मुकणे संत रोहिदास चर्मकार आयोगाचे सदस्य, स्त्री रोग तज्ञ डॉ.अनिता पाटील, उपजिल्हा रुग्णालय जव्हार चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक-बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, जव्हार पोलीस निरीक्षक सुधीर संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेरराव, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, विविध स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी व इतर महिला भगिनी व नागरिक मोठ्या उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी देवीदास पाटील यांनी केले.

जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल थेतले !!

जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल थेतले !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जामसर ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विठ्ठल थेतले यांनी बाजी मारत थेट 682 मते मिळवीत पाचव्यांदा विजय प्राप्त केला आहे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले यांचे पती असून त्यांनी ग्रामस्थान मंडळात विकास कामाचे जोरावर सलग पाचव्यांदा निवड करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी  जव्हार तहसील यांनी विजयी घोषित केले, ग्रामदान मंडळाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी जामसर येथे पार पडली, या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सोनू खुताडे भाजपाकडून विठ्ठल थेतले यांच्यात लढत होती, ग्रामदान मंडळ असल्याने या निवडणुकीत गावकऱ्यांनी हात वर करून मते दिली.यात थेतले यांना ६८२ मते तर खुटाळे यांना २५२ मते मिळाली दरम्यान जव्हारच्या वकील संघटनेनै सुद्धा थेतले यांना पाठिंबा दिला वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न भोईर व इतर पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेखा थेतले जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत माजी सभापती सुरेश कोरडा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरिश्चंद्र भोये उपस्थित होते.

कोट
 जामसर ग्रामिण मंडळात १३ तेरा वर्ष सातत्याने काम करीत असून माझ्यावर पुन्हा एकदा लोकांनी विश्वास दाखवला आहे कोणत्याही भेदभाव न करता  कामे करीत आहोत तसेच नागरिकांनी दाखवलेल्या विश्वाला तडा जाऊन देणार नाही विकास कामे करतांना अनेक अडचणी आल्या तरीही कामे केली 

विठ्ठल थेतले  अध्यक्ष ग्रामदार मंडळ जामसर

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !

 कल्याण, नारायण सुरोशी : थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे जयंती दिनी आज महापालिकेतर्फे  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी उपस्थित डॉ. प्रतिभा पानपाटील, उपअभियंता भागवत पाटील, सहा. विक्रीकर आयुक्त प्रमोद बच्छाव, प्रा.प्रल्हाद चौधरी, उद्योजक विजय कदम, सामाजिक कार्यकर्ता पंकज सिंग व महापालिकेतील कर्मचारी वर्ग यांनी देखील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

तसेच महापालिका भवनातील, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर सभागृहातील  तैलचित्रासही महापालिका सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. 

महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली. 

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसार माध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी करत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिल्यांदाच आग्रा येथे नुकतीच साजरी करण्यात आली.

 
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र शासनातील मंत्री श्री.रावसाहेब दानवे-पाटील, श्री.कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. 

यावेळी सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना श्री शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जे योगदान आहे, त्याग आहे, ते सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते. ते साहित्यिक होते, समाजसुधारक होते आणि त्यांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे. आज या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होत आहे, हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा 140 कोटी लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले. तसेच श्री.मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केले, असे ही शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी घोषणा शासनातर्फे करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

एस.पी चॅम्पियन्स ट्रॉफी संपन्न !!

एस.पी चॅम्पियन्स ट्रॉफी संपन्न !!

"महिलामध्ये  सेंचूरिअन" तर "पुरुषामध्ये टर्फ मास्टर" ठरले  विजयी ___

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        सालाबाद प्रमाणे यंदाही एस.पी ग्रुप तर्फे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच राजीव गांधी मैदान, मुलुंड येथे करण्यात आले होते.महिला खेळाडू,युवा क्रिकेट पट्टूना एकत्र आणत जेष्ठ खेळाडूंचा अनुभव सोबत  घेत ९० खेळाडूंचा संच ९ संघामध्ये विभागून साखळी पद्धतीने स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात खेळविण्यात आली.
            प्रत्येक सामना रोमहर्षक होत गेले. पुरुष खेळाडूमध्ये राजा, बेनी, कुणाल शिंदे यांची अष्टपैलू कामगिरी, रविंद्र सावंत, अप्पी, राहुल, अनिकेत यांची फलंदाजी, आयुष, समीर गावडे, बादशहा शेख यांची भेदक गोलंदाजी तर महिलामध्ये विनायश्री गावकर, गुरुप्रीत कौर, विशाखा आचार्य यांची अप्रतिम खेळी मनात घर करून गेली. 
           लीग सामने संपल्यानंतर देखील टॉप २ चा थरार शेवट पर्यंत रंगला. महिलामध्ये पारसिक चॅम्पियन संघावार साखळी सामन्यात स्मशर्स संघाने विजय मिळवत जॉय -११ संघाला  पुढील फेरीत प्रवेश मिळवून दिला.अंतिम सामन्यात मीनल  चोप्रा यांच्या सेन्चुरिअन संघाने डॉ.कृती बाठीया यांच्या जॉय - ११ संघावर  एकतर्फी लढतीत विजय मिळवत मानाचा चषक पटकवला. 
                पुरुषामध्ये  अंतिम सामन्यात मनन महाडिक  यांच्या टर्फ मास्टर संघाने दिलेले ३० धावांचे आव्हान मंदार  नाईक यांच्या वीरा जिजाचे मावळे संघाला गाठता आले नाही. त्यामुळे टर्फ मास्टर संघाने  विजयी चषक आपल्या नावावर  केला. शेवटचा चेंडू पडेपर्यंत वैयक्तिक पारितोषिक कोणाला मिळतील याची चुरस कायम होती. यामध्ये मालिकविराचा पुरस्कार अनुक्रमे प्रेरणा घाग / मनन महाडिक, सर्वोत्तम फलंदाज श्रुतिका कदम /तनय  महाले, सर्वोत्तम गोलंदाज सनील कोळी / शिल्पा गायकवाड ,सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अक्षदा परवते /रवी पवार तर सर्वोत्तम लक्षणीय खेळाडू बेनी / रोशनी सिंग ठरले.
           सदर  स्पर्धा यशस्वी ठरण्यासाठी  अध्यक्ष श्री.समीर मांजरेकर,संदेश पाटील,मेघश्याम  होडावडेकर,माया धुरी ,माधुरी मोरे,राज गोल्लर,राजेश महाडिक ,आशुतोष  चाळके यांनी सहकार्य केले.

Saturday 27 May 2023

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त...

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त...



वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला .त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते .ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते .लहानग्या सावरकरांनी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात येण्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातन्त्रतेसाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेंन अशी शपथ घेतली.सावरकरांनी जोसेफ मॅझिनीयांच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडन ला गेले.

लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात असे सांगितले. पॅरिस हुन लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली होती . पुढील खटला भारतात चालवला जावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी घेतली पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून भारतात आणले.नाशिकला अनंत काणेकर यांनी नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणले इथे त्यांच्या वर खटला भरण्यात आला. त्यांना जन्मठेप म्हणून काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळविण्यासासाठी त्यांनी तब्बल 11 वर्षे छळ सहन करून देखील त्यांच्यात देश साठी करण्याची जिद्द होती. त्यांनी काळ्यापाण्यात असताना तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.

त्यांनी तुरुंगात काळे पाणी असे पुस्तकाचे लेखन देखील केले.त्यांचे गीत " ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे आजतायगत लोकांचा मनात अजरामर आहे.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानापन्न केले.त्यांनी हिंदूंच्या समाजाला संघटित करण्यासाठी अनेक कार्य केले.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली .त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालय सुरू केले जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचे आयोजन केले. पतितपावन या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश देणे सुरु केले.हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि भारत छोडो चळवळीचा भाग बनले.हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी जातिभेदाचा विरोध करणारे. क्रांतिकारक, भाषा शुद्धी लिपिशुद्धी, साहित्य प्रचारक असे अनेक पैलूंचे धनी होते. सावरकरांना ''स्वातंत्र्यवीर सावरकर ''अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.

त्यांनी अन्न आणि औषध वर्ज्य केले त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.24 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते अनंतात विलीन झाले. 

लेखन - नारायण सुरोशी 

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, प्रतिनिधी : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज केले.

दिल्लीतील प्रगती मैदान येथे नवीन संम्मेलन सभगृहात नीति आयोगाच्या आठव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

या परिषदेत राज्याच्या वतीने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विकसित भारत @2047 संकल्पनेचा स्वप्न साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध असून, आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन केले. शेतकरी, महिला आणि तरूण हे राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचीही ग्वाही दिली.

कृषी कल्याण
शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. त्यांच्या उत्थानासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून, शेतकऱ्यांसाठी या बैठकीत विचार मांडताना    श्री. शिंदे म्हणाले की, कृषी कल्याण, महिला सक्षमीकरण व युवा कल्याण तसेच सर्व वर्गांच्या कल्याणासाठी राज्य वचनबध्द  असून,  शेतक-यासांठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला (PMKSNY) पूरक म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अतिरिक्त निधी रु. 6000 प्रति शेतकरी दिला जात आहे.यातून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMCIY) मध्ये शेतकऱ्यांच्या वाट्यासाठी राज्य विम्याचा हप्ता भरत आहे.शेतक-यांना PMCIY पोर्टलवर रु. 1/- नाममात्र शुल्क भरून नोंदणी करण्याबाबतची माहिती दिली.

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये  ‘लेक लाडकी' योजनेचा समावेश आहे.ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 18 वर्षे वयापर्यंत रोख अनुदान दिले जाईल. राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी बस भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत दिली जात आहे. महिलांना मालकीच्या मालमत्तेसाठी राज्य 1% स्थापना शुल्कात सूट देत आहे.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील तरुणांना 1.5 लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याचे श्री शिंदे यांनी सागितले. युवकांना नियुक्तीचे आदेश देण्यासाठी राज्यात नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात असून, इतर मागासवर्गीयांच्या लाभार्थ्यांसाठी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरू केली आहे, असे श्री शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान श्री.मोदी यांच्या विकसित भारत @2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशन  (MITRA) ची स्थापना राज्यात झाल्याची माहिती देत, श्री. शिंदे यांनी राज्य शासनाने निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्स्पो प्रमोशन कौन्सिल (MEPC) तसेच डिस्ट्रिकट एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सील (DEPCs) गठित केल्याची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात नीति जाहिर करणारे महाराष्टर् पहिले राज्य असल्याचे सांगितले. तसेच राज्याने 72 वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट (ODOP) अंतिम केल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.

एमएसएमई (MSME) वर भर : 
4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील सर्वात औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, मुख्यमंत्री यांनी कृषी योजनेतंर्गत CFC साठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती दिली. एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून व 15 हजारांहून अधिक उद्योजक निर्माण करण्याचे आमचे आर्थिक लक्ष असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत 40 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत व त्यापैकी 80% पेक्षा जास्त खाती महिला उद्योजकांची आहेत.

श्री. शिंदे यांनी राज्यात समृद्धि महामार्ग, शक्तीपीठ एक्सप्रेसवे, विरार-अलीबाग मल्टी मॉडल कॉरीडोर आणि देशातील सर्वात लांब रस्ता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असल्याची माहिती दिली. पुढे माहिती देतांना त्यांनी सांगितले की, सरकारने अहमदाबाद-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सर्व अडचणी दूर केल्या आहेत. तसेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकापर्ण गुरूवारी करण्यात आले आहे.

विदर्भ परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी तसेच मराठवाडा आणि खानदेश प्रदेशांना लाभ होण्यासाठी शासनाकडून नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असल्याचे श्री.शिंदे यांनी माहिती दिली. मराठवाडा विभागासाठी ‘वॉटरग्रिड’ योजना सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यासाठी केंद्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

उत्पदानासाठी ‘प्लग अँड प्ले’  मॉडेल
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ र्निगुणतवणुकीसाठी ‘प्लग अँड प्ले’ मॉडेल स्वीारले असून, ज्या गुंतवणुकदारांना आणि उद्योजकांना कमीत कमी भांडवली गुंतवणुकीसह उद्योग सुरू त्वरित करता येईल,अशी माहिती  श्री. शिंदे यांनी परिषदेत दिली. मैत्री पोर्टलद्वारे 119 सेवा सुलभ करण्यात 
प्रशासन प्रभावी, पारदर्श आणि उत्तरदायी बनविण्याच्या उद्येशाने, सुशासन नियमावलीला मान्यता देणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरला आहे. सर्व योजनांचा प्रत्येक नागरिकाला लाभ मिळावा म्हणून सरकारने विशेष योजना ‘शासन आपल्या दारी’ राबवत आहे. जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची योजना राबविण्यात येत असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रावर भर
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आधारे महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार झाला असून यात 2 कोटी 72 लाख कुटुबिंयांना लाभ मिळाला. मोफत तसेच दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

कौशल्य विकास
रोजगार क्षमता, अद्योजगता तसेच नवोपक्रमाला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, 10 लाखाहून अधिक उमेदवारांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले असून, 2 लाख युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती दिली. राज्य कौशल विश्वविद्यालय स्थापन केल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिल्ली.
भारत नेट – II प्रकल्पातंर्गत ठराविक गावांमध्ये 88% ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली असल्याचे श्री. शिंदे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023
नवीन गुंतवणूक, नागरिक आणि पर्यावरण पूरक महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 लवकर तयार होण्याबाबतची माहिती श्री.शिंदे यांनी दिली.
श्री.शिंदे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि निति आयोगाला महाराष्ट्र तसचे इतर राज्यांसाठी एक विशेष धोरण तयार करण्याची विनंती केली, जेणेकरून प्रत्येक राज्य श्री.मोदींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावू शकतील.

आयटीआयच्या वतीने आयोजित करियर मार्गदर्शन शिबिराचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

आयटीआयच्या वतीने आयोजित करियर मार्गदर्शन शिबिराचा ३५० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !

ठाणे, प्रतिनिधी : वागळे इस्टेट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिरात ३५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावत करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला. 

ठाण्यातील मो. ह. विद्यालयात झालेल्या या  शिबिराचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. तहसीलदार युवराज बांगर यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना करियर संधीचे मार्गदर्शन घेऊन त्यांचे भवितव्य घडवावे, असे आमदार श्री. केळकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. तहसीलदार श्री. बांगर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम व भरपूर अभ्यास करून यश संपादित करावे असा संदेश दिला.

या शिबिरात दत्तात्रय उतेकर, महेश कुलकर्णी, रमाकांत शर्मा, साहिल मुल्ला व श्रीमती पवित्रा सावंत या मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्राचार्या स्मिता माने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

एसटीच्या अधिकृत थांब्यावर वाढीव दराने नास्ता किंवा छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे महामंडळाचे आदेश !

एसटीच्या अधिकृत थांब्यावर वाढीव दराने नास्ता किंवा छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचे महामंडळाचे आदेश !


मुंबई, प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेस करीता मंजूर केलेल्या खाजगी थांब्यांवर हॉटेल मालकाने 30 रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीही काही हॉटेल चालक या आदेशाचे पालन करीत नाहीत अशा तक्रारी समाजमाध्यमावर आल्या आहेत.

तसेच नाथजल हे बाटली बंद पाणी देखील कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याच्या तक्रारी समाजमाध्यमावर येत आहेत.. अलीकडेच नाशिक रोड स्थानकात नाथजल हे बाटलीबंद पाणी कुलींग चार्जच्या नावाखाली छापिल किंमतीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार समाजमाध्यमावर एका प्रवाशाने व्हिडीओ काढून केली होती.

या अनुषंगाने मार्ग तपासणी पथकांनी, वाणिज्य आस्थापना पर्यवेक्षक आणि विभागातील अधिकाऱ्यांनी 30 रुपयातील नाश्ता दिला जात आहे का? आणि जादा दराने नाथजल विक्री होत असेल तर खातरजमा करावी. तसेच योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर हॉटेल मालकाच्या ही बाब निर्दशनास आणून द्यावी, तसेच अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी असे आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी पत्रक काढून दिले आहेत.

जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ !!

जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीच्या प्रचार रथाचे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या हस्ते शुभारंभ !!

ठाणे, प्रतिनिधी : वसुंधरा संजीवनी मंडळ व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत होणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन योजनेच्या जनजागृतीसाठी प्रचार रथाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.

यावेळी  विभागीय वन अधिकारी कांचन पवार, उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण, तहसिलदार राजाराम तवटे, ठाणे जिल्हा परिषदचे जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार, वसुंधरा संजीवनी मंडळ संस्थापक आनंद जी भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतंर्गत पहिल्या टप्यात ठाणे जिल्हयातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, भिवंडी या तालुक्यातील 72 तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.

तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची सुवर्णसंधी !

संपूर्ण देशभरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी हेच जीवन आहे. प्रत्येक गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशूंसाठी सातत्याने पाण्याची गरज असते. हवामानामध्ये तीव्र गतीने बदल होत चालले आहेत. पाऊस पडणे बेभरवशाचे झाले आहे. या संकटाला सामोरे जायचे असेल, तर प्रत्येक गावाने पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रत्येक गावामध्ये / तालुक्यामध्ये पाणी साठविण्यासाठी विहिरी, गाव तलाव, पाझर तलाव तसेच लहान-मोठे तलाव व धरणे आहेत. बऱ्याच ठिकाणी तलावांमध्ये गाळ साचतच असतो त्यामुळे पाणी साठविण्याची क्षमता कमी होते. जर आपल्या गावाला जल आत्मनिर्भर करावयाचे असेल, तर या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे त्यांची कायमस्वरूपी निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजन करणे नितांत आवश्यक आहे.

'जलयुक्त शिवार तसेच 'जल जीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून वरील सर्व कामे सहजरीतीने करता येऊ शकतात. यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास, आपल्या परिसरातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो व निगा राखण्याचे कायमस्वरूपाचे काम केले जाऊ शकते. 

ज्या ग्रामपंचायती आपले गाव 'जल-आत्मनिर्भर' करण्यासाठीची ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील, अशा ग्रामपंचायतीकडून 
https://bjsindia.org/mwsd किंवा https://gf3f4aec40f890c-appprod.adb.ap-mumbai-1.oraclecloudapps.com/ords/r/mission100/mission100/login मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान नगरपालिका प्रशासनाकडून यशस्वी !!

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान नगरपालिका प्रशासनाकडून यशस्वी !!

*तब्बल 43 टन कचऱ्याचे झाले संकलन*

अलिबाग, प्रतिनिधी :- शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. याचे महत्व जाणून जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील व जिल्हा नगर प्रशासन अधिकारी शाम पोशट्टी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रातील अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यासाठी  रायगड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात जिल्ह्यात  दि.26 मे 2023 या एकाच दिवशी हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तब्बल 43 टन कचरा या अभियानादरम्यान संकलित करण्यात आला. 
      या अभियानात रायगड जिल्ह्यातील 14.6 किमी रस्ते, 7.5 किमी गटारे स्वच्छ करण्यात आली. तसेच लहान स्वरुपातील 134 अतिक्रमणे हटविण्यात आली. या अभियानासाठी 43 मशिनरी वापरण्यात आल्या असून अभियानात 9 महत्वाच्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, 1 हजार शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग होता व 788 संस्था व नागरीक सहभागी झाले होते. 
    अशाच प्रकारचे पुढील स्वच्छता अभियान दि.26 जून 2023 रोजी राबविण्यात येणार आहे. हे अभियान आजच्या पेक्षाही प्रभावीपणे राबविण्यासाठी या अभियानात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आवश्यक यंत्रणा यांच्यासह सन्माननीय लोकप्रतिनिधी, संस्था व नागरिक यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे, जेणेकरुन या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अजून ही तळ्यात मळ्यात !! भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत कॉंग्रेसचा म...