Sunday, 31 May 2026

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

ठाणे, प्रतिनिधी :
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवाती चे वातावरण हलके-फुलके आणि संवादात्मक करण्यासाठी "आइस ब्रेकिंग गेम" ने करण्यात आली. "Passing the Sentence" या खेळामध्ये एका महिलेच्या कानात एक वाक्य सांगण्यात आले आणि तेच वाक्य पुढील सहभागीच्या कानात सांगण्यास सांगितले गेले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्या वाक्यात झालेला बदल सर्वांसमोर मांडण्यात आला. या उपक्रमातून माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्यामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, याची जाणीव सहभागी महिलांना करून देण्यात आली,ह्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पवन जोहारे  ह्यांनी ही माहिती दिली.

जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील महिला, मुले आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल बनसोडे ह्यांनी सागितले.

कार्यक्रमाच्या मुख्य सत्रामध्ये संस्थेच्या सदस्या अस्मिता कहाळे यांनी महिलांशी संवाद साधत मासिक पाळीविषयी चर्चा सुरू केली. त्यांनी उपस्थित महिलांना आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळीची पहिली तारीख, तसेच पाळीबाबतची पहिली माहिती त्यांना कोणी दिली, असे प्रश्न विचारून विषयाची सुरुवात केली. या संवादातून महिलांच्या अनुभवांना वाव मिळाला आणि अनेकांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले.यानंतर त्यांनी मासिक पाळीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीची सुरुवात कशी होते, मासिक पाळीचे चक्र कसे असते, पाळी किती दिवस येणे सामान्य मानले जाते, तसेच सॅनिटरी पॅडचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच मासिक पाळी ही कोणतीही लाजिरवाणी किंवा वाईट गोष्ट नसून ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांनी आणि मुलींनी या विषयाबाबत खुलेपणाने बोलणे आणि योग्य माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेशही देण्यात आला, महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्तन कर्करोग (Breast Cancer) यावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, त्याची वेळेत ओळख का महत्त्वाची आहे, तसेच महिलांनी स्वतः घरच्या घरी स्तनांची तपासणी कशा प्रकारे करावी याबाबत माहिती देण्यात आली. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास स्तन कर्करोगावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते, याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली,अशी माहिती अस्मिता कहाले यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी शंकांचे निरसन करून घेतले. महिलांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम समाजात आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत संस्थेची सदस्य श्वेता पाटील ह्यांनी व्यक्त केले. अशी माहिती सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय भोसले यांनी दिली.

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान; शासकीय योजनांचा लाभ घेऊन नवे उद्योग उभारा - महाराष्ट्र  वस्त्रद्योग मंत्री संजय सावकारे

“जागतिक संधींसाठी सक्षम आणि उद्योजकतेकडे वाटचाल करणारे विद्यार्थी तयार करणे हेच आमचे ध्येय” – संचालिका संगीता पाटील

जळगाव, दि. 30 मे 2026 (राहुल बैसाणे) :
एन. आय. एफ. ग्लोबल - संगीता अकॅडेमी, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फॅशन व इंटिरियर डिझाईन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाळा काळे व संचालिका संगीता पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वस्त्रोद्योग क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे महत्त्व व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवउद्योजकांनी उद्योग उभारावेत व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले, तसेच बोलताना सावकारे यांनी जळगावसारख्या शहरात एन. आय. एफ. ग्लोबलसारखी संस्था कार्यरत असून येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. गेल्या 21 वर्षांत संस्थेने 15 हजारांहून अधिक विद्यार्थी घडविले असून, त्यापैकी अनेकांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लॅक्मे फॅशन वीक, लंडन फॅशन वीक, न्यूयॉर्क फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीक यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्यासपीठांवर जळगावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून शहराचे नाव देश-विदेशात पोहोचविले असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी फॅशन आणि डिझाईन क्षेत्रात करिअरच्या वाढत्या संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी एन. आय. एफ. ग्लोबल- संगीता अकॅडेमीच्या कार्याचे तसेच संस्थेचे शिक्षकवृंद व संचालिका संगीता पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे असून त्यांना मोठी प्रेरणा देतात, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी अकॅडेमीच्या 21 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर उद्योगक्षेत्राशी जोडणारे व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इंटिरियर डिझाईन मधून मुकेश तोष्णीवाल, योगिता शर्मा, रितेश तुलसाणी, चार्मी नथाणी, विराज पटेल, पार्थ पटेल, अक्षता बखतवाणी, फिल्झा शेख, मयूर जाधव,सप्रसाद अकोले, जयेश जैन, पूजा बोरसे, अंजली जोशी, रुपेश पाटील, प्रफुल चौधरी, रितू मकडीया, कोमल ओझा, खुशी डहाळे, मयूर हिंगे, आचल बयास, झैन पटेल, शुभांगी वानखेडे, शारिक हुसेन, विवेक दांडगे, मानस जैन, चचंल साहित्या, तन्मय बेलोकार, खुशबू पाटील, चैताली चौधरी, रिया चोथवे, निशांत चवराई, विवेक सपाटे, शुभम गोरे, विशाल मधयानी, आयुष पटेल, विवेक सोनार, प्रज्वल अग्रवाल, रोहित साहनी, कार्तिक पटेल, पूजा पाटील, कार्तिक जैन, हर्षल सिखवाल आणि फॅशन डिझाईन मधून स्नेहा मोरे, मयुरी बोहरे, शेजल गोपालदास, मानसी मलिचकर, रुणाली पाटील, तानिया कुकरेजा, भुवनेश्वरी करंकाल, दिव्यानी देशमुख, कोयल कोळी, स्नेहल ब्राह्मणकर, अरुण अर्जुन भिल, केसर जोशी, नेहा देसले, भाग्यश्री ठाकूर, अनम अन्सारी या गुणवंत विद्यार्थ्यांना “अचिव्हर्स अवॉर्ड 2026” प्रदान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशोगाथांनी उपस्थितांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मानसी जैन व तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सेदुलक्ष्मी मलबारी यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहात पार पडला असून, जळगावच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या यशाचा अभिमान व्यक्त करण्याचा हा संस्मरणीय क्षण ठरला.

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण !

नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादावर काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांचे स्पष्टीकरण !

“ही निवड जनभावनेतून; कोणत्याही शिफारशीमुळे नाही” — नाराज गटाच्या भूमिकेचेही केले स्वागत

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) ::पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनंतर सुरू झालेल्या वाद आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी पत्रकार आणि वृत्तवाहिन्या शी बोलताना प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आपली नियुक्ती ही कोणत्याही शिफारस किंवा वशिल्यामुळे नसून पक्षातील अनुभव, कार्यकर्तृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जनभावनेच्या आधारे झाल्याचा दावा त्यांनी केला.
             श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेल तसेच उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेस पक्षाकडून तिन्ही ठिकाणांसाठी जिल्हाध्यक्ष पदाकरिता अर्ज प्रक्रिया जाहीरपणे राबविण्यात आली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी रायगड आणि पनवेल परिसरात निरीक्षण दौरे आणि इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या प्रक्रियेनंतरच पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या नियुक्तीमागे कोणत्याही नेत्याची शिफारस किंवा वशिला नाही. पक्ष संघटनेतील कामाचा अनुभव, सातत्याने केलेले कार्य आणि कार्यकर्त्यांच्या भावनेतून मला ही जबाबदारी मिळाली आहे,” असे श्रुती म्हात्रे यांनी म्हटले आहे.
              पनवेल काँग्रेसमधील नाराज गटाने मुंबईतील ‘टिळक भवन’ येथे जाऊन निवडीविरोधात आक्षेप नोंदविल्याबाबत बोलताना त्यांनी संयमी भूमिका घेतली. “प्रत्येकाची महत्वाकांक्षा वेगळी असते. त्यामुळे काही कार्यकर्ते टिळक भवन येथे गेले असतील. मात्र, ते माझेच बंधू आहेत. त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. न्याय जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे,” असे त्या म्हणाल्या.


चौकट:

“रीचेकिंगनंतरच निकाल अधिक स्पष्ट होतो”-
            सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी, “रीचेकिंगनंतरच निकाल अधिक चांगला समजतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर काही बदल किंवा निर्णय झाले, तर त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल,” असे सूचक वक्तव्य केले. तसेच निषेधाच्या माध्यमातून काही लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. “२० मे रोजीच आम्हाला पदांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मला भेटून गेले होते,” असा दावा त्यांनी केला.


चौकट:

पदभार स्वीकारल्यानंतर आंदोलनात सहभाग-

           श्रुती म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आयोजित करण्यात आले. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात सहभाग घेतला. “पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही एकत्रितपणे आंदोलन केले. संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला !!

चाणजेत हातभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा : दोन तासांत दोन गुन्हे, ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; ६२ वर्षीय म्हात्रे पुन्हा अडकला !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
 नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे अवैध हातभट्टीवर धडक कारवाई करत दोन तासांच्या अंतराने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६२ वर्षीय हिरामण काशिनाथ म्हात्रे याला दोन्ही गुन्ह्यांत आरोपी करण्यात आले आहे. 

पहिली कारवाई दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली. रवि दामोदर म्हात्रे यांच्या मालकीच्या जागेत, चाणजेगाव येथे हिरामण काशिनाथ म्हात्रे हा गावठी दारू गाळताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११५७/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून २०० लिटर क्षमतेचे ८ निळे ड्रम, त्यात गूळ-पाणी मिश्रित अंदाजे २०० लिटर द्रावण, अल्युमिनीअमची टाकी, खुंडी, पातेले, लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हिरामण म्हात्रे याने सदरचे काम रवि दामोदर म्हात्रे याच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली. रवि म्हात्रे अद्याप फरार आहे.

त्यानंतर अवघ्या दोन तासांनी, रात्री ८:४० वाजता त्याच जागेवर पुन्हा छापा टाकण्यात आला. यावेळी हिरामण म्हात्रे हाच अनिल म्हात्रे याच्या सांगण्यावरून दारू गाळताना आढळला.गु.र.नं. १५८/२०२६ अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी २०० लिटरचे ७ ड्रम, गूळ-पाणी मिश्रित द्रावण, अल्युमिनीअम टाकी, स्टील टाकीचा लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा २७,५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अनिल म्हात्रे फरार आहे.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने आरोपी हिरामण म्हात्रे याला बीएनएसएस ३५(३) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले. दोन्ही घटनास्थळी वपोनि अनिल पाटील, पोउपनिरी अभिजीत देशमुख व गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. सपोनि राजेश खांदवे हे तपास अधिकारी आहेत.

एकाच रात्री, एकाच जागेवर, एकाच आरोपीला दोन वेगवेगळ्या मालकांसाठी दारू गाळताना पकडल्याने उरण तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे पुन्हा चर्चेत आले आहे. गुन्हे शाखेच्या सलग कारवाईमुळे हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत

महिलांच्या विविध समस्यांबाबत रूचिता नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांची घेतली भेट....

महिलांच्या विविध समस्यांबाबत रूचिता नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांची घेतली भेट....

नालासोपारा ता, ३० :- बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी नालासोपारा शहरातील विविध प्रभागातील महिलांना घेऊन आज महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट देऊन आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. त्यांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांमार्फत तातडीने पाठपुरावा करून लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी असून नालासोपारा शहराचा सर्वांगीण विकास आणि सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बहुजन विकास आघाडी कटिबद्ध आहोत.

एन आर सी कामगारांचा नव्या कराराला तीव्र विरोध !!

एन आर सी कामगारांचा नव्या कराराला तीव्र विरोध !!

"200 कोटींची भीक नको, न्याय हक्क हवा" – कामगारांचा निर्धार

कल्याण, संदीप शेंडगे : मुंबई येथे पार पडलेल्या मॅनेजमेंट आणि कामगार युनियन यांच्या बैठकीत कामगारांसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याचे वृत्त समोर आले होते. एन.आर.सी कंपनीतील नव्या वेतन कराराविरोधात कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात कामगार एकजूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकत्याच महादेव मंदिर यादव नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या बैठकीत शेकडो कामगार उपस्थित होते नव्या कराराचा निषेध करत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत उपस्थित कामगारांनी "200 कोटींची भीक नको, आमच्या हक्कांचा योग्य मोबदला द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नव्या करारामुळे कामगारांचे आर्थिक आणि सेवा विषयक नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अनेक वर्षे वाट पाहून कामगारांच्या पदरात जर काहीच पडत नसेल तर असा करार काय कामाचा असा सवाल कामगार नेते भीमराव डोळस माजी नगरसेवक जे.सी कटारिया शाहीर अर्जुन पाटील, अविनाश नाईक या कामगारांनी उपस्थित केला

कामगारांनी एन आर सी मजदूर संघावरही गंभीर आरोप करत संघटनेच्या भूमिकेमुळे कामगारांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला. "कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी संघटनेने व्यवस्थापनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून त्यामुळे हजारो कामगारांची वाट लागली आहे," अशी टीका बैठकीत करण्यात आली.

विशेष म्हणजे या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या प्रतिमा झळकत होत्या. कामगारांनी केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

कामगार नेत्यांनी सांगितले की, कामगारांच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही करार स्वीकारला जाणार नाही. आगामी काळात मोठ्या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी विविध बैठका घेण्यात येणार असून सर्व कामगारांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

Thursday, 28 May 2026

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध !

मोहने येथील एन.आर.सी. कामगारांचा नवीन कराराला तीव्र विरोध !

अदानी समूहासोबतच्या बैठकीनंतर कामगारांमध्ये संताप

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या वीस वर्षापासून मोहने येथील एनआरसी कारखाना बंद असून कामगारांना अद्याप त्यांची हक्काची देणी मिळालेली नाहीत. एनसीएलटी कोर्ट मुंबई आणि दिल्ली येथे कामगार न्यायालयात कामगारांच्या न्याय हक्कासाठी आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कामगारांच्या बाजूने लढा देत आहेत. हा लढा अंतिम टप्प्यात आला आहे. 

कामगार युनियन च्या माध्यमातून कामगारांची देणी देण्यासंदर्भात कामगारांच्या प्रतिनिधींची नुकतीच मुंबई येथे एन.आर.सी युनिट अदानी व्यवस्थापना सोबत पार पडलेल्या बैठकीत आयटक आणि महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रतिनिधी म्हणून एस. शुक्ला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगार विरोधी करार पाहून शुक्ला यांनी या कराराला विरोध केला. 

या नवीन करारानुसार  कामगारांवर अन्याय होत असल्याचे स्पष्ट करत शुक्ला यांनी कराराला कडाडून विरोध केला. प्रतिनिधी म्हणून एस शुक्ला उपस्थित असल्याने घडलेला प्रकार समोर आला असून या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या बैठकीमुळे कंपनी व्यवस्थापन आणि काही संघटनांमध्ये संगनमत झाल्याची चर्चा कामगारांमध्ये जोर धरू लागली आहे. तसेच हा करार संगनमताने झालेला असून कामगार विरोधी असल्याचे कामगारांचे मत कामगारांनी व्यक्त केले. आयटक आणि एनआयसी मजदूर संघ यांनी केलेला करार हा सर्वसामान्य कामगारांच्या हिताला बाधा आणणारा असून, यामध्ये कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही ठोस भूमिका आणि कामगारांचे हित नसल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. इतकी वर्ष वाट पाहून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हा करार आम्हाला मान्य नसल्याचे कामगारांनी सांगितले

दरम्यान, कामगार नेते भूषण सामंत यांच्या नेतृत्वावर कामगारांनी मोठा विश्वास व्यक्त करत अनेक कामगार संघटना भूषण सामंत यांच्या युनियनच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. “कामगारांच्या हक्कांसाठी लढा देणारे नेतृत्व म्हणून भूषण सामंत यांच्यावर आमचा विश्वास आहे,” अशी भावना अनेक कामगारांनी व्यक्त केली. 

भूषण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती एन.आर.सी. कामगार नेते अरविंद पाटील आणि शाहीर अर्जुन पाटील, निलेश पाटील, वासुदेव पाटील, गौतम भंडारी, भगवान पाटील, अरुण पाटील. यांनी दिली.
त्यामुळे आगामी काळात एन.आर.सी. परिसरातील कामगार चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कुर्बानीचे रूप नवे' अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी !

कुर्बानीचे रूप नवे' अंतर्गत रक्तदान करून ईद साजरी !
-- अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अभिनव उपक्रम!

सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून, गेली बारा  वर्षे चालणाऱ्या 'कुर्बानीचे रूप नवे ' या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल सातारा इथे रक्तदान करून ईद साजरी केली.

या वेळी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना अंनिस कार्यकर्ते मोहसीन शेख म्हणाले की," ईद उल अजहा हा कुर्बानी देण्याचा सण आहे. आपल्याला प्रिय गोष्ट कुर्बान करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. बोकडाला बळी देवून हा सण साजरा पेक्षा रक्तदान करून सण साजरा करणे जास्त विधायक पर्याय आहे. मला हा विचार पटल्याने मी गेली अकरा वर्षे अंनिस कार्यकर्ता म्हणून ईद हा सण रक्तदान करून साजरा करत आहे. त्याला मुस्लिम धर्मीयांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे ही स्वागतार्ह बाब आहे. अंनिस फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक होळी, पर्यावरण पूरक गणपती अशा अनेक सणाना अधिक मानवी चेहरा देण्याच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या  प्रयत्नांना सुरुवातीला विरोध झाला असला तरी आता महाराष्ट्र शासनाने तसेच समाज मनाने  देखील हे उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहेत. त्याच पद्धतीने कुर्बानीचे  रूप नवे ह्या उपक्रमाला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे खूप आश्वासक आहे. पैगंबर शेख सारखे तरुण कार्यकर्ते मुस्लिम सुधारणा मंडळाच्यामार्फत   बोकडाची कुर्बानी देण्या ऐवजी आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. हे चांगले आहे.  माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने अंनिस संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून देवाच्या नावाने बळी देणे ह्या संकल्पनेला आहे.

आज दोन्ही संघटनांच्या वतीने मिळून २१ जणांनी रक्तदान केले. या या वेळच्या रक्तदानाचे विशेष आकर्षण म्हणजे फक्त साताराच नव्हे तर दहिवडी, मसवड, लातूर असे वेगवेगळ्या ठिकाणचे तरुण रक्तदानासाठी हजर होते. यामध्ये मोहसीन शेख, डॉ. हमीद दाभोलकर, उदय चव्हाण, तोसिफ शेख, साहिल मुलानी, जमीर मुलानी,प्रवीण माने, सुरज वाघ ,शैलेश नलवडे, विशाल करांडे, गणेश साळुंखे, अमोल सूर्यवंशी, अक्षय सपकाळ , पवन शिंदे, संतोष भिलारकर  संतोष कचरे ,दशरथ रणदिवे यांनी रक्तदान केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य कार्यकारणी सदस्य शंकर कणसे, भगवान रणदिवे आणि डॉक्टर दीपक माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
या  रक्तदानाचा गरजू लोकांना फायदा होईल असे विचार  माऊली रक्तपेढीचे डॉक्टर रमण भट्टड  यांनी व्यक्त केले

उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोहसीन शेख आणि  वंदना माने यांनी प्रयत्न केले.

Tuesday, 26 May 2026

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

नालासोपारात शिवसेना- भाजपला धक्का ; खिंडार रुचिता नाईक, वैभव पवार यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश.....

*"शेकडो कार्यकर्ते तीन नवीन रुग्णवाहिका" लोकार्पण करत केले भव्य शक्तिप्रदर्शन....*

नालासोपारा ता २५ :- बहुजन विकास आघाडी हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असून लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, महापौर आजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांचा हस्ते व जेष्ठ नेते हेमंत म्हात्रे (बंधू) यांचा मार्गदर्शनाखाली आज रुचिता नाईक, वैभव पवार, यांनी  शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तीन नवीन रुग्णवाहिका लोकार्पण करत भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

या भव्य प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात बहुजन विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम होणार असून, कार्यकर्त्यांन मध्ये जोश दिसत होता. वसई विरारचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता बहुजन विकास आघाडीत असल्याने रील बनवणारे नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारे नेते खरे रील स्टार असतात  नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे  आमदार हितेंद्र ठाकूर साहेब व क्षितिज दादा ठाकूर महापौर अजीव पाटील साहेब यांच्या कार्यपद्धतीचे रुचिता नाईक यांनी कौतुक केले.

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण शेट्टी, मा.नगरसेवक अतुल साळुंखे, मा.नगरसेवक किशोर पाटील, युवा अध्यक्ष नवीन वाघचौडे, नवनाथ पगारे, अभिषेक हटकर, संजीव कदम, रोहन डिसोझा,राजेंद्र खुळे,रोहित डिसोझा वैभव पवार, किशोर कारेकर, गणेश मुणगेकर, महेश निकम जया गुप्ता, शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ !!

नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ !!

 कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण ; ८ वर्षासाठी झाला करार 

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे ) : नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ झाली आहे.देव इंटरप्राईजेचे मालक शेखर तांडेल यांच्यासोबत आठ वर्षाचा करार झाला आहे. उरण तालुक्यातील नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनी मधील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० चे भरघोस पगारवाढ झाले आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियन  तर्फे झालेल्या पगारवाढमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे


महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत,जनरल सेक्रेटरी वर्गीस चाको,द्रोणागिरी न्हावा शेवा उपाध्यक्ष रोशन ठाकूर,सेक्रेटरी धर्मेंद्र तांडेल,कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील,निलेश भोईर,वैभव चोगले,ज्ञानेश्वर भोईर,देव एंटरप्राइजेसचे मालक शेखर तांडेल,एपीएम टर्मिनलचे मॅनेजर योगेश ठाकूर आदी पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला.या करारामुळे कामगार वर्गाने समाधान व्यक्त करत कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील व वैभव चोगले आणि सर्व कामगारांनी युनियनचे आभार मानले आहेत.

 खालील प्रमाणे पगार वाढ करण्यात येणार आहे.

८ वर्षासाठी २०,०००/-

१ ला वर्ष ५०००/-
२ रा वर्ष २५००/-
३ रा वर्ष २५००/-
४ था वर्ष २०००/-
५ व वर्ष २०००/-
६ वा वर्ष २०००/-
७ वा वर्ष २०००/-
८ वा वर्ष २०००/-

जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने साई संस्था (ट्रस्ट). - शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा.

जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने साई संस्था (ट्रस्ट). - शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या साई संस्था(ट्रस्ट) डोंबिवली यांच्या शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षा पासून जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.या विद्यालयाचा कारभार आत्ता साई संस्थेच्या हातात आला असल्यामुळे परिसरांतील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून उरण परिसरांतून जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि या संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या साईसंस्था (ट्रस्ट) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मराठी, गुजराथी, इंग्रजी  माध्यमाच्या बरोबरीने   गत वर्षी आणखीन एक  स्कूल सुरु केले आहे.ही संस्था गेली १८ वर्षा पेक्षा अधिक काळ कार्यरत आहे,तर रायगड-माणगाव येथे गेली २४ वर्षा पेक्षा अधिक काळ इंग्रजी  माध्यमाचे स्कूल कार्यरत आहे,या सर्व शैक्षणिक वर्षात या सर्व विद्यालयाने आपल्या शालांत परीक्षेचा निकाल १०० % टक्के लाऊन निकालाची यशस्वी परंपरा आजही राखून ठेवली आहे.मागील चार वर्षात संस्थेच्या वतीने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल व बरोबरीने कोल्हापूर गडहिंग्ल्ज येथे इ.बी.गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून गत वर्षी नरसू पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओ थेरपी या  आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश या साई संस्थेच्या शैक्षणिक संकुलात झालेला आहे. 

साई संस्था(ट्रस्ट)ने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असतानाच या सर्व शैक्षणिक बाबीची देशांतील नंबर वन असणाऱ्या जेएनपीए प्रशासनाने दखल घेत प्रकल्पग्रस्थ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीणविकास व्हावा हा उद्दात हेतू विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन उरण येथील जेएनपीए वसाहत संकुलात असणाऱ्या जेएनपीए विद्यालयाच्या मराठी माध्यमाची धुरा साई संस्थेवर यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षा पासून टाकली आहे.याबाबतची ऑर्डर दि.३० एप्रिल २०२६ रोजी जेएनपीए प्रशासनाने संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या कडे सपुर्द केली आहे.
या संदर्भात साई संस्थेचे (ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी स्वतः शिक्षक असल्याने मला शैक्षणिक क्षेत्राची चांगली जाण आहे.जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि प्रशासनाने संस्थेवर विश्वास दाखून  शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्या संस्थेवर सोपविली आहे. तीपूर्ण करण्यास मी व संस्था कटिबद्ध राहून पूर्ण करू, येथील बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पीएपीची सवलत मिळेल,साई संस्थेच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारे फी वाढ होणार नाही.विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतना मध्येही फरक पडेल व सर्व शिक्षक कायम स्वरूपी सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे सरकारच्या निकषानूसार विध्यार्थ्यानाही मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील,आत्ता आपलाच कुटुंबांतील एक व्यक्ती आपलीच शाळा चालवीत आहे ही पालकांची भावना असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पासून सुरक्षतेपर्यंतचे प्रश्न सुटले असल्यामुळे पालक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मी वचन बद्ध राहीन असे साई संस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले

ओडिशा मध्ये १०,००० वीज कंत्राटी कामगारांची कपात.!!

ओडिशा मध्ये १०,००० वीज कंत्राटी कामगारांची कपात.!!

टाटा पॉवरच्या १०,००० वीज कंत्राटी कामगार कपाती विरोधात महाराष्ट्रातून ओडिशा आंदोलनाला पाठिंबा.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) :
भुवनेश्वर (ओडिशा) येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक वीज कंत्राटी कामगार आंदोलनाला भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शवत महाराष्ट्रभर विविध वीज कार्यालयांसमोर निषेध द्वार सभा, व आंदोलनांचे आयोजन केले.

ओडिशा राज्यात वीज क्षेत्राच्या खाजगीकरणानंतर टाटा पॉवर व्यवस्थापनाकडून “खर्च कपात” या नावाखाली सुमारे १०,००० कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात देशभरातील कामगार संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री तथा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी भुवनेश्वर येथील आंदोलनस्थळी बोलताना सांगितले की, “खाजगीकरणाचा सर्वात मोठा फटका गरीब व कंत्राटी कामगारांना बसत आहे. तरी या मधे  मुख्यमंत्री ओडीसा यांनी भारतीय मजदूर संघ पदाधिकाऱ्यांसह मिटींग आयोजित करून अनेक वर्षे सेवा देणाऱ्या कामगारांना खर्च कपातीच्या नावाखाली बाहेर काढणे हा अन्याय असून सर्व कामगारांना तात्काळ विनाअट कामावर पुन्हा घ्यावे.” अशी मागणी  केली आहे . 

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी इशारा देताना म्हटले की, “आज वेळ ओडिशाची आहे, उद्या महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांवरही अशीच वेळ येऊ शकते. एका तरुण आंदोलकाने बेरोजगारीच्या नैराश्यातून आत्महत्या केली सरकार नवीन रोजगार देऊ शकत नसताना आहे तो रोजगार कमी करू लागला तर देशातील तरुणांकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात वीज क्षेत्रातील सर्व कामगारांनी संघटित राहणे आवश्यक आहे.”

संघटनेचे प्रतिनिधी सचिन मेंगाळे व निलेश खरात हे भुवनेश्वर येथे पोहोचले असून त्यांनी आंदोलनकर्त्या कामगारांशी चर्चा करून संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.संघटनेने स्पष्ट केले आहे की, वीज उद्योगातील खाजगीकरणामुळे केवळ कंत्राटीच नव्हे तर कायमस्वरूपी कामगारांचेही रोजगार धोक्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध वीज कार्यालयांसमोर आयोजित निषेध सभांमध्ये मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
पुणे येथील महावितरण रास्ता पेठ कार्यालयासमोर आयोजित गेट मिटिंगमध्ये भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्यासह तुकाराम डिंबळे, सुरेश जाधव, उमेश आणेराव व राहुल बोडके व निखिल टेकवडे , मार्गदीप मस्के,  योगेश महांगरे यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्रातील विविध वीज उद्योग कार्यालयांसमोर घेण्यात आलेल्या आंदोलनातून ओडिशातील कामगार कपात तात्काळ रद्द करावी, सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे तसेच कामगारांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.!!

शासनाने ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव करत केला दुसरा क्रमांक देऊन केला सन्मान.

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जासईने केलेल्या सर्वच लोककल्याण कारी कार्याची व जनतेच्या सर्वांगीण विकासाची कार्ये लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जासईला उरण तालुक्यातून दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या कार्याचा गौरव करत दुसरा क्रमांक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.ग्रुप ग्रामपंचायत जासईने सर्वच घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविले आहेत. अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे त्यांना हा उरण तालुक्या मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.अभियान अंतर्गत दुसरा क्रमांक मिळाल्याने ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अभिमानास्पद व गौरवास्पद कामगिरी ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या माध्यमातून झाली असून जासईचे सरपंच  संतोष रामचंद्र घरत यांचा नेतृत्वाखाली जासई ग्रुप ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात आलेल्या "मूख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान "मध्ये उरण तालूक्यात दूसरा क्रमांक पटकविला आहे.बक्षिसपात्र रक्कम-१२ लाख ग्रामपंचायतला मिळणार आहे. ग्रामपंचायत जासई चे व्याप्ती व कारभार मोठा असलं तरी या अभियान मध्ये सर्व घटक परिपूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणारे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे。 स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती) कार्यक्षम बनवणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभाग वाढवणे, कर वसुली, आणि डिजिटल सेवांचा वापर यांसारख्या निकषांवर आधारित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि ग्रामीण नागरिकांना सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांचा विकास करणे, कोणतेही समस्या निर्माण झाल्यास ते त्वरित सोडविणे आदी विविध कार्य उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी करण्यात येते.हे सर्व ग्रामपंचायतचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय दुसरा क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे

कल्याण मध्ये विवाहितेची निर्घृण हत्या !!

कल्याण मध्ये विवाहितेची निर्घृण हत्या !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण शहरातील काळा तलाव परिसरात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांचा संशय महिलेच्या वडिलांवर असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके रवाना केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील बारेकर वाडी येथील रचना रॉयल सोसायटीमध्ये राहणाऱ्या गायत्री शिंदे या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाणे चे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक महत्त्वाचा धागा हाती लागला. जिन्यातून एक व्यक्ती घाईघाईने बाहेर पडताना दिसून आली असून, ती व्यक्ती महिलेचे वडील विनोद वसईकर असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

या घटनेमुळे काळा तलाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

Monday, 25 May 2026

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!

*२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोषणा*

कल्याण, संदीप शेंडगे (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ परिसरात गेली २० वर्षे सातत्याने आरोग्यसेवा देणाऱ्या फोर्टिस हॉस्पिटल कल्याणने अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन करत आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावेळी “Code QRT 2.0” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, परिसरातील २५ स्थानिक रुग्णालयांना जोडून आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.

या उद्घाटनप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्रचे बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी, फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. आयुषोत पांडे तसेच ट्रॉमा आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. सुधीर गोरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी फोर्टिस हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आरोग्यसेवा ही कोणत्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास नागरिकांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मोठी मदत होते. फोर्टिस हॉस्पिटलने सुरू केलेले ‘Code QRT 2.0’ हे नेटवर्क भविष्यात शहरातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि वेगवान बनवेल.”

फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या आपत्कालीन विभागाने गेल्या २० वर्षांत ६० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामध्ये हृदयविकार, श्वसनविकार, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर रुग्णांचा मोठा समावेश आहे. या अनुभवाच्या आधारे नव्या विभागाची उभारणी करण्यात आली असून जलद तपासणी, अत्याधुनिक बेडसाईड डायग्नोस्टिक्स आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे. 

नवीन विभागात चार अत्याधुनिक आपत्कालीन बेड, निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम, सतत हृदय मॉनिटरिंग, व्हेंटिलेशन आणि डिफिब्रिलेशन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल ट्रायज सिस्टम आणि रिअल-टाइम बेड मॅनेजमेंट डॅशबोर्डमुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद आणि कार्यक्षम होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. 

या विभागात इमर्जन्सी फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ, न्युरोलॉजिस्ट, ट्रॉमा तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर विशेषज्ञ एकत्रितपणे सेवा देणार आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अपघात, सेप्टिक शॉक, पल्मनरी एम्बोलिझम, सर्पदंश तसेच रेल्वे किंवा रस्ते अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे. 

“Code QRT 2.0” या उपक्रमाद्वारे आपत्कालीन सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता शहरभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गंभीर रुग्णांची ओळख पटवणे आणि रुग्णालयात हलवण्यापूर्वी रुग्णांची स्थिती स्थिर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

तसेच परिसरातील २५ प्रमुख रुग्णालयांना एकाच नेटवर्कमध्ये जोडून इमर्जन्सी डॉक्टर, फर्स्ट रिस्पॉन्डर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. गंभीर रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविताना उपचारांमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे फोर्टिस प्रशासनाने स्पष्ट केले.

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध !

जनगणनेमध्ये ओबीसी प्रवर्गाला कोणतेही स्थान नसल्याने शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी केला निषेध.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना.

जणगणनेत फक्त एस सी,एस टी प्रवर्गाचा उल्लेख. इतर जातीचा उल्लेख नाही.

ओबीसी नेते नाराज ; ओबीसी समाजात तीव्र संताप.

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे) : सध्या सर्वत्र जणगणना सुरु आहे. मात्र या जणगनणेत एस सी, एस टी प्रवर्गचा उल्लेख आहे मात्र ओबीसी प्रवर्गाचा उल्लेख नसल्याने शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या गोष्टीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बिहार निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र गणना केली जाईल, असे जाहीर केले होते. बिहार निवडणुकीत ओबीसींना खुश करण्यासाठी केंद्र सरकारने ही घोषणा केली होती. आता त्या नंतर मात्र प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर जनगणना फॉर्ममध्ये ओबीसीचा (0) ओ देखील उच्चारला जात नाही किंवा तशा चौकशाही प्रगणकाकडून केल्या जात नाहीत. मग जणगणना कोणासाठी व कशासाठी केली जात आहे असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते जगजीवन भोईर यांनी उपस्थित केला आहे.


इतर मागासवर्गीयांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न या जनगणनेच्या माध्यमातून केला जात आहे. असेही भोईर यांनी म्हटले आहे. जर ही ओबीसींची स्वतंत्र गणना झाली नाही तर विश्वनाथ प्रताप सिंग, महाराष्ट्रातील नेते ओबीसीचे आणि आगरी समाजाचे नेते दिवंगत  दि. बा. पाटील साहेब यांनी रुजवलेली ओबीसी चळवळ मातीत गाडली जाईल आणि ओबीसींचे आरक्षण नष्ट केले जाईल.बहुजन नेते कांशीराम यांनी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी  असे म्हटले होते. त्यांची ही घोषणा पुढे न्यावीच लागेल. जर ओबीसींची गणना करायची नसेल तर ही जनगणनाच करू नका ! ओबीसींची. स्वतंत्र गणना झालीच पाहिजे !! अशी मागणी जगजीवन भोईर यांनी केली आहे.केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय समाजाला फसवण्याचे धंदे बंद करावेत. असे शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला ठणकावले आहे.

 जगजीवन भोईर यांनी सांगितले की कालच जनगणना अधिकाऱ्याला फोनवर मी एक प्रश्न विचारला . त्यांना विचारलं की मी ओबीसी - आगरी आहे . तर ह्या जनगणना पत्रकात माझ्या ह्या संविधानिक प्रवर्गाचा उल्लेख आहे का ? तर त्यांनी सांगितलं की एस्सी व एस्टी ह्या दोनच प्रवर्गाचा उल्लेख आहे आणी जे अन्य प्रवर्ग किंवा जातीचे प्रवर्ग अर्थात ओबीसी वगैरे आहेत , त्यांचा " इतर " म्हणून उल्लेख आहे , ओबीसी म्हणून उल्लेख नाही . 
 
तेव्हा सदर अधिकारी मला म्हणाला की साहेब , ओबीसी समाज अक्षरशः झोपलेला आहे , त्याला ह्या महत्वपूर्ण मुद्द्याशी काहीच घेणदेण नाही . आज मला बरेच दिवस झालेत , मात्र ओबीसी सामाजाइतका सुस्त आणी मस्त समाज मी कधीच बघितला नाही . 

जनगणनेत जर ५२% असणाऱ्या ओबीसी समाजाचा उल्लेखच नाही , तर मग तुम्ही आम्हा ओबीसीला कुठ गृहीत धरत आहात ? आमचा काय म्हणून वापर करून घेत आहात ? आमचे मूर्ख नेते काय करत आहेत ? 

फक्त २२. ५ % एस्सी एस्टी समाजाचा उल्लेख जनगणनेत होतोय व आमचा नाही , ही किती भयंकर आणी निंदनीय बाब आहे . ज्या देशाचा प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणतो , त्या प्रधानमंत्र्याच्या प्रवर्गाचा जनगणनेत उल्लेखच नसणे ही सामान्य बाब नाही . ह्याचा नाही ओबीसीचा फक्त आणी फक्त जातीय ध्रुवीकरणासाठी वापर केला जातो , कधी मुसलमानाच्या विरोधात , कधी एसीच्या तर कधी एस्टीच्या विरोधात . 

आमची जर जातनिहाय जनगणना होतच नाही , तर मग आमच्या समस्या कुठल्या , आमच्यात शिक्षणाच प्रमाण किती , आमच्यात नोकऱ्यांच प्रमाण किती , आमचा आर्थिक स्तर काय आहे ? ह्यासारख्या प्रश्नांच उत्तर कधी मिळणार ? 

बर , ह्या संविधानिक मुद्द्यावर कोणीही एक चकार शब्दही काढत नाही . आणी मग आमच्या मुलांना १२ वी नंतर ऍडमिशनचे प्रॉब्लेम झाले की आम्ही आमच्या अपयशाच खापर एस्सी एस्टी समाजावर फोडायला मोकळे होतो . काय ? तर त्यांना देऊन ठेवलय , आम्हाला नाही . पण तुम्हांला सुद्धा आहे , मात्र तुमचा हक्क मिळवण्यासाठी कधी तुम्ही रस्त्यावर येता का ? कधी सरकारला जाब विचारता का ? त्यासाठी कधी एकत्र येता का ? 

इतका निर्बुद्धपणा जगात कुठे शोधून सापडणार नाही . आतापर्यंत व्यवस्थेचे "अनपेड पोलीस " म्हणून आम्ही ओबीसीनी आमची जबाबादारी मोठ्या इमानेइतबारे पार पाडली , आणी ह्यापुढेही पार पाडू ! अशा भावना शिवसेना नेते जगजीवन भोईर यांनी व्यक्त केल्या आहेत

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत

आगरी समाजाच्या विकासाला माझे सर्वप्रथम प्राधान्य : महेंद्रशेठ घरत

**0कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शानदार उदघाटन

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) ::कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वातानुकूलित भव्य अशा सभागृहाचे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते शनिवारी (ता. २३) मोठया उत्साहात उदघाटन करण्यात आले. या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कर्जतच्या आगरी समाज सभागृहाचे संपूर्ण अत्याधुनिक नूतनीकरण यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी १२ लाख ५० हजार रुपये सढळ हस्ते केलेल्या देणगीतून करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. "महेंद्रशेठ घरत हे आगरी समाजातील आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करणारे अवलिया आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत, याचा कर्जतच्या आगरी समाजाला अभिमान आहे," असे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "मला आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आपला समाज मेहनतीने आणि सन्मानाने जगण्याला अधिक प्राधान्य देतो. कुणापुढे कारण नसताना झुकत नाही. ताठ कण्याचा आपला समाज मला प्रिय आहे. त्यामुळे आगरी समाजाच्या उत्कर्षासाठी मी सर्व प्रकारचे सहकार्य करतो. समाजाच्या मागे मी कायमच खंबीरपणे उभा आहे आणि राहीन. कर्जतचा आगरी समाज संघटित होऊन समाजाच्या भल्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे कर्जतच्या आगरी समाजावर माझे विशेष प्रेम आहे. त्यांच्यासाठी माझा मदतीचा हात कायमच राहील. मी जागतिक पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत आहे. त्यामुळे जगभर फिरतो; परंतु मी माझ्या गावाच्या विकासाबाबत संवेदनशील आहे. आज राज्यात रोल मॉडेल ठरेल, असा माझ्या शेलघर गावाचा सुनियोजित विकास मी करून घेतला आहे. आज तिथे ग्रामस्थांना बोट ठेवायला जागा नाही. मी जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जलकुंभ बांधून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतविला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर अभ्यास करून अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आणि विकासात्मक कामे करून घेतली. रायगडमध्ये सी. डी. देशमुख यांच्यानंतर मी जगाच्या व्यासपीठावर नावलौकिक मिळवतोय. तिथेही मी त्या त्या देशांच्या कामगार नेत्यांवर वचक ठेवून आहे."  

या समारंभाला बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ घारे, उद्योजक मयूर पिसे, कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे, नितीन धुळे, रेश्माताई जोशी, मंगेश म्हसकर, विपूल पाटील, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. हा समारंभ हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सामाजिक सभागृह नेरळ-बोपेले येथे पार पडला. यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष नागो गवळी, एकनाथ धुळे, सावळाराम जाधव, कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, उरण तालुका प्रमुख विनोद म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील, निखिल ढवळे आणि एम. जी. ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जितेंद्र गवळी यांनी सूत्रसंचालन केले, तर भरत भगत यांनी प्रास्ताविक केले.

आंबिवलीतील नागरिकांचा पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या !!

आंबिवलीतील नागरिकांचा पाण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात ठिय्या !!

** संतप्त महिलांनी बेकायदेशीर नळ जोडण्या खंडीत करण्याची केली मागणी 

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आंबिवली परिसरात गेल्या चार महिन्यांपासून पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतप्त महिला व नागरिकांनी अ प्रभाग कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले.

आंबिवली अटाळी परिसरातील शंभू पाटील चाळ साईकृपा चाळ धर्मात्मा नगर ज्योतिर्लिंग चाळ आदी भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

येथील काही भागांमध्ये बेकायदेशीर नळ जोडणी मोठ्या प्रमाणात झाल्या असून अनधिकृत बांधकामांना चोरून पाणीपुरवठा केला जात असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. आम्ही नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असूनही आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी मिळत नसल्याचे रेशमा बोत्रे जयश्री ढेकळे यांनी सांगितले.

“घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या आंदोलन करणाऱ्या महिलांची पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी भेट घेऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे  पाणी समस्या मार्गी न लागल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

टिटवाळ्यात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या !!

टिटवाळ्यात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या !!

**आरोपी पतीविरोधात वडिलांची फाशीची मागणी
कल्याण, संदीप शेंडगे : टिटवाळा येथील बल्याणी परिसरात घरगुती भांडणाचे रूपांतर थेट रक्तरंजित घटनेत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव सतीश काळूराम वाघे असून मृत महिलेचे नाव सारिका उर्फ रुखसार असे आहे. पत्नी माहेरी वडिलांकडे होती गोड बोलून सतीश ने पत्नीला आपल्या घरी बोलाविले. त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले घरगुती वादाच्या रागातून सतीश वाघे याने पत्नीला बेदम मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने पाण्याने भरलेला हंडा तिच्या डोक्यात घातल्याचे तसेच भिंतीवर डोके आपटत अमानुष अत्याचार केल्याचे वडिलांनी सांगितले. या क्रूर मारहाणीमध्ये गंभीर जखमी अवस्थेतील रुखसारला तातडीने जवळील महागणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे कारण देत जखमी महिलेला इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले. टिटवाळा सारख्या शहरात एका खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन उपलब्ध नाही त्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप रुखसारच्या वडिलांनी केला आहे 

     या प्रकरणी रुखसार चे वडील सुलतान अकबर अन्सारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपी सतीश वाघे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणात अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा गंभीर आरोपही अन्सारी यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे टिटवाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी होत आहे.

Saturday, 23 May 2026

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !

जून, जुलै महिन्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट.

मच्छिमार बांधवांना आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे पॅटर्न राबवून दिलासा देण्याची मागणी.

उरण दि २३,'(विठ्ठल ममताबादे) :
मच्छिमार कुटूंबियांना माहे जुन व माहे जुलै दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावे अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व संबंधित विभागाना करण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार कोकण किनारपटटीवरील मच्छिमारी १ जुन ते ३१ जुलै कालावधीकरीता बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा आदेश सहा. मत्स्यव्यवसाय विभागाने जाहीर केलेला आहे. या दोन महिन्यांत माश्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे तसेच जोरदार पाऊस व वादळाचा धोका यामुळे मच्छिमारी बंद ठेवणे योग्यच आहे. परंतु कोकण किनारपटट्टी वरील मच्छिमाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह संपुर्ण मच्छिमारीवर चालतो. पुढील २ महिन्यांमध्ये त्यांना कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत असतो व आताही झालेला आहे. त्यांना या २ महिन्यांकरीता उदरनिर्वाह भत्ता अथवा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.

नुकताच आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील मच्छिमारांच्या कुटूंबियांना दोन महिन्यासाठी प्रतिमहिना २०,०००/- रू. देण्याचे मान्य केले आहे व त्याचे वाटप सुध्दा चालु आहे. महाराष्ट्र राज्य हे मच्छिमारी व्यवसायातुन मोठया प्रमाणात महसुल गोळा करते. तरी या सारख्या आर्थिक सधन राष्ट्राने गरजु मच्छिमारांसाठी आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे मच्छिमारांच्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिमहिना रू. २५,०००/- प्रमाणे दोन महिन्याचे ५०,०००/-आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या संदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार कॉम्रेड भूषण पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोट (चौकट ):- 

कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की महाराष्ट्रातील मच्छिमारांना ५०, ०००/- उदरनिर्वाह भत्ता द्या.१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यामध्ये माशांचा प्रजनन काळ व जोरदार पाऊस या कारणास्तव मच्छिमारी बंद करण्याचे आदेश मच्छिमार आयुक्ताने काढला आहे त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.नुकतेच आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील मच्छिमारांना उदरनिर्वाह रु ४०, ०००/-भत्ता दिला आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारणे सुद्धा द्यावा हि मागणी करीत आहोत .
   - कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते तथा मार्गदर्शक कोकण किनारा मच्छिमार संघटना.

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे !

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी श्रुती म्हात्रे  !

** पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण  ;  सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार व्हावा, उत्तमपणे संघटनात्मक बांधणी व्हावी, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समितीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी काँग्रेसच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असलेल्या व गोर गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमी झटणाऱ्या श्रुती शाम म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्त्या म्हणून श्रुती म्हात्रे यांची ओळख आहे. शिवाय प्रसिद्ध महिला सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या म्हणूनही त्या सर्वांना सुपरिचित आहेत. श्रुती म्हात्रे यांना त्यांचे वडिल  कामगार नेते, काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. शाम म्हात्रे यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. वडिलांचा विचार कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रुती म्हात्रे सुरवातीपासूनच कार्यरत आहेत. श्रुती म्हात्रे यांनी आजपर्यंत हजारो कामगारांना, गोर गरीब जनतेला न्याय दिला आहे. काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसार केला आहे. काँग्रेस पक्षाची उत्तम संघटनात्मक बांधणी केली आहे.सध्या श्रुती म्हात्रे या कोकण श्रमिक संघाच्या अध्यक्षा, शाम म्हात्रे फॉउंडेशनच्या अध्यक्षा, एकता कॅटलीस्ट संघटनेचे अध्यक्षा, आगरी शिक्षण संस्थेचे सहसचिव, आगरी शिक्षण संस्था शाळा समितीचे अध्यक्षा, हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे सदस्य असे अनेक पदे भुषवित आहेत. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहेत. त्यांच्या या सर्वच कार्याची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने विश्वास दाखवत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने श्रुती म्हात्रे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आनंद व समाधान व्यक्त करत पेढे वाढून या निर्णयाचे व निवडीचे स्वागत केले. सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रुती म्हात्रे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रुतीताई म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी  माझी निवड घोषित करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे साहेब, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेब, AICC सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल साहेब, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनीथला साहेब, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, संघटन सृजन अभियान निरीक्षक रागिणी नायक मॅडम, गटनेते विजय वडेट्टीवार साहेब, गटनेते सतेज पाटील साहेब, CWC सदस्य बाळासाहेब थोरात साहेब, मार्गदर्शक गणेशजी पाटील साहेब, मार्गदर्शक संध्याताई सव्वालाखे मॅडम, पर्यवेक्षक तौफिक मुलानी साहेब, श्रीरंग बर्गे साहेब, आमचे मार्गदर्शक  आर.सी घरत साहेब, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर साहेब, नंदाताई म्हात्रे, श्रद्धा ताई ठाकूर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.काँग्रेस पक्षाची विचारधारा, संघटन मजबूत करण्यासाठी मी या पदाचा पुरेपूर वापर करेन. ज्येष्ठाचे मार्गदर्शन घेवून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेवून सर्व समजघटकांसाठी कार्यरत राहीन.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण.... नालासोपारा ता १४ :- नालासोपा...