विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !!
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं' हे अधोरेखित करणाऱ्या विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मराठी माध्यमात करण्यात आले होते.
मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात भाषा' हा दर्जा टिकवण्यासाठी उत्कर्ष विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग नेहमीच प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांना मातृभाषा बोलता यावी यासाठी केवळ मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त पुरेसे नाही तर उत्कर्ष विद्यालयात वर्षभर प्रयत्न केले जातात. पथनाट्य, शब्दखेळ, कविता व गीत गायन, सामुदायिक पसायदान यांतून मराठी भाषेचा गौरव करून मराठी भाषा कशी टिकवावी याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम यांच्या नियोजनानुसार शाळेत नेहमीच मराठी भाषा संवर्धनात्मक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर कार्यक्रमासाठी शाळेत भाषा शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले.
No comments:
Post a Comment