Wednesday 30 August 2023

इंडिया आघाडी आणि महायुती ची मुंबईत आज उद्या बैठका !!

इंडिया आघाडी आणि महायुती ची मुंबईत आज उद्या बैठका !!


मुंबई, प्रतिनिधी : सत्ताधारी भाजपला आगामी निवडणुकीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईत दोन दिवस बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असून आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी महायुतीचीही मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील ‘ग्रॅण्ड हयात’ या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे. या बैठकीत 28 पक्षाचे 63 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

दुसरीकडे महायुतीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडी, जन सुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष आणि रयत क्रांती संघटना उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे.

आज उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक !!

आज उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक !!

*भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आणि जुमलेबाजीच्या विरोधात इंडिया आघाडी*


मुंबई, प्रतिनिधी : इंडिया आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी तिसरी बैठक पार पडणार आहे. याच बैठकीच्या निमित्ताने आज (30 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद पार पडली. ज्याला राष्ट्रवादीचे शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, कॉग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील हे नेते हजर होते.

'आमच्याकडे पंतप्रधान बनण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भाजपकडे मोदी सोडून काय पर्याय आहे?' असा खडा सवाल इंडियाच्या नेत्यांनी केला. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आणि जुमलेबाजीच्या जोखडापासून भारतमातेचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशभक्त पक्ष एकवटले आहेत. देशभरातील 28 पक्ष एकत्र आले आहेत असे सांगताना आमची इंडिया आघाडी भक्कमपणे वाटचाल करत आहे आणि येत्या निवडणुकीत देशात निश्चितपणे परिवर्तन घडणार आहे, असा ठाम विश्वास या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी ‘वेगवेगळे पक्ष आहेत ही गोष्ट खरी आहे. पण बसून किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही तयार करू शकतो. या आधारेच आपणच पुढे जाऊ शकतो.’ असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं आहे. 

देशातील जनतेला आता परिवर्तन हवे असून अनेक राज्यांमधून इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. विविध 28 राजकीय पक्ष आणि त्यांचे 63 प्रतिनिधी इंडिया बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकांमधून एक पर्यायी व्यासपीठ तयार होऊन देशात आवश्यक असलेल्या परिवर्तनासाठी मजबुतीने उभा राहील, हेच आम्ही करणार आहोत, असे शरद पवार यांनी पुढे सांगितले.

बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत 'इंडिया'चे 26 घटक पक्ष होते. महाराष्ट्रात आल्यावर ही संख्या 28 वर पोहोचली आहे. 'इंडिया' वाढत आहे आणि हीच वाढ कायम राहून चीन मागे हटेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक इंडिया बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. पाटणा आणि बंगळुरूनंतर इंडियाची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. पहिल्या दोन बैठकीतच केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस 200 रुपयांनी कमी केला ही इंडियाची ताकद आहे, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (JDU) अध्यक्ष नितीशकुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल काॅन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आणि इतर अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतील.


Tuesday 29 August 2023

कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी- एअरफोर्स स्टेशन ला राख्या रवाना !!

कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक  राखी जवानांसाठी- एअरफोर्स स्टेशन ला राख्या रवाना !!

दापोली, प्रतिनिधी : येणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून, गतवर्षी प्रमाणे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक  राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले . दापोली तालुक्यातील विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेजेस इ. ठिकाणून विद्यार्थिनींना आवाहन करुन या राख्या एकत्रित करण्यात आल्या. एक राखी जवानांसाठी या उपक्रमाच्या संयोजक 'नूतन वैद्य' यांनी दिलेल्या माहितीनुसार काही राख्या एअरफोर्स बेस स्टेशन पठाणकोट येथे रवाना करण्यात आल्या असून उर्वरित काही राख्या पुणे येथील Artificial Limb Center म्हणजे जवानांसाठीच्या कृत्रिम अवयव केंद्रात जाऊन रक्षा बंधनाच्या दिवशी बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमा दरम्यान प्रतिष्ठानची संपूर्ण युवा टीमचे सदस्य सावनी जोशी, संपदा माने, अनन्या वैशंपायन, श्रीप्रिती वैद्य, साक्षी करमरकर, वेदवती परांजपे, ऋजुता जोशी, वैष्णवी जोशी, श्रुती बिवलकर तसेच रोहन भावे, कपिल करंदीकर, अनिरुद्ध भागवत, कौस्तुभ दाबके, कणाद जोशी, संदीप गरंडे, ओंकार बेडेकर, अभिजित परांजपे, प्रमोद पांगारकर, इ. सर्वांनी विविध ठिकाणी संपर्क करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
आपण सर्व सण उत्सव ज्यांच्यामुळे साजरे करतो त्या जवानांप्रति आपला आदर आणि प्रेम व्यक्त करणारा हा उपक्रम असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी नमूद केले.

कोल्हापूरच्या तपोवन मैदानात १० सप्टेंबरला उत्तर दायित्व सभा - सुनिल तटकरे

कोल्हापूरच्या तपोवन मैदानात १० सप्टेंबरला उत्तर दायित्व सभा - सुनिल तटकरे 



मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बीडमध्ये झालेले स्वागत पाहून आम्ही जो विचार घेऊन सत्तेत सहभागी झालो, त्याला जनतेमधून पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता १० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला होणारी 'उत्तरदायित्व' सभा तपोवन या सर्वात मोठ्या मैदानात घेतली जाईल, अशी घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडमधील 'उत्तरदायित्व सभेला' मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले. 

दरम्यान आगामी काळात राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजनदेखील करण्यात येईल. तसेच ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेले तीनही पक्ष आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक वरळी डोम, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व पक्षांचा समन्वय राखण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे !!

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे !!



मुंबई , प्रतिनिधी : रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली असून आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मुक्ताई शुगर मीलच्या चेअरमन रोहिणी खडसे यांची आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आज पक्षाचे त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे. या माध्यमातून त्यांच्यावर राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.

आज मुंबई येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत रोहिणी खडसे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत महिला प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

दुसरीकडे, बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बीड जिल्ह्यात बबन गिते विरुद्ध धनंजय मुंडे असा अंतर्गत वाद असून त्यामध्ये बबन गिते यांना बळ देण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे.

कवी अशोक लोटणकर "कोकण साहित्य रत्न" पुरस्कार-२०२३ ने सन्मानित !!

कवी अशोक लोटणकर "कोकण साहित्य रत्न" पुरस्कार-२०२३ ने सन्मानित !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना कोकण युवा प्रतिष्ठान चा सन २०२३ चा कोकण साहित्य रत्न पुरस्कार डोंबिवली येथील मराठा हितवर्धक मंडळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे निवृत्त सचिव श्री.चंद्रकांत माने यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी,तसेच पद्मश्री गजानन माने, राजापूर-लांजा तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष लाड तसेच आमदार राजन साळवी इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना देखील कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             लोटणकर यांनी साहित्यातील कथा, कविता, ललित गद्य, बाल वाङमय, समीक्षा तसेच अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतूनही लेखन केले आहे. त्यांची आजवर २० पुस्तके प्रसिध्द झालेली असून अनेक मान्यवर संस्थांचे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील २८ हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.लोटणकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा या गावातील असून ते बीईएसटी मुंबईतून "आगार व्यवस्थापक " या पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत. ते अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. लोटणकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक सामाजिक मंडळ, प्रतिष्ठान, ग्राम विकास मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday 28 August 2023

खान्देशचे आराध्य दैवत, कानबाई मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा !!

खान्देशचे आराध्य दैवत, कानबाई मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा !!

महेंद्र पाटील, चाकण (पुणे) :
पुणे जिल्ह्यातील चाक येथे खान्देश प्रतिष्ठान, खान्देश मित्र मंडळ, अखिल खान्देश फाऊंडेशन, खान्देश ऐकता मंच यांच्या  सामूहिक उपक्रमात दोन दिवस कानबाई उत्सव साजरा करण्यात आला, त्यात दिनांक २७ रोजी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली, नंतर दुपारी अहिराणी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

चाकण येथील खान्देशचे डॉक्टर सागर पाटील व डॉक्टर राहुल महाजन यांच्या आरोग्यम हॉस्पिटल तर्फे खान्देशी बांधवांना ५०० टीशर्ट देण्यात आले, त्यावेळी डॉक्टर राहुल महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की असे कुठलेही खान्देशी कार्यक्रम असतील तर आम्ही त्यासाठी कधीही मदतीला आवर्जुन उपस्थित राहणार.

"मना देस खान्देश" या उक्तीनुसार जमलेल्या तमाम खान्देशी बंधु-भगीनींना व चाकण वासियांना कानबाई माता उत्सवानिमित्त शुभेच्छा. 

आज दिनांक २८ रोजी सकाळी मातेची भव्य थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली, त्यात खान्देशच्या अमळनेर तालुक्यातील श्रीकृष्ण ब्रासबंड होता, चाकण मध्ये खान्देशी बँडनी धुमधडाक्यात मातेची मिरवणुक पार पडली. या कार्यक्रमात खान्देशी बांधव आणि स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Sunday 27 August 2023

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ !!

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ !!

नवी दिल्ली, २७ : केंद्र सरकारकडून यावर्षीचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. श्रीमती मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे.

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

ठाणे जिल्हा न्यायालयातील “हिरकणी कक्षा"चे उद्घाटन संपन्न !!

ठाणे जिल्हा न्यायालयातील “हिरकणी कक्षा"चे उद्घाटन संपन्न !!

ठाणे, दि.२६ : जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गौरी गोडसे व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या हस्ते आज झाले.

     महिलांचे सबलीकरण व बालकांचे विकास योजनेंतर्गत जिल्ह्यांमध्ये गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांना आपल्या समवेत असलेल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी “ हिरकणी कक्ष”ची उभारणी महिला व बालविकास विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या ३% निधी मधून ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मार्फत केले जात आहे. ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्व सोयीयुक्त अशा कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. आज या कक्षाचे उद्घाटन श्री.अभय मंत्री व न्यायाधीश गौरी गोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

     या प्रसंगी ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायधीश उपस्थित होते. या सुविधांची गरज सर्व ठिकाणी असावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे यांनी केले. अध्यक्ष महोदयानी ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या आवारामध्ये या कक्षाची उभारणी करावी, असे निर्देश दिले.संबंधित न्यायालयीन अधिकारी यांना महिला व बालविकास विभागास कक्ष उभारणी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे व समन्वय साधून काम करण्याबाबत आदेशित केले.
      जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी महिला व बालविकास विभागातर्फे स्मृतीचिन्ह भेट देवून पाहुण्यांचा स्वागत केले. 
    या प्रकारच्या उपक्रमास न्यायपालिकेने ज्या संवेदनशिलतेने न्यायालयात येणाऱ्या मातांचा विचार करुन कक्ष उभारणीस परवानगी दिली व त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील अडचणी लक्षात घेवून पुढील आदेश दिले, याबाबत विभागातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 
     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे जिल्हा न्यायालयाचे रजिस्ट्रार श्री.कंठे आणि महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माेलाचे सहकार्य केले.

मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या एकतर्फी निर्णयामुळे खांडपे ग्रामस्थांनी ठोकळे शाळेला टाळे !!

मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या एकतर्फी निर्णयामुळे खांडपे ग्रामस्थांनी ठोकळे शाळेला टाळे !!        

**विद्यार्थी आणि पालक सोमवारी आंदोलनाच्या पावित्रात**

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाने  तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा खांडपे येथील शिक्षिकेची अचानक पणे बदली केल्याने, तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. या कारणास्तव  ग्रामस्थ, पालक, आणि शालेय शिक्षण समितीने शाळेला टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे..

याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की, जि. प. शाळा खांडपे या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेची पट संख्या ७७ आहे . त्यातील १ ली ते ५ वी ची पटसंख्या ४४ असून नियमानुसार दोन शिक्षकांची नियुक्ती ही योग्य आहे. परंतु पुढील जे दोन वर्ग आहेत.  अनुक्रमे ६ वी ते ७ वी यांची पटसंख्या ३३ असून त्यासाठी २ पदवीधर शिक्षक हवे होते. त्यात एकच भाषेचा पदवीधर शिक्षक नियुक्त केला होता. त्या शिक्षकाची २५ ऑगस्ट २०२३ रोजी तिथल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार न करता एकतर्फी अचानक बदली करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ, पालक, शालेय शिक्षण समिती यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्याला वर्गात जाऊ न देता शाळेच्या पटांगणात उभे करून शाळेला टाळे ठोकले आहे. जो पर्यंत बदली केलेला शिक्षक पुन्हा या शाळेवर  रुजू होत नाही. तो पर्यंत पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.. 

तसेच बदली कशी झाली याची विचारणा करण्यासाठी सोमवार दि..२८ ऑगस्ट २०२३ रोजी पंचायत समिती मुरबाड येथे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, व शालेय शिक्षण समिती आंदोलन करणार असल्याचे समजते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, प्रशासकीय यंत्रणेला पडला क्रांतिकारकांचा विसर !!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, प्रशासकीय यंत्रणेला पडला  क्रांतिकारकांचा विसर !! 

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) : संपूर्ण देशभरात  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना सह्याद्री च्या पायथ्याशी असलेल्या सिध्दगडावर ब्रिटिशांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या विर भाई कोतवाल व क्रांतीवीर हिराजी गोमाजी पाटील या क्रांतीकारकांचा प्रशासनाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.                          
           स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतीकारक व हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी प्रत्येक गाव, नगर, शहर परिसरातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे व क्रांतीकारक यांचे ग्रामपंचायत कार्यालय शाळा यांचे आवारात शिलालेख लावण्याचे सरकारचे आदेश असताना मुरबाड तालुक्यातील सिध्दगडावर 1942 च्या रणसंग्रामात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भाई कोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांच्या क्रांतीकारी विचारांचा तळागाळात प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांना या क्रांतीकारकांचे विचारांची व देशभक्तीची प्रेरणा मिळावी. यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेत या हुतात्म्यांच्या प्रतिमा आजही बघायला मिळत आहेत. शिवाय तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी या हुतात्म्यांचे मोठे स्मारक उभारण्यात आलेले असताना  शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारात लावण्यात येणाऱ्या शिलालेखावर या क्रांतिकारकांची नावे नसल्यामुळे भविष्यात या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

           ग्रामपंचायत चे कार्यक्षेत्रात शिलालेख लावणे ही जबाबदारी गटविकास अधिकारी यांची आहे.याबातबत त्यांचेवर चर्चा केली जाईल.- संदिप आवारी.तहसिलदार मुरबाड.

         !! तालुक्यातील हुतात्मे व क्रांतीकारक यांचा आढावा घेऊन तशी कार्यवाही केली जाईल.श्वेता पालवे.गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड.

           मुरबाड तालुक्यातील सिध्दगडावर विर हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांनी 1942 च्या आंदोलनात ब्रिटिशांशी लढत असताना  2 जानेवारी रोजी त्यांना विर मरण आले. त्यांना दरवर्षी मानवंदना देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच तमाम देशभक्त आपली हजेरी लावत असतात.याचे प्रशासनाने भान ठेवून या हुतात्म्यांची नावे प्रत्येक गावातील शिलालेखावर कोरण्यात यावी - गिरीश कंटे.सिध्दगडावरील आझाद दस्ता.लेखक

मा.आ.शिवसेना- सचिव अध्यक्ष श्री. किरणजी पावसकर साहेब यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट !

मा.आ.शिवसेना- सचिव अध्यक्ष श्री. किरणजी पावसकर साहेब यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            मा.आ.शिवसेना-सचिव अध्यक्ष श्री. किरणजी पावसकर साहेब आणि श्री.सुहास ठाकूर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. 

             त्यांना शाल आणि श्री साई बाबा यांची फोटो फ्रेम देऊन श्री. दामोदर म्हात्रे साहेब, सचिन  म्हात्रे (लोकसभा संपर्क प्रमुख उत्तर मुंबई), श्री सुनील पाटील (उप विभाग प्रमुख-  बोरिवली विधानसभा विभाग क्रमांक - १), श्री.वैभव म्हात्रे, श्री समीर खाडिलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कांगोरिगड माध्यमिक विद्यालयातील ग्रंथालयाला पुस्तके भेट आणि विद्यार्थांना वह्यांचे वितरण !

कांगोरिगड माध्यमिक विद्यालयातील ग्रंथालयाला पुस्तके भेट आणि विद्यार्थांना वह्यांचे वितरण !

#मुंबईतील सत करम फाऊंडेशनचां सामाजिक उपक्रम*

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                रायगड जिल्हा पोलादपुर तालुक्यातील कांगोरीगड माध्यामिक विद्यालयात सत करम फाऊंडेशन मुंबईचे संचालक ॲड अनुज नरुला, एस् . मनजीत सिंग शेठी , दत्तात्रेय सावंत यांच्या उपस्थितीत ४० हजार रुपये किमतीच्या फुल साईज वह्या, ग्रंथालयासाठी पुस्तके, पेन व खाऊचे वितरण वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरतशेठ उतेकर यांनी भूषविले. प्रथम संस्थेचे बोधचिन्ह माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गीत मंचातील मुलींनी ईशस्तवन,स्वागतगीत व देशभक्तीपर गीत गायन करून कार्यक्रमाची सुरुवात केली . विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार निलेश मोरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू समजावून सांगीतला . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या पेन व खावू वितरण सोहळा व विद्यालयाच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली. ऍड अनुज नरुला व एस् मनजीत सिंग शेठी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना खेळा , मस्ती करा त्याच बरोबर भरपूर अभ्यास करा व मोठे झाल्यावर देश सेवा करा असा सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी सत्कर्म संस्थेच्या सदस्य जयश्री सावंत, तारामती भागित, शा व्य समीतीचे उपाध्यक्ष ह भ प तानाजी महाराज उतेकर, माजी सैनिक वसंत नलावडे, माजी पोष्ट मास्तर विष्णू करंजे, ग्रामपंचाय आडवळे बु च्या सरपंच घाडगे ताई, सुनिल उतेकर , रमेश पवार व तांबे ताई उपस्थित होते. हा प्रेरणादायी कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर यांच्या मार्गदर्शना खाली व सर्व सेवक वृंदाच्या सहाकार्यातून संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन कला शिक्षक एस् के सुतार यांनी केले तर आभार प्रदर्शनश्री सुभाष ढाणे यांनी केले .

बळीराज सेनेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी नितीन गोविंद लोकम यांची नियुक्ती !!

बळीराज सेनेच्या संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी नितीन गोविंद लोकम यांची नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :                
             महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम साहेब यांच्यावतीने मुंबई सह कोकण विभाग येथे अनेक पदाधिकारी  जाहीर करण्यात आले.याध्ये संगमेश्वर तालुका अध्यक्ष पदी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळच असलेल्या बामणोली गावातील करंडे वाडीचे सुपुत्र, कोकण भूमिपुत्र श्री. नितीन गोविंद लोकम यांची नियुक्ती करण्यात आली.लोकम यांना पक्ष अध्यक्ष अशोक वालम यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मुंबई उपाध्यक्ष रमेश कानावले उपस्थित होते.अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगर आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, ग्रामपंचायत, लोक सभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये २२७ वार्ड लढविण्यासाठी भविष्यात उमेदवाराची चाचपणी देखील लवकरच केली जाईल असे मुंबई उपाध्यक्ष नियुक्ती श्री.रमेश कानावले यांनी बोलताना सांगितले. या नियुक्ती बद्दल कोकणातील अनेक सामाजिक संघटना, समाज शाखा, मंडळ, राजकीय मित्र मंडळी, मित्र परिवार यांनी नितीन लोकम यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday 25 August 2023

पदोन्नती व ठाणे येथील नियुक्ती साठी अधिक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांचे अभिनंदन !!

पदोन्नती व ठाणे येथील नियुक्ती साठी अधिक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांचे अभिनंदन !!

ठाणे, प्रतिनिधी : जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून बजावणारे काही मोजकेच अधिकारी आपल्याला शासकीय सेवेत आढळून येतात. त्या अधिकाऱ्यांपैकी सिद्धार्थ तांबे यांचा नामोल्लेख करावाच लागेल. नुकतीच सिध्दार्थ तांबे यांना सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावरून अधीक्षक अभियंता पदावर पदोन्नती मिळाली व त्यांची नियुक्ती ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळात नुकतीच झाली असून तांबे यांचे नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल गुण मिळवून तांबे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाले. मिळालेले काम हे संधी म्हणून व्यापक लोक हिताचा सिद्धार्थ तांबे यांनी विचार केला आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. 

असे कर्तव्यदक्ष अधिकारी अधिक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांचे दैनिक बातमीदार चे विभागीय संपादक (मुंबई - ठाणे) सचिन बुटाला यांनी भेट देऊन त्यांचे पदोन्नती व ठाणे येथील नियुक्ती साठी अभिनंदन केले आहे. यावेळी दैनिक बातमीदार चे मुंबई ठाणे येथील प्रतिनिधी उपस्थित होते.

Wednesday 23 August 2023

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर !!

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया स्फोटक प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर !!

भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील, (कोपर) :
        मुकेश अंबानी यांच्या ॲंटेलिया स्फोटक आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणातील‌‌ एन्काऊंटर स्पेशालिस्ट आरोपी असलेला पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याला सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेल्या प्रदीप शर्मा यांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रदीप शर्मा तुरुंगात होते. या आधीही प्रदीप शर्मा यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर प्रदीप शर्मा सर्वोचच न्यायालयात गेले होते. 
         सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी घेतली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
              25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या बंगल्याबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ आढळली होती. मात्र या घटनेनंतर या स्कॉर्पिओचा मालक मनसूख हिरेन याचा मृत्यू ठाण्याजवळील खाडीत आढळून आला. त्या वेळी या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे या प्रकरणी एनआयएने केलेल्या तपासात या घटनेचे कनेक्शन पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि पोलिस अधिकारी ए.पी.आय. सचिन वाझे यांच्या पर्यंत पोहचले. त्या नंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासह 9 जणांना एनआयएने अटक केली. मात्र या प्रकरणात प्रदीप शर्मा यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे याला पुरावे मिटवण्यास मदत केल्याचा  ठपका ठेवण्यात आला होता. मात्र आता प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Tuesday 22 August 2023

कवी रमाकांत जावळे रोशनी जावळे आदर्श पती-पत्नी पुरस्काराने सन्मानित !

"कवी रमाकांत जावळे रोशनी जावळे" आदर्श पती-पत्नी पुरस्काराने सन्मानित !

[ ठाणे : उदय दणदणे ] :

वयाच्या १२ व्या वर्षीपासून काव्य लेखन करत आज यशस्वी कवी म्हणून प्रचलित आहेत असे चिपळूण गावचे वीर गावचे सुपुत्र रमाकांत बारका जावळे आणि त्यांच्या सौभाग्यवती रोशनी रमाकांत जावळे यांना मौजे चुनाकोळवण माजी विद्यार्थी संघ ग्रामीण/ मुंबई राजापूर या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी ताराबाई मोडक शिशुविहार माध्यमिक विद्या मंदिर, दादर मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या व अध्यक्ष रवींद्र मटकर, व्याख्याते प्रा. सुनील देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामजिक कार्यकर्त्या कल्पना पाटणकर व केशव पाटणकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन पती-पत्नी -आदर्श जोडी" पुरस्कार २०२३ ने गौरविण्यात आले.

पुरस्कार प्रति आपली प्रतिक्रिया देताना रमाकांत जावळे व्यक्त होत माझे वडील समाज कार्यकर्ते आणि गावचे उपसरपंच ही झाले. नाच, नमन भजनाची त्यांना खूप आवड त्यातूनच त्यांनी पुरुष - महिलांचा नाच सुरु केला. त्यांचाच वारसा मी पुढे  अखंडित सुरू ठेवला त्यामुळे मला सुद्धा सर्वच क्षेत्रात आवड निर्माण झाली. पुढे कवित्व करायला शिकलो, अनेक महिला- पुरुष शाहीर घडविले, माझी आजवर अनेक गाणी  प्रसारित झाली आणि ख्यातनाम कवी म्हणून माझी जनमानसात ओळख निर्माण झाली. हे करत असताना आपण समाज्याचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव झाली. त्यामुळे मी रात्रंदिवस जनसंपर्कात राहू लागलो, अनेकांच्या सुखदुःखात धावून जाणे मदत करणे ही वडिलांची शिकवण त्यामुळे माणसातील माणुसकी लहानांपासून थोरांपर्यंत कशी जपावी, कुणाशी कस बोलावं, वागावं हे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवी-रमाकांत जावळे होय. शांत स्वभाव संयमी व्यक्तिमत्व, अनेक सामाजिक शैक्षणिक, क्रीडा वैद्यकिय अशा अनेक संघटनेवर ते सद्या कार्यरत आहेत, जणू वीर देवपाट गावाला मिळालेला हिराच आहे. हे सर्व करत असताना पुरुषांच्या पाठीमागे स्त्रीचा हात असावा लागतो हे सत्य नाकारता येत नाही त्यांची पत्नी रोशनी रमाकांत जावळे घरकाम करून आपला प्रपंच सांभाळून समाज सेवेप्रती आपल्या पतीच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या, ही माझ्या सोबत समाज कार्यात सहभागी होत, प्रोत्साहन देत जणू आई-वडीलां प्रमाणे हा भक्कम आधार म्हणून मी सर्व काही करू शकलो याचेच फलित म्हणजेच आम्हाला प्राप्त झालेला पती-पत्नी "आदर्श जोडी पुरस्कार-२०२३" होय. आमच्या या खडतर प्रवासाची चुनाकोळवण माजी विद्यार्थी संघ मुंबई/ ग्रामीण(रजि.) या संस्थेने दखल घेवून आदर्श पती-पत्नी पुरस्कार देवून आम्हा उभयतांना सन्मानित केल्याबद्दल उपरोक्त संस्थेचे अधक्ष -रविंद्र मटकर व सहकारी यांचे आभार मानले आहेत. तर सर्व स्तरातून रमाकांत जावळे व रोशनी जावळे यांचे अभिनंदन कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत अज्ञाताकडून विकृत मनोवृत्तीचा कळस, परिसरात संतापाची लाट?

कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत अज्ञाताकडून विकृत मनोवृत्तीचा कळस, परिसरात संतापाची लाट?

कल्याण, (संजय कांबळे) : शाळांना विद्यादानाचे पवित्र मंदिर म्हटलें जाते, मात्र याच मंदिरात शौचास बसून आपल्या विकृत मनोवृत्तीचा प्रकार कल्याण तालुक्यातील कुंदे जिल्हा परिषद शाळेत घडला असून यामुळे या अज्ञाताविरोधात परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

कल्याण तालुक्यात १२० च्या आसपास जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. विद्यादानाचे पवित्र कार्य या मंदिरातून चालते, देशाचे भावी नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी या शाळांवर असते आणि शाळेतील 'गुरुजी, अध्यापनाच्या माध्यमातून ती इमानेइतबारे पार पाडत असतात. मात्र अलीकडच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या किंवा तशी अपेक्षा असलेल्या या विभागातच सर्वाधिक राजकारण सुरू झाले आहे. हे विविध ठिकाणच्या शिक्षकांच्या सभामध्ये होणाऱ्या हाणामाऱ्या, टेबल खुर्च्या फेकाफेकी यावरून दिसून येत आहे. इतकेंच नव्हे तर हे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की आपण काय करतो?कुठे करतो? याचेही भान राहिलेले नाही.

तालुक्यातील कुंदे गावात जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी पर्यंत शाळा आहे. २ शिक्षक व २ वर्ग खोल्या, असलेल्या या शाळेत ४५ विद्यार्थी ज्ञान घेण्याचे काम करतात. शाळेला स्लाईडिंगच्या खिडक्या आहेत, याच खिडकीतून आत शिरुर कोणीतरी माथेफिरू, विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने वर्गात 'संडास, केले, १५ ऑगस्ट ला हा किळसवाणा प्रकार लक्षात आल्यानंतर कसेबसे वर्ग स्वच्छ केला, शाळेचे मुख्याध्यापक अरुण भामरे यांनी हा सर्व प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिला. परंतु यानंतर पुन्हा मंगळवार दि २२ ऑगस्ट रोजी परत असाच प्रकार केला. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी संतापले, व खिडकीला ग्रील बसवण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर असेच चालू राहिले तर मात्र पोलीस तक्रार करणार असल्याचे मुख्याध्यापक भांमरे सर यांनी सांगितले.

दरम्यान हा काय पहिलाच प्रकार नाही, तालुक्यातील म्हारळ जिप शाळेत तर पंखे, पत्रे, स्पिकर, ग्रील, असे बरेच साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. वरप जिप शाळेच्या खिडक्या च्या काचा जागेवर राहिल्या नव्हत्या, तर इतर ठिकाणी शाळेच्या आवारात, व्हराड्यांत तळीरामानी गटारी जोशात साजरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या.. इतकेच नव्हे तर या पवित्र ठिकाणी दारुच्या बाटल्या, कंडोम असे साहित्य देखील सापडले होते. शाळांच्या शौचालयामध्ये चित्रविचित्र आकृत्या दिसून आल्या होत्या, या सर्वावरुन खरेच विद्येचे पवित्र मंदिर सुरक्षित व पवित्र राहिले आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. गावातील कोणीतरी विक्षिप्त, विघ्नसंतोषी, विकृत व्यक्ती असे वाईट कृत्य करतो व संपूर्ण गावाची बदनामी होते हे थांबायला हवे, ती जबाबदारी देखील ग्रामस्थ म्हणून आपलीच आहे.
सुदैवाने सध्या तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत व वाँल कंपाऊंड आहे, दरवाजे, खिडक्या यांना ग्रील लावलेले आहेत, तरीही शाळांचे पावित्र्य जपणे हे शिक्षकासह गावातील नागरिक, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी आहे.हे नाकारुन चालणार नाही.

पेण तालुक्यातील शिशिर धारकर यांनी शिव बंधन बांधून केला शेकडो कार्यकर्त्यासह उद्धव ठाकरे गटात प्रवेश !!

पेण तालुक्यातील शिशिर धारकर यांनी शिव बंधन बांधून केला शेकडो कार्यकर्त्यासह उद्धव ठाकरे गटात प्रवेश !!

भिवंडी, दिं,२२,अरुण पाटील (कोपर)
           रायगड जिल्ह्यातील पेणचे माजी नगरअध्यक्ष शिशिर धारकर यांनी २५० वाहनांचा ताफा घेउन आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुबईतील मातोश्री निवासस्थानी शिव बंधन बांधून ऊद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत      मोठया थाटात प्रवेश केला आहे. 

           शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. मी उद्धव ठाकरेंना शब्द देतो की, आगामी निवडणुकीत पेणचा आमदार आपलाच असणार आहे असं त्यांनी म्हटलं. तर तुम्ही सगळे आता शिवसैनिक झालात. तुमचं स्वागत मनापासून करतो. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काही जणांचे नाव मोठे होते, पण डोळे वटारल्यावर पळून गेले. अन्याय सहन करायचा नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 
          त्याचसोबत शिशिर धारकर यांना सोपा मार्ग होता, वॉशिंग मशिनमध्ये तुम्हीही जाऊ शकला असता. पण तुम्ही त्यातले नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? वॉशिंग मशिनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. सगळे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत. फक्त पेणच नव्हे तर चांदा ते बांदा आपल्याला सत्ताबदल करायचा आहे. आपल्याला शहाणपणाची सत्ता आणायची आहे. सध्या लोकांना मुर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. परंतु ते जास्त काळ चालणार नाही. आता मी बोलायचे थांबतो, जे काही बोलायचे ते पेणला येऊन जाहीर सभेतच बोलेन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला.                       एकेकाळी पेण नगरपालिकेवर धारकर घराण्याचे वर्चस्व होते, परंतु पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यामुळे या वर्चस्वाला धक्का बसला. शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचसोबत पेण अर्बन बँक घोटाळ्यातील ते आरोपी होते. ५०० कोटीहून अधिक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण अर्बन बँकेत अनेक स्थानिक लोकांचा पैसा होता. हा पैसा बँक घोटाळ्यात बुडला. त्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आहे. गेल्या काही वर्षापासून शिशिर धारकर सक्रीय राजकारणापासून दूर होते. आता शिशिर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्याचा किती फायदा ठाकरे गटाला होतो हे पाहणे गरजेचे आहे.

Monday 21 August 2023

कल्याण तालुक्यातील रस्त्यावरील खड्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा रास्तारोकोचा इशारा !

कल्याण तालुक्यातील रस्त्यावरील खड्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा रास्तारोकोचा इशारा !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यासह टिटवाळा परिसरात मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात खड्डे भरले नाहीत, तर प्रत्येक रस्त्यावर ओळीने रास्ता रोखो करण्याचा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. तसे निवेदन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.

कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड, टिटवाळा, शहापूर या रस्त्यासह टिटवाळा फळेगावा, गेरसे, पळसोली, पाजरपोळ अंबरनाथ, निंबवली, राये खडवली, निंबवली पिसे रस्ता, टिटवाळा गुरवली, बापसई बेलकरपाडा, राये ओझर्ली, रायते आपटी आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, 

केवळ कागदोपत्री खड्डे भरून लाखोंची उधळपट्टी केली असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेकांचे अपघात झाले आहेत. कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. परंतु याचे सरकारला काही सोयरसुतक दिसत नाही,नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे, यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही हे देखील धोकादायक आहे. 

तालुक्यातील  नद्यांच्या पुलाची सरक्षंक खांब वाहून गेले आहेत, यावरून प्रवास करणे जीवघेणे ठरु शकते आणि हे शिवसेना ठाकरे गट खपवून घेणार नाही असा इशारा तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव यांनी निवेदन देताना दिला आहे, त्यामुळे येत्या आठवडाभरात हे खड्डे बुजवून, रस्त्याचे नूतनीकरण करून लोकांची गैरसोय दूर झाली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. तसे निवेदन कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तहसीलदार जयराज देशमुख, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. 

यावेळी तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, माझी उपसभापती रमेश बांगर, शिवसैनिक नरेश सुरोशे, कैलास मगर, बळीराम फिरगांणे, उप तालुका प्रमुख बाज्या भालेकर, नितीन चौधरी, अनिल सुरोशे, जनार्दन गायकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सिद्धकला तायक्वादो अकादमीच्या खेळाडूंची पुन्हा चमकदार कामगिरी !!

सिद्धकला तायक्वादो अकादमीच्या खेळाडूंची पुन्हा चमकदार कामगिरी !!

*साऊथ कोरियात २६ सुवर्ण, ८ रौप्य व ४ कांस्य पदकाची कमाई*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सिद्धकला तायक्वादो अकादमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू असून नुकत्याच पार पडलेल्या साऊथ कोरिया येथे झालेल्या १६ व्या वर्ल्ड तायक्वादो कल्चरल एक्सपो आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेत खेळाडूंनी २६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली आहे. साऊथ कोरिया येथील तायक्वादो वॉन, जेलबोक - दो , मुज्जू या शहरात ही स्पर्धा १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जवळ जवळ विविध देशातील २२००-२५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुंबईतील सिद्धकला तायक्वादो अकादमीतील खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पुमसे आणि क्यूरोगी या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी बजावत भारताचे नाव उंच केले. पुमसे प्रकारात तनिष्का वेल्हाळ, आरव चव्हाण, आर्या चव्हाण, अवनी चव्हाण, शिवांश जोशी, इब्राहीम काझी, चंदन परिडा, यश दळवी यांनी सुवर्ण पदकावर मोहर उमटवली तर निलोद्य राज, दियान मेहता, समायरा जोशी, निमांश चांडोक, समर्थ चंडोक, ईसा काझी, फ्रँक कणाडीया यांनी रौप्य आणि व्योम बन्सल, पूर्वेस म्हात्रे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. खेळाडूंनी प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधित्व केले.

स्फूर्ती फाउंडेशन प्रयत्नातून कल्याण मध्ये महाविद्यालयीन गरजू विद्यार्थींना मोफत पुस्तके वाटप !!

!! घ्या उंच भरारी, करा परीक्षेची तयारी, गाढा यशाची शिखरे ||

स्फूर्ती फाउंडेशन प्रयत्नातून कल्याण मध्ये महाविद्यालयीन गरजू विद्यार्थींना मोफत पुस्तके वाटप !!
             
कल्याण, प्रतिनिधी : ज्ञान ,कला कौशल्य हि माणसाच्या जीवनात प्रगतीची दरवाजे उघडताता  पुस्तके नसल्याने शिक्षणापासून वंचित राहू नये या हेत्तूने स्फूर्ती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ' च्या विद्यमाने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीना स्वतंत्रदिनी मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले. `घ्या उंच भरारी.... करु परीक्षेची तयारी.. गाठू यशाची शिखरे' हाच एक हेतू व पवित्र उद्देश होता. यावेळी स्फूर्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री बजरंग शांताराम तांगडकर यांनी संस्थेची  संपूर्ण वाटचाल व झालेल्या कार्याची माहिती दिली.

            स्फूर्ती फाऊंडेशन नेहमीच विद्यार्थ्यांना स्फूर्ती देण्यासाठी कटीबध्द राहील असे मनोगत व्यक्त केले, जिवनात शिक्षणाला पर्याय नाही जो शिकला तोच टिकला, आम्ही पण संघर्षांतूनच वर आलो आहोत, शालेय जिवनात भावंडांची पुस्तके एकमेकांनी वापरून शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे परिस्थितीची जाणीव आम्हाला असून, येणाऱ्या संकटांना तोंड देत मार्ग काढायचा असतो, हार मानायची नाही,एक दिवस तुमचा येतोच त्यासाठी लढत रहा‌, जिवनात धेय्य मोठी ठेवा, आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवा त्यांना कधी विसरू नका त्यांनी काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं आहे, वाईट मार्गाला जाऊ नका व जिवनात मोठ्या पदावर पोहचा. स्फूर्ती फाउंडेशन आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे सहकार्य करू  असे उद्गगार बजरंग तांगडकर यांनी काढले. 

          यावेळी जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते श्री शांताराम  शतांगाडकर यांनी `ग्रंथ हेच गुरू आहेत', `वाचाल तर वाचाल ', पुस्तके वाचा  ज्ञान मिळेल. आयुष्यात घराचे, गावाचे, नाव उज्वल करा असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द नामवंत उद्योगपती कल्याणचे भुषण माननीय हनुमानशेठ केणे यांच्या सुकन्या रसिका केणे, मराठा उद्योजक लाॅबी ठाणे ग्रामीण अध्यक्ष मंगेश शेळके, आयुर्वेदाचार्य डॉ. जितेन्द्र पाटील, समाजसेवक लक्ष्मण शिंपी, प्रकाश खोपडे, हशमजिदादा हिर्मा यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला या कार्यात स्फूर्ती फाउंडेशन युवा‌प्रमुख तुषार वै यांनी विशेष मेहनत घेतली, यावेळी स्फूर्ती फाऊंडेशनच्या महिला अध्यक्ष सौ. शिल्पा तांगडकर, आदर्शमाता सौ. शारदा तांगडकर,अमोल वाकळे, सुनिल तांगडकर, अर्जुन बिराजदार,शिवम बोरूडे, रोहिणी निमसे, मधुकर सर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी  सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुस्तके वितरण करण्यात आले.

अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा ता़ंगडकर यांनी उपस्थितांचे मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले

Sunday 20 August 2023

शिवसेना (उबाठा) घाटकोपर पश्चिम विधानसभा शाखा क्र १२३,१२४ ग्राहक संरक्षण कक्षतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

शिवसेना (उबाठा) घाटकोपर पश्चिम विधानसभा शाखा क्र १२३,१२४ ग्राहक संरक्षण कक्षतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

मुंबई, (शांताराम गुडेकर):
                 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे संस्थापक अध्यक्ष स्व.सुधीर जोशी, अध्यक्ष स्व.सुधीर जोशी, अध्यक्ष खासदार मा.खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सरचिटणीस विजय मालणकर, कक्ष लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर, कक्ष विधानसभा संघटक अमीत भाटकर यांच्या सुचनेनुसार कक्ष कार्यालय चिटणीस श्रीकांत चिचपुरे शाखा क्र. १२३, कक्ष वार्ड संघटक राजेंद्र पेडणेकर, शाखा क्र १२४ कक्ष वार्ड संघटक यशवंत खोपकर यांच्यावतीने ईशान मुंबई विभाग प्रमुख नगरसेवक तुकाराम सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबीर, चष्मा, माफक दरात मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर राबवण्यात आले. या शिबिराचा लाभ १६२ स्थानिक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी प्रमुख रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख  सुधीर भाऊ मोरे, विभाग प्रमुख तुकाराम सुरेश पाटील, समन्वयक संजय शेट्टी, शिवाजी शेवाळे, शाखा प्रमुख प्रकाश भेकरे, संतोष सवणे, महिला शाखा प्रमुख, सगीता तुलसकर, निलम बने, ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी अजय शिरोडकर, अमित भाटकर, विश्वनाथ जाधव, प्रमोद चौंडकर, विकास मगर, युवराज हांडे, शेखर गावडे, सुधीर कदम, प्रकाश सावंत, प्रवीण जाधव राजेंद्र केळशीकर, विकास डुकरे, प्रशांत शिंदे संदीप चांदिवडै, दौलत बेलकर, विनायक जाधव, संजय पवार, महादेव शेजवळ, भावेश पुरंदर, बाप्पा तुलसकर, युवासेना सागर फुलंसुदर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नवीन नियुक्ती झालेल्या ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी श्री राजेन्द्र पेडणेकर, श्री यशवंत खोपकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच या संपूर्ण कार्यक्रमला विभागातील शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण महिना सण आणि उत्सव (महत्व)....

श्रावण महिना सण आणि उत्सव (महत्व)....

       श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिना म्हणजे सणांची पर्वणीच !! नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी नंतर भाद्रपद महिन्यातील सर्वांच्या आवडीचा सण गणरायांच आगमन.....!हिंदू पंचांगाचा प्रारंभ चैत्र मासापासून होतो. चैत्र मासापासून पाचवा महिना हा श्रावण मास असतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यातील पौर्णिमेपासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग तयार होत असते. त्यामुळे श्रावण नक्षत्राच्या नावा वरुन या महिन्याचे नाव श्रावण असे ठेवण्यात आले. या महिन्या पासून चातुर्मासची सुरूवात होते. तसेच हा महिना चातुर्मासातील चार महिन्यापैंकी अतिशय शुभ असा महिना मानला गेला आहे. धार्मिक द्दष्टीने चातुर्मासाचे खुप महत्व आहे. चातुर्मासात येणा-या चार महिन्यात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या महिन्यांमध्ये संत-महात्म्यांपासून ते साधारण व्यक्तीपर्यंत सगळेच धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमात व्यस्त झालेले आपल्याला दिसतात. या काळात हिंन्दू धर्मात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. या सर्वांची सुरूवात श्रावण महिन्यापासूनच करण्यात येते.
       आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एकसण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहितीमिळवली जाते.श्रावण महिन्यात रविवारी सुर्यनारायणची पुजा, नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत.
       श्रावण महिन्यातील नाग पंचमी हा दिवस स्त्रीयासाठी मोठा सण आहे तसेच महाराष्ट्रात हा सण आनंदाने साजरा करतात. या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया वारुळा जवळ जावून पूजा करायच्या पण आता कालांतराने व शहरी करणामुळे वारुळे राहिली नाहीत. म्हणून आताघरीच नागाची मूर्ती तयार करून, किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते.नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वाफुले वाहून, लाह्या व दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. ह्या दिवशी नागाची पूजा का करायची तर नाग देवता आपल्या कुळाचा, आपल्या पूर्वजांचा व आपल्या घराण्याचा रक्षण कर्ता आहे म्हणून आपण नाग देवाची पूजाकरतो. त्या दिवशी नाग देवाच्या फण्याला दुखवायचे नसते. त्या दिवशी वाटणे घाटणे करायचे नाही, विस्तवावर तवा ठेवायचा नाही. त्या दिवशी पुरणाची दिंड बनवून नैवेद्य बनवला जातो.नाग पंचमी या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. लहान मुलीनं पासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये भाग घेतात. या दिवशी रात्री जागरण केले जाते. श्रावणातील सोमवारचे  खूप महत्व आहे. या  दिवशी सकाळी लवकर उठून शंकर भगवान् यांची पूजा केली जाते. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा करून गोडाचा नेवेद्य बनवून मग उपवास सोडला जातो. श्रावणातील मंगळवार हा तर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी आनंदाचा दिवस. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी करतात. या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येवून शंकरा भगवानच्या पिंडीची पूजा करून स्त्रीयांना हळदी कुकवाला बोलवून रात्री जागरण केले जाते. 
       पहिल्या वर्षी पहिला मंगळवार माहेरी आईच्या घरी करतात. व नंतर पाच वर्ष सासरी करतात व शेवटच्या वर्षी उद्यापन करतात. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, लाटण्याचा खेळ, गोफ, फेर हे खेळ खेळतात. खेळ खेळतांना गाणी म्हणतात.नवीन लग्न झालेल्या मुलींना पतीचे पाव हे उखाण्यात घेण्याचा आग्रह धरला जातो. मंगळा गौरीला खेळ खेळतांना मुली आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेतात.नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोक मनवतात. ते आपल्याला रोजी रोटी देणाऱ्या समुद्राची पूजा करतात व नारळी पौर्णिमा हा दिवसनाच-गाणी म्हणून साजरा करतात. तसेच रक्षा बंधन हा सण महाराष्ट्रीयन लोकांचाआहे त्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची हमी देतो.श्री कृष्ण जन्मउत्सव: श्री कृष्ण जन्म हा रात्री साजरा केला जातो. त्या दिवशी उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी दही हंडी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक सोमवारी - शिवपूजन, प्रत्येक मंगळवारी - मंगलागौरीचे पूजन, प्रत्येक बुधवारी - बुधाचे पूजन, प्रत्येक गुरुवारी - बृहस्पतीचे पूजन, प्रत्येक शुक्रवारी - ज्योति देवीचे पूजन, प्रत्येक शनिवारी - शनि-मारुति-अश्वत्था (पिंपळा) चे पूजन,प्रत्येक रविवारी - आदित्याचे पूजन अशी धार्मिक विधी होतात.सर्व वाचकांना श्रावण महिणा व त्यातील सण व उत्सवांना मनःपूर्वक  शुभेच्छा....!

शांताराम गुडेकर
सदस्य -महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन (एमसी/२०१७/इंडिया /१६२४६६/२-३-२०१७) 
पार्क साईट, विक्रोळी (प.)
मुंबई - ७९
भ्रमणध्वनी -९८२०७९३७५९

Saturday 19 August 2023

कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या तीन लाखाच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न !!

कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने जिल्हा वार्षिक जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या तीन लाखाच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न !!

     बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून विपूल शेठ उभारे व एड. महेंद्र मानकर यांच्या पाठपुराव्यामुळे बोरघर येथे सुमारे तीन लाख रुपयांचे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता विपूल शेठ उभारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. 
      सदर सिमेंट कॉंक्रीड अंतर्गत रस्त्याचे काम शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद माननीय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या प्रयत्नाने व दक्षिण रायगड युवासेना जिल्हाप्रमुख विपुलशेठ उभारे तालुका प्रमुख ॲड महेंद्र जी मानकर साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजने अंतर्गत मौजे बोरघर तालुका माणगांव येथे सुमारे तीन लाख रुपये ३ लक्ष रु. सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. 
     सदर कार्यक्रमाला युवासेना तालुका समन्वयक श्रीराम कळंबे, ग्रामपंचायत सदस्य रंजना गायकवाड, ग्रा. सदस्य सुरेखा मोहें, ग्रा. सदस्य संतोष कळंबे, पत्रकार विश्वास गायकवाड साहेब, माजी विस्तार अधिकारी रमेश शिगवण साहेब, गावचे पोलीस पाटील विजय कळंबे, सेक्रेटरी दिलीप साखरे, राजेंद्र कळंबे, नारायण मांगले, सुरेश मांगले, संजय सुतार, सुभाष कालप, दत्ताराम वाघरे, किसन मोहें, सखाराम मोहें, बाळाराम जाधव, सीताराम साखरे, रोहिदास मोहें, तुकाराम मोहें, सुभाष मोरे, अशोक कासीम, पंडित शेडगे, अनंत कळंबे, दगडू सुतार, चंद्रकांत सुतार, इत्यादी बोरघर ग्रामस्थ उपस्थित होते.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत महिला कोशल्य विकास केंद्राचे उद्घाटन...

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत महिला कोशल्य विकास केंद्राचे उद्घाटन...

भिवंडी, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरात कामतघर येथे मोफत महिला कौशल्य विकास केंद्र उद्घाटन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासोबतच भिवंडी लोकसभेतील युवा कार्यकारणी पद वाटप कार्यक्रम जिजाऊ महाराष्ट्र युवक अध्यक्ष तौसिफ भुरे यांच्या नेतृत्वाखाली निलेश सांबरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी भिवंडी शहरातील निजामपूरा आझाद नगर व चांद तारा मस्जिद येथे युवक शाखा व तेली मोहल्ला व मंडई येथे महिला शाखेचे देखील उद्घाटन करण्यात आले. 

"जिजाऊ संस्था ही कोणत्याही जातीपतीचा विचार न करता माणुसकी धर्माच्या विचाराने मदत करण्याच काम करत असते. मागील पंधरा वर्षापासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती आणि रोजगार  या महत्त्वाच्या विषयांवर काम करत आहे. भिवंडी शहरातील सर्व माता-भगिनी या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिला कौशल्य विकास केंद्रांची स्थापना जागोजागी करण्यात येत आहे. त्याचबरोबर भिवंडी शहरातील गरिबी दूर झाली पाहिजे. आर्थिक सुबत्तेबरोबर चांगले आरोग्य, चांगले शिक्षण भिवंडी शहरातील सर्व गोरगरीब नागरिकांना मिळाले पाहिजे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागातून आज अधिकारी घडत आहेत. त्याप्रमाणे भिवंडी शहरातील प्रत्येक गल्ली मोहल्यातून अधिकारी वर्ग निर्माण झाला पाहिजे याकरता जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था विशेष प्रयत्न करत आहे." असे मत या प्रसंगी निलेश सांबरे ह्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिका पानवे, ज्येष्ठ पत्रकार कैलाश म्हापदी, जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख, जव्हार नगरपंचायत माजी नगराध्यक्ष गणेश रजपूत, भिवंडी लोकसभा उपाध्यक्ष गिरीश चौधरी, बोईसर विधानसभा प्रमुख नरेश धोडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Friday 18 August 2023

उज्ज्वल कांबा फाउंडेशनच्या माध्यमातून कांबा गावाचा होणार कायापालट, वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूल चा पुढाकार !

उज्ज्वल कांबा फाउंडेशनच्या माध्यमातून कांबा गावाचा होणार कायापालट, वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूल चा पुढाकार !

कल्याण, (संजय कांबा) : कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झालेल्या कांबा गावाचा येत्या तीन वर्षांत संपूर्ण पणे कायापालट होणार असून यासाठी वरप येथील सेक्रेट हार्ट स्कूल पुढाकार घेणार असून याकरिता गावातील काही सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक,जेष्ठ नागरिक, यांना घेऊन' उज्ज्वल कांबा फाउंडेशन, स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा मनोदय शाळेचे सीईओ अलबींन सर यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या वरप येथील सेक्रेट हार्ट शाळेने आतापर्यंत विविध प्रकारचे सामाजिक कामे केली आहेत, यामध्ये परिसरातील गोरगरीब,  गरजू आदिवासी यांना वैद्यकीय मदत, उल्हास नदी स्वच्छता मोहीम, रस्त्यावरील खड्डे बुजवणे,कल्याण मुरबाड महामार्गाचा प्रश्न, वृक्षारोपण, गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य, आदी विविध सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामामुळे सेक्रेट हार्ट ने आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण तालुक्यातील कांबा गावाचा कायापालट करण्याचा मनोनिश्चय केला आहे.

तसे पाहिले तर कांबा ग्रामपंचायत हद्दीत झपाट्याने नागरिक झाले आहे, अशातच ही ग्रामपंचायत औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, त्यामुळे नागरिकांना सोईसुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार ,आणि सेक्रेट हार्ट स्कूल यांच्या माध्यमातून व सहकार्यातून गावाच्या सर्वागीण विकासासाठी व उन्नतीसाठी उज्ज्वल कांबा फाउंडेशन या संस्थेची निर्मिती केली आहे.गावातील तरुणांनासाठी आधुनिक जिम, मुलांना अभ्यासाकरिता अँनिमेशन हाँल,सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कँप्युटर, मोबाईल, लँपटाँप रिपेरिंग, कोर्स उपलब्ध केले जाणार आहेत.

ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वच्छ एमआयडीसी चे पाणी मिळणार, यासाठी लवकर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे,बांधकामात भ्रष्टाचार होणार नाही याकरिता उज्ज्वल कांबा फाउंडेशन लक्ष देणार आहे. याशिवाय ग्रामपंचायती समोर निर्माण झालेला मोठा प्रश्न, कचरा, सांडपाणी, याकरिता फाउंडेशन प्रोसेसिंग प्लाँट उभारण्यात येणार आहे. परीसरातील लोकांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून प्राथमिक मेडिकल सेंट्रल बनविण्यात येणार असून सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जे राजकारणी, लोकप्रतिनिधी आपल्या स्वतः च्या स्वार्थासाठी तरुण पिडिला व्यसनाच्या नादी लावत आहेत अशा बरबाद होत असलेल्या तरुणांसाठी नशामुकती केंद्र सुरू केले जाणार आहे. तसेच आशा राजकारणी लोकांचे विडिओ सोशलमिडियातून व्हायरल केले जाणार आहे, यामुळे अशा वाईट घटनांना आळा बसेल, अशा प्रकारे कांबा गाव ठाणे जिल्ह्यातील आदर्श गाव निर्माण करण्यासाठी उज्ज्वल कांबा फाउंडेशन काम करणार आहे. याकरिता ३ वर्षाचा कालावधी निश्चित केला आहे. याबाबत शाळेचे सीईओ अलबींन अंन्थोनी यांना विचारले असता ते म्हणाले, उज्ज्वल कांबा फाउंडेशन च्या माध्यमातून हे गाव सुजलाम सूफलाम करायचे आहे, याकरिता फाउंडेशन खर्च करणार आहे, याकरिता मी कोणत्याही प्रकारचा पुरस्कार, बक्षीस, स्विकारणार नाही, ना श्रेय घेणार,ना मी मेहरबानी करत नाही, तर केवळ माझी गावाप्रती, समाजाप्रती, लोकाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी पोटी हे करत आहे. असे त्यांनी सांगितले.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...