Saturday, 30 May 2020

अजितदादांनी 'त्या' फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटात केली सही !

*....अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली.*

मुंबई : अजितदादा पवार ( Ajit Pawar ) चर्चगेट येथील आपल्या ‘प्रेमकोर्ट’ या खासगी निवासस्थानी होते. तेवढ्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा फोन येतो. टोपे एका फाईलसंदर्भात अजितदादांना माहिती देतात. थोड्या वेळातच एक अधिकारी ती फाईल घेऊन इमारती खाली येतो.
अजितदादांनी ( Ajit Pawar ) शिपायाला पाठवून दिले, अन् अधिकाऱ्याकडील ती फाईल वर मागवून घेतली. फाईल समोर येताच अजितदादांनी एका मिनिटातच सही केली, अन् शिपायाकरवी परत त्या अधिकाऱ्याकडे पाठवून दिली.

‘अजितदादांना ( Ajit Pawar ) फाईल वाचून सही करायला वेळ लागेल’ असे इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या अधिकाऱ्याला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. अजितदादांनी एका मिनिटांत सही केली होती, अन् पाच मिनिटांच्या आत ती फाईल परत संबंधित अधिकाऱ्याच्या हातात आली होती.

लोकांच्या हिताचा निर्णय असेल तर फार रवंथ लावायचा नाही. धडाक्यात निर्णय घेऊन मोकळे व्हायचे, हा अजितदादांचा ( Ajit Pawar ) स्वभाव अनेकांना ठाऊक आहे. आपल्या स्वभावाला साजेशा अशा पद्धतीनेच अजितदादांनी ( Ajit Pawar ) फाईलचा विषय झटकन मार्गी लावून टाकला.

त्यानंतर ते अधिकारी रात्री मुख्यमंत्र्यांकडे फाईल घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांकडे कामाचा मोठा व्याप आहे. ‘कोविड’ संदर्भात सतत लोकांचे फोन येत असतात. ऑनलाईन बैठका चालू असतात. पण ही फाईल महत्वाची होती. फाईल आल्याचे समजताच त्यांनी त्यावर जेमतेम दहा – पंधरा मिनिटांत स्वाक्षरी केली.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज शनिवारी ही बातमी लिहित असताना शासकीय आदेश (जीआर) जारी करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाचक ही बातमी वाचत असतील तेव्हा जीआर जारी झालेलाही असेल.

या अतिशय महत्वाच्या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचा लाभ राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 12 कोटी जनतेला मिळू शकणार आहे.

‘कोरोना’ आपत्तीमुळे लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे केवळ ‘कोरोना’च नव्हे, तर अन्य सगळ्या आजारांवर सुद्धा मोफत उपचार झाले पाहीजेत, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची दुर्दम्य इच्छा होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याशी चर्चा केली, अन् त्यांची संमती मिळविली.

मंजुरीचे सोपस्कार पार पडले, अन् आज त्या योजनेच्या अंमलबजावणीचा आदेश जारी होण्याचा मार्ग मोकळा झाला.

या निर्णयामुळे राज्यातील सर्व लोकांना फायदा होणार आहे. विशेषतः ‘कोविड’च्या या काळात काम करणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी व इतर सगळ्या कर्मचाऱ्यांनाही मोफत लाभ मिळणार आहे. पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना अगोदर खर्च करावा लागायचा, आणि नंतर पैसे मिळायचे. आता पूर्णपणे मोफत लाभ मिळणार आहे. यापूर्वी 85 टक्के लोकांचा योजनेत समावेश होता. आता 100 टक्के लोकांना सामावून घेण्यात आले आहे

– राजेश टोपे, आरोग्य मंत्री
या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचा लाभ राज्यातील सगळ्या लोकांना घेता येणार आहे. पूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात लोकांना ही सुविधा मिळणार आहे. तब्बल 1200 आजारांचा यांत समावेश आहे. राज्यातील निवडक 1000 रूग्णालयांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.


No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...