Saturday 30 May 2020

पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून टेलिमेडिसीनची सेवा !

पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या माध्यमातून टेलिमेडिसीनची सेवा !



पिंपरी ३० मे २०२० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेच्या ॲपचे लोकार्पण महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
महापालिका भवनातील कोरोना वाॅर रूम मध्ये झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर,उपमहापौर तुषार हिंगे,पक्षनेते नामदेव ढाके,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डाॅ पवन साळवे,डाॅ वर्षा डांगे,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण,सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

या सुविधेमध्ये नागरिकांमध्ये दिसत असलेल्या ताप, खोकला, थकवा, वेदना इत्यादी लक्षणांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नावली आहे. तसेच संबंधित नागरिकाने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने कुठे कुठे प्रवास केला आहे इत्यादी माहिती ॲपमध्ये संकलित केली जाते. सदर माहितीचे विश्लेषण करून नागरिकांना कोरोनाचा कितपत धोका आहे, याची माहिती दिली जाते. या टेलिमेडीसीन सुविधेचा उपयोग करून नागरिक तज्ञ डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकतात. नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून डॉक्टरांची वेळ घेतल्यानंतर त्या वेळेमध्ये नागरिक डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. यामुळे नागरिकांना घरबसल्या योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरोना साथीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये घरातच राहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इंडस इंड बँक आणि सकाळ रिलीफ फंड यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...