वृत्तपत्र विक्रेत्याने सापडलेले ५० हजारांचे सोने केले परत.
चिखली,पुणे -
चोऱ्या, विश्वासघात, पैशांसाठी हाणामारी, पैशांमुळे नात्यांमध्ये पडणारी दरी अशा घटना नित्याच्या बनल्या आहेत. एखादी किरकोळ वस्तू सापडली तरी तिला लपवून ठेवण्याचे प्रकार देखील घडत आहेत.
अशात एका वृत्तपत्र आणि दूध विक्रेत्याने त्यांना सापडलेले ५० हजार रुपयांचे सोने मूळ मालकाला परत करून समाजात नैतिकता, विश्वास, चांगुलपणा शिल्लक असल्याचे दाखवून दिले.
शिवानंद चौगुले असे या प्रामाणिक व्यावसायिकाचे नाव आहे. शिवानंद हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावचे रहिवासी आहेत.
मागील अनेक वर्षांपासून ते पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. मागील सुमारे २५ वर्षांपासून ते शहरात वृत्तपत्र आणि दूध वितरणाचे काम करत आहेत.
नुकतेच शिवानंद यांना त्यांच्या दुकानात एक सोन्याचे ब्रेसलेट सापडले. ते कुणाचे आहे, कोणकोण दुकानात आले होते, असा विचार त्यांच्या मनात सुरू होता.
त्याअनुषंगाने त्यांनी चौकशी देखील सुरू केली. काही वेळाने चौकशी सुरू असताना त्यांच्या एक ग्राहक प्रतिमा कुलकर्णी या शिवानंद यांच्या दुकानात आल्या.
त्यांनी त्यांचे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट हरवल्याची माहिती शिवानंद यांना दिली आणि त्यांचे ब्रेसलेट कुठे दिसले का? अशी चौकशी सुद्धा केली.
त्यानंतर शिवानंद यांनी कुलकर्णी यांचे सोन्याचे ब्रेसलेट त्यांना दुकानात सापडल्याचे सांगत ब्रेसलेट कुलकर्णी यांच्या ताब्यात दिले.
शिवानंद यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल आणि आपली किमती वस्तू आपल्याला सुखरूप परत मिळाल्याबद्दल कुलकर्णी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
No comments:
Post a Comment