फोर्टिस हॉस्पिटल कल्याणतर्फे अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन !!
*२० वर्षांच्या आरोग्यसेवेचा मानाचा टप्पा; ‘Code QRT 2.0’ उपक्रमाची घोषणा*
कल्याण, संदीप शेंडगे (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ परिसरात गेली २० वर्षे सातत्याने आरोग्यसेवा देणाऱ्या फोर्टिस हॉस्पिटल कल्याणने अत्याधुनिक आपत्कालीन विभागाचे उद्घाटन करत आरोग्यसेवेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावेळी “Code QRT 2.0” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली असून, परिसरातील २५ स्थानिक रुग्णालयांना जोडून आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा संकल्प रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.
या उद्घाटनप्रसंगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, फोर्टिस हॉस्पिटल्स महाराष्ट्रचे बिझनेस हेड डॉ. एस. नारायणी, फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. आयुषोत पांडे तसेच ट्रॉमा आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. सुधीर गोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी फोर्टिस हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “आरोग्यसेवा ही कोणत्याही शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अत्याधुनिक सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास नागरिकांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यास मोठी मदत होते. फोर्टिस हॉस्पिटलने सुरू केलेले ‘Code QRT 2.0’ हे नेटवर्क भविष्यात शहरातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि वेगवान बनवेल.”
फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या आपत्कालीन विभागाने गेल्या २० वर्षांत ६० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यामध्ये हृदयविकार, श्वसनविकार, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर रुग्णांचा मोठा समावेश आहे. या अनुभवाच्या आधारे नव्या विभागाची उभारणी करण्यात आली असून जलद तपासणी, अत्याधुनिक बेडसाईड डायग्नोस्टिक्स आणि विविध तज्ज्ञांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे.
नवीन विभागात चार अत्याधुनिक आपत्कालीन बेड, निगेटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम, सतत हृदय मॉनिटरिंग, व्हेंटिलेशन आणि डिफिब्रिलेशन सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डिजिटल ट्रायज सिस्टम आणि रिअल-टाइम बेड मॅनेजमेंट डॅशबोर्डमुळे आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद आणि कार्यक्षम होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
या विभागात इमर्जन्सी फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ, न्युरोलॉजिस्ट, ट्रॉमा तज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर विशेषज्ञ एकत्रितपणे सेवा देणार आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, अपघात, सेप्टिक शॉक, पल्मनरी एम्बोलिझम, सर्पदंश तसेच रेल्वे किंवा रस्ते अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे.
“Code QRT 2.0” या उपक्रमाद्वारे आपत्कालीन सेवा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता शहरभर पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गंभीर रुग्णांची ओळख पटवणे आणि रुग्णालयात हलवण्यापूर्वी रुग्णांची स्थिती स्थिर ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तसेच परिसरातील २५ प्रमुख रुग्णालयांना एकाच नेटवर्कमध्ये जोडून इमर्जन्सी डॉक्टर, फर्स्ट रिस्पॉन्डर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. गंभीर रुग्ण एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविताना उपचारांमध्ये कोणताही विलंब होऊ नये आणि ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे फोर्टिस प्रशासनाने स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment