रमाई म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. पददलितांच्या आई, रमाईंचे २७ मे १९३५ रोजी निधन झाले. स्मृतिदिनानिमित्त रमाईंना विनम्र भावशब्दांजली....- रविंद्रदादा जाधव
नाशिक (प्रतिनिधी) -अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय नाशिक येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. उपस्थितीतांना मार्गदर्शनपर छोटेखानी भाषणात रविंद्रदादा जाधव म्हणाले की.....महामानव डॉ. बाबासाहेबांच्या कठीण काळात पत्नी रमाबाईंनी त्यांना खंबीर साथ दिल्यानेच बाबासाहेब हे अस्पृश्यांच्या जीवनोत्थानासाठी कार्य करू शकले. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना रमाईंनी सोसलेल्या गरिबीच्या चटक्यांचा, प्रसंगी आपल्या ईच्छा-अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही. रमाबाईंचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी दापोली जिल्ह्यातील वणंदगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब महार कुटुंबात झाला. त्यांची आई त्यांना प्रेमाने रामी म्हणायच्या. रमा लहानपणापासूनच खूप समझदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई-वडिल मरण पावले. लहानपणीच आई-वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली रमा तिच्या भावंडासोबत मामाकडे मुंबईला राहायला आली.
त्या काळामध्ये अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी भिवासाठी रमाची निवड केली. रमा अवघ्या नऊ वर्षांच्या असताना १९०७ मध्ये मुंबईतील भायखळा येथे त्यांचा भीमरावांशी विवाह झाला. रामी. बाबांची रामू, रामजी बाबांची लाडकी सून रमा झाली.
महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांनी अभिवादन प्रसंगी केले ते पुढे म्हणाले की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मग ती आई किंवा पत्नी असू शकते. बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर कदाचित भिवाचा भीमराव झाले नसते. स्त्री ही जशी गृहिणी तशी सुसंस्कारीत समाज निर्माण करणारी माताही आहे. युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात, दारिद्र्यांच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढणारी, सहचारिणी पत्नी रमाई म्हणजे चारित्र्याची मंगल प्रतिमाच होती.
बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात रमाईने खूप हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. रमाईची मुले औषधांविना मरण पावली. रमाईने अपार कष्ट केले. शेणाच्या गोवऱ्या थापल्या. त्या विकून आलेला पैसा घरखर्चासाठी तसेच बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी खर्च करीत. एक काडीपेटी महिनाभर चालवित. रमाईला शेजारच्या महिला दागिण्यांवरून चिडवित असत. तेंव्हा रमाई म्हणत, ‘माझा दागिणा म्हणजे माझं कुंकू. माझं सौभाग्य असे आहे की ज्याची ख्याती साऱ्या विश्वाला ठाऊक आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठेपणाचं असं नेमक्या शब्दात वर्णन करणाऱ्या रमाईंचं हृदय किती संवेदनशील असेल याची आपणास प्रचिती येते. त्यांच्यातील या सोशिक वृत्तीमुळेच बाबासाहेब आंबेडकर घडू शकलेत. बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईंना नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा बाबासाहेबांनाच मिळालेला फेटा लुगडं म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी ही शोकांतिका. एक बॅरिस्टर आपल्या पत्नीला एक लुगडं घेऊन देऊ शकत नव्हते. त्याच बाबासाहेबांमुळे आज आपण चांगले वस्त्र अंगावर परिधान करीत आहोत.
रमाबाई खूप धार्मिक होत्या. रमाईंनी एकदा पंढरपूरला जाण्याचा हट्ट केला तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, ‘जे पंढरपूर भक्तांना देवाच्या मूर्तीपासून दूर लोटते तिथे जाण्यापेक्षा आपल्या उभयतांच्या पुण्याईने, स्वार्थत्यागाने, दलितांच्या सेवेने आपण दुसरे पंढरपूर निर्माण करू आणि आज आपल्या पुढे ते दीक्षाभूमीच्या रूपात नागपूरमध्ये मोठ्या अभिमानाने आणि डौलाने उभे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाखातर रमाई लिहिण्या-वाचण्यास शिकल्या. त्यानंतर बाबासाहेबांच्या सोबतीने त्यासुद्धा समाजजागृतीसाठी महिलांच्या सभांचे आयोजन करीत असत. त्यांच्या समोर भाषणे देऊन दलित चळवळीत सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना प्रेरीत करीत असत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेण्यासाठी दूरदेशी असताना रमाई आंबेडकरांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गरिबीचे चटके सोसत संसार सांभाळला. अशा पददलितांच्या आई - रमाईंचे २७ मे १९३५ रोजी वयाच्या ३७व्या वर्षी निधन झाले. माता रमाईंना आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली चा कार्यक्रम अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रविंद्रदादा जाधव यांनी भुषवले तर प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तर महाराष्ट्राचे नेते वसंतराव वाघ, ममता पुणेकर, जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण, जिल्हा सहचिटणिस मनिषा म्हसदे, जिल्हा उपाध्यक्ष मनिषा पवार, महेश जाधव, विनोद भोसले, प्रकाश कुमावत, वैशाली जाधव, मंगला बच्छाव, विशाल पाटील, कल्पना जगताप, आदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर अभिवादन सभेचे सुत्रसंचालन मनिषा म्हसदे यांनी केले शेवटी ममता पुणेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करुन छोटेखानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
----------
*... ✍️ महेंद्र तथा अण्णा पंडित.*
राज्य-सचिव, *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.*