Saturday 30 May 2020

पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत !

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जण अटकेत !

विश्रांतवाडी, पुणे - खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण आठ जणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच आरोपींकडून गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि दोन आलिशान मोटारी व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेने विश्रांतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी ( वय-३६, रा. भोसरी), आझाद शेखलाल मुलाणी ( वय-३०, रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे ( वय-२१, रा. निगडी), मुबारक बबन मुलाणी ( वय-३८, रा. चिखली), संदीप किसान गरुड ( वय ४०, रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय ४३, रा. मुळशी), सिराज राजू मुलाणी ( वय-२२, रा. मुळशी) आणि विनोद नारायण माने ( वय-२६, रा. मुळशी), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील शिपाई सोमनाथ खडसोळे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर मुलाणी आणि जमीर मुलाणी हे खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात बंदिस्त होते. त्यांची शुक्रवारी रात्री पॅरोलवर सुटका करण्यात आली.

त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि मित्र मोटारी आणि दुचाकींसह तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टन्सचे पालन न करता विश्रांतवाडीच्या दिशेने निघाले होते. ही रॅली विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर आरडाओरडा करीत जात होती.

त्यावेळी विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड आणि त्यांच्या पथकाने तातडीने रॅलीचा पाठलाग केला. फुलेनगरजवळ आरटीओ चौकात ही रॅली अडवून वाहनांची तपासणी केली.

त्यावेळी एका गाडीतून एक गावठी पिस्टल, ५ जिवंत काडतुसे, लोखंडी बार आणि फॉरचूनर, स्कॉर्पिओ आणि एक स्विफ्ट कार जप्त केली. अटक केलेल्या आरोपींविरोधात बेकायदा गर्दी जमवून दंगल माजविण्याचा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कोविड 19 आणि जमावबंदी कायद्याच्या भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...