सोलापूरच्या उपमहापौराला अटक करण्यापूर्वीच 'शिंकली माशी' ! तपास अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश.
पुणे – सांगवीतील एकच फ्लॅट अनेकांना विकून फसवणूक केल्याच्या प्रकरणात एक वर्षापासून पोलिसांना हवा असलेला सोलापूरचा विद्यमान उपमहापौर राजेश काळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला खरा, पण कुठे तरी ‘माशी शिंकली’ आणि अटक होण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला केवळ नोटीस देऊन सोडून दिले. या प्रकरणी तपास अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असल्याने वरिष्ठांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत काळे याला कोणत्याही आजार अथवा आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र अटकेची प्रक्रिया सुरू असताना त्याला अचानक शिंका येऊ लागल्या आणि ताप आला. ही कोरोनाची लक्षणे असल्याने आरोपीला नोटीस देऊन संध्याकाळी पाचच्या सुमारास सोडण्यात आल्याची सारवासारव करण्यात येत आहे. काळे याने कोरोनाच्या लक्षणांचा बहाणा करून पळ काढला आणि पोलिसांनी त्याला मदत केली, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. ही गोष्ट वरिष्ठाच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तपास अधिकारी फौजदार आर. एस. पन्हाळे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
उपमहापौर काळेने एक फ्लॅट अनेकांना विक्री केल्या प्रकरणी मे २०१९ मध्ये गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो फरार होता असे पोलिसांचे म्हणणे होते, पण दुसरीकडे काळे सोलापूर उपमहापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान होता. सांगवी पोलिस उपमहापौर काळे याला ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले होते. सांगवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काळे यांना रात्री ताब्यात घेतले आणि त्याला पिंपरी-चिंचवडला घेऊन आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आणल्यानंतर काळे याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा काळेला कोणताही आजार अथवा कोरोनाची कोणतीही लक्षणे डॉक्टरांना आढळून आली नाहीत. सांगवी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत काळेची चौकशी व अटकेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मात्र काळेला अचानक ताप चढला, शिंका आणि खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणे असल्याचे कारण पुढे करत काळे याला अटक करण्यापूर्वीच आज (शनिवारी) संध्याकाळी पाच वाजता नोटीस बजावून सोडून देण्यात आले.
अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळेला ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळेने कोरोनाची लक्षणे वाटत असल्याचे पोलिसांना सांगितले आणि पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवून काळेला नोटीस देऊन सोडून दिले. काळेला खरंच ताप, शिंका, खोकला आला होता का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
ताब्यात घेतल्यापासून काळेला सोडून देण्यापर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मागवला आहे. दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर काळे याचा मोबाईल फोन बंद असल्याने या प्रकरणात पोलिसांवरील संशय आणखीच बळावला आहे. काळेला कोरोनाची लक्षणे असली तरी त्याने फोन बंद ठेवण्याचे कारण काय, यासह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
No comments:
Post a Comment