शिक्षणासाठी दूरदर्शनचे १२ तास तर रेडिओचे २ तास द्या ; वर्षा गायकवाड़ यांची केंद्र सरकारकडे मागणी !
मुंबई - विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूरदर्शनचा १२ तर रेडिओचा २ तासांचा वेळ राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत केंद्र सरकारला मागणी करणारे पत्र पाठविले आहे.
कोरोनामुळे राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने प्रत्यक्ष शाळा न सुरू करता, आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टीव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे देण्याची तयारी केली असल्याचे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे.
त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून २ तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचं प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,’ असे गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते.पैकी या पॅकेजची सविस्तर माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १२ नवीन टिव्ही चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
No comments:
Post a Comment