लाॅकडाऊन मुळे या वर्षी माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत !
शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment