Monday 29 May 2023

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा बैठक संपन्न !!

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा बैठक संपन्न !!


मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्वपूर्ण असे निर्देशही दिले. ते म्हणाले, आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजीटल मॅपींग करा. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

तसेच आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. वीज पुरवठा सुरळीत राहील याची महावितरणने काळजी घ्यावी. एनडीआरएफ, एसडीआरफशी संपर्क-समन्वय राखा. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहा.  राज्यातील सर्वच महापालिकांनी, नगरपालिका यांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.

महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरआफच्या बरोबरीनेच या तीनही दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केल्याचे आणि उत्तम कामगिरी बजावल्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत असे सांगितले.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...