जठरात अडकलेली उघडी 'सेफ्टीपीन' दुर्बीणीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश.
पिंपरी – एका ५५ वर्षीय पुरुषाने नकळतपणे गिळलेली ‘सेफ्टीपीन’ एन्डोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून बाहेर काढण्यास पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयाच्या डाॅक्टरांना यश मिळाले आहे.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ५५ वर्षीय पुरुष रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा बाह्यरुग्ण विभागात दाखल झाले होते. रुग्णालयात दाखल होण्याच्या तीन दिवसापूर्वी जेवण करताना नकळत या रुग्णाने ‘सेफ्टीपिन’ गिळली होती.
रुग्णाचा एक्सरे केला असता ही सेफ्टी पिन जठरामध्ये अडकून बसली असल्याचे सिद्ध झाले. म्हणून तातडीने या रुग्णाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी ती सेफ्टी पिन उघडी असल्याचे दिसून आले. जठरात उघडी असलेली ही सेफ्टी पिन जठराला इजा करू शकते म्हणून ती लवकर बाहेर काढणे गरजेचे होते.
शल्य चिकित्सक डॉ. विरेंद्र आठवले यांच्या देखरेखीखाली या रुग्णाची मेडिकल
गेस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल डहाळे यांनी तातडीने एन्डोस्कोपी केली व कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता उघडी ‘सेफ्टीपिन’ बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.
सदर रुग्ण सुखरूप असून त्यांना दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत शल्य चिकित्सा विभागाने प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अश्या गुंतागुंतीच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आमच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात करण्यात येत असून आमच्याकडे अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील यांनी या प्रक्रियेत सहभागी डॉक्टरांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment