Friday, 31 July 2026

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!!

*संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) मध्ये गुरुपौर्णिमा व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न* !!!

मुंबई, कुर्ला (प्रतिनिधी): पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (पश्चिम) येथे दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमेचा सोहळा तसेच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास चांदीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. दिलीपमामा लांडे यांचे चिरंजीव श्री. प्रयाग दिलीप लांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यामध्ये रुपेश गरड, शीला गरड, वैभव माने, तुषार पाटील, राकेश राक्षे, सागर शेट्ये आदी माजी विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत व प्रमुख पाहुणे श्री. प्रयाग लांडे यांच्या हस्ते ज्ञानदेवता सरस्वती तसेच संस्थेचे संस्थापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या भाषणांतून प्रभावीपणे मांडले.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना रात्र शाळेने दिलेल्या शिक्षणामुळे जीवनात मोठी प्रगती साधता आली, असे सांगून विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रेरित केले. त्यांनी गुरूंचे स्थान आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे श्री. प्रयाग लांडे यांनी आपल्या मनोगतात रात्र शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे असून त्यांच्या शिक्षणासाठी व शाळेच्या विकासासाठी आवश्यक असणारी कोणतीही मदत करण्यास आपण सदैव तत्पर असल्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या हस्ते रात्र शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक श्री. समाधान खैरनार व श्री. योगेश विरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. समाधान खैरनार यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ राऊत यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. समाधान खैरनार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हायकोर्टाच्या प्रश्नानंतर एफडीएची धडक कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये परवानाच नसल्याचे उघड !!

हायकोर्टाच्या प्रश्नानंतर एफडीएची धडक कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्ये परवानाच नसल्याचे उघड !!

*मुंबई, दि. 30 जुलै 2026*

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर 24 तासांच्या आत एफडीएने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनवर तपासणी केली. या तपासणीत कँटीनची अन्न सुरक्षा कायद्यानुसार नोंदणी किंवा परवानाच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

*हायकोर्टाने विचारले होते प्रश्न*  
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवरील एफडीएच्या कारवाईसंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीवेळी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी एफडीएला विचारले होते की, "एफडीए फक्त खाजगी हॉटेल्सवरच कारवाई करते का? सरकारी संस्थांमध्येदेखील अचानक तपासणी होते का? हायकोर्टाच्या कँटीनची कधी तपासणी झाली आहे का? आतापर्यंत किती मंत्री, आमदार आणि खासदारांच्या हॉटेल्सवर धाडी टाकल्या?" 

न्यायालयाने एफडीएला मंत्रालय आणि उच्च न्यायालयाच्या कँटीनचीही तपासणी करण्याची सूचना केली होती.

*24 तासांत कारवाई*  
न्यायालयाच्या सूचनेनंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कँटीनची तपासणी केली.

*काय आढळले?*  
1. *परवाना नाही*: अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कँटीनची नियमानुसार नोंदणी किंवा परवाना नसल्याचे आढळले.  
2. *नियमभंग*: अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.

*कँटीन सेवा तात्पुरती बंद*  
एफडीएच्या या धडक तपासणीनंतर मुंबई बार असोसिएशनने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या आवारातील मुख्य कँटीन आणि कॉफी व्हेंडरची सेवा पुढील आदेशापर्यंत स्वेच्छेने तात्पुरती बंद केली आहे.

*तुकाराम मुंढे यांची मोहीम*  
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. याआधी त्यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कँटीनवरही सील ठोकण्याची कारवाई केली होती.

उच्च न्यायालयाने मुंढे यांच्या या अन्न सुरक्षा मोहिमेचे कौतुक केले आहे. तसेच मंत्रालयासह सर्व शासकीय आस्थापनांच्या तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

*'बातमीदार माझा'चा दणका : केडीएमटीच्या निवासी फेऱ्या वाढणार; ब्रेकडाऊन बसेसची दुरुस्ती आणि चालक भरती होणार !!

*'बातमीदार माझा'चा दणका : केडीएमटीच्या निवासी फेऱ्या वाढणार; ब्रेकडाऊन बसेसची दुरुस्ती आणि चालक भरती होणार*

*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील बससेवेच्या अनियमिततेसंदर्भात 'बातमीदार माझा' ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची केडीएमटी प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे आता निवासी मार्गावरील बस फेऱ्या वाढविण्याबरोबरच ब्रेकडाऊन झालेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती आणि चालक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

*काय होती समस्या?*  
'बस थांब्यावर एक तास केडीएमटी बस न आल्याने तरुणाचा संताप' आणि 'बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीमुळे प्रवासी त्रस्त' ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवाशांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या.

*केडीएमटीची तातडीची कार्यवाही*  
या बातमीची दखल घेत माननीय परिवहन व्यवस्थापक डॉ. विजयकुमार द्वासे यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:  
1.  *ब्रेकडाऊन बसेस दुरुस्त* : कार्यशाळेत गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीअभावी उभ्या असलेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती करून त्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून द्याव्यात.  
2.  *चालक भरती* : बससेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.

*बस थांब्यावरील अतिक्रमणांवर कारवाई*  
बस थांब्यावरील अनधिकृत फेरीवाले, टपरीवाले आणि अवैध रिक्षा पार्किंगच्या समस्येबाबत केडीएमटीने यापूर्वीच केडीएमसीचे उपायुक्त (फेरीवाला हटाव मोहीम), आरटीओ आणि पोलीस वाहतूक शाखेला पत्रे दिली होती. आता त्याबत पुन्हा स्मरण पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती केडीएमटी अधिकाऱ्यांनी दिली.

*प्रवाशांकडून समाधान*  
या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत निवासी मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये वाढ होऊन प्रवाशांच्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

याबद्दल केडीएमटी प्रशासन आणि 'बातमीदार माझा'चे एमआयडीसी प्रवासी संघटनेचे राजू नलावडे यांनी आभार मानले आहेत.

Thursday, 30 July 2026

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!

भांडूपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी !!

*मुंबई (पी. डी. पाटील ):* श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडूप (प) या शाळेत बुधवार दि.२९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आईवडील, शिक्षक यांच्यावर निष्ठा व विश्वास असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर शिक्षकांनी आताच्या डिजिटल युगात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात दुरावा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षा संस्थेच्या संचालिका वर्षा वसंत सावंत होत्या. त्यांनी प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गोळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच आपल्या मधुर स्वरात ' गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ' गीताने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, भाषण, नृत्य, कवितांतून गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. स्वामी समर्थ केंद्राचे प्रकाश गोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना शाळेला देणगी देऊन सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडनेरे मॅडम यांनी केले तर पर्यवेक्षक नरेंद भारंबे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.

एसटी महामंडळाच्या अधिकृत केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला सुरुवात !!

एसटी महामंडळाच्या अधिकृत केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड शिबिराला सुरुवात !!

*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन*  

*डोंबिवली, दि. 30 जुलै 2026*

65 वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्रामार्फत NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला आज डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी डेपोमध्ये सुरुवात झाली. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

*पहिल्याच दिवशी 100 जणांचा प्रतिसाद*  
शिबिराचा शुभारंभ आज गुरुवार दि. 30 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी सुमारे 100 ज्येष्ठ पुरुष नागरिकांनी शासनाने निश्चित केलेले ₹199 शुल्क भरून स्मार्ट कार्डचा लाभ घेतला.

*सवलतीबाबत माहिती*  
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 65 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत मिळण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. 
याशिवाय, राज्यातील सर्व महिलांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा आहे.

*शिबिराचे वेळापत्रक आणि कागदपत्रे*  
हे विशेष नोंदणी शिबिर 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत एसटी डेपो, जिमखाना रोड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे सुरू राहणार आहे.

तसेच 3 ऑगस्ट 2026 पासून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत दररोज दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सशुल्क NCMC स्मार्ट कार्ड सेवा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे.

*आवश्यक कागदपत्रे*: आधार कार्ड, OTP साठी स्वतःचा मोबाईल, 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो आणि ज्येष्ठ नागरिकाची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. शुल्क ₹199 आहे. हरवले किंवा खराब झालेले कार्डही नियमानुसार शुल्क भरून बदलून मिळेल.

*मान्यवरांची उपस्थिती*  
कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख सुनील भोसले, विभाग प्रमुख तेजस पाटील, कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, एसटी विभाग नियंत्रक कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे, आगार व्यवस्थापक चेतन देवधर, खासदार कार्यालयाचे प्रतिनिधी प्रकाश माने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने 65 वर्षांवरील सर्व पात्र पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, 29 July 2026

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ.

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) :: नवतरुण मित्र मंडळ, पाणजे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्षा सहलीचे औचित्य साधून वृक्षारोपण तसेच शिवमंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या सदस्यांनी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच शिवमंदिर परिसराची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा आदर्श निर्माण केला आहे.यावेळी अक्कादेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

या उपक्रमात आर. झुंजारवाला ट्रस्टचे डॉक्टर व सहकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच  लकपती पाटील, माजी उपसरपंच अविनाश पाटील, मंडळाचे अध्यक्ष दर्शन पाटील, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ पाटील, सदस्य अरुण पाटील, जितेंद्र पाटील, ॲड. विक्रम पाटील, मिलिंद पाटील, मंजीत पाटील, दीपेश पाटील, नंदलाल पाटील, सुशांत पाटील, सुनील पाटील, सचिन भोईर, महेंद्र पाटील, प्रकाश पाटील, लहुराज भोईर मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.४२ वर्षे परंपरा जोपसणारे नवतरुण मित्र मंडळाच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, युवकांनी केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला

पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न.!!

पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक उपक्रमांचा प्रेरणादायी सोहळा उत्साहात संपन्न.!!

उरण, दि. २८, (विठ्ठल ममताबादे) : कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था व शिवसेना शाखा पागोटे यांच्या संयुक्त विद्यमाने पागोटे येथे विद्यार्थी गुणगौरव व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री गणेश हनुमान मंदिर, पागोटे येथे हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमांतर्गत नवघर जिल्हा परिषद शाळांमधील आदर्श व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, तसेच उरण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

यासोबतच पागोटे गावातील निराधार व गरजू महिलांना वस्तू वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रमही यावेळी राबविण्यात  आला. शिक्षण आणि सामाजिक सेवा यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.विशेषत: मनोहरशेठ भोईर माजी आमदार,गणेश शिंदे उरण माजी नगराध्यक्ष, अतुल ठाकूर नगरसेवक गटनेता, अमित ठाकूर नगरसेवक,प्रेरणाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य, परेश ठाकूर उपसभापती, दीपक भोईर पंचायत समिती सदस्य, संतोष पवार उरण सामाजिक संस्था सेक्रेटरी, महादेव बंडा माजी उपसभापती, सुनील तांडेल राष्ट्रवादी काँग्रेस नवघर पंचायत समिती, सुजित काशिनाथ पाटील काँग्रेस अध्यक्ष पागोटे, महेंद्र पाटील शिवसेना शाखा प्रमुख पागोटे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार, वस्तू वाटप आणि अन्य सामाजिक उपक्रम पार पडला.या उपक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा कुणाल पाटील तसेच पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्यासह शिवसेना शाखा पागोटे व ग्रामस्थ मंडळ पागोटे यांचे सहकार्य लाभले आहे.विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला प्रोत्साहन देणे आणि गरजू महिलांना मदतीचा हात देणे, या दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम पागोटे परिसरातील सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन असल्यामुळे उपस्थित मान्यवर,नागरिकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे व आयोजकांचे कौतुक केले.

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशव्यापी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा निर्णय !!

भारतीय मजदूर संघाचा १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशव्यापी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा निर्णय !!

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक दि. २६, २७ व २८ जुलै २०२६ रोजी सरला बिर्ला विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. देशभरातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यसमितीने केंद्र सरकारला वरील सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. कामगारांच्या न्याय्य व प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष एस. मल्लेशम होते. यावेळी अखिल भारतीय महामंत्री सुरेंद्र कुमार पांडे, संघटन मंत्री  बी. सुरेंद्रन, माजी अखिल भारतीय अध्यक्ष  सी. के. साजी नारायणन,  हिरण्मय पंड्या, महाराष्ट्राचे केंद्रीय सचिव अनिल ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस  सचिन मेंगाळे,  अण्णा धुमाळ,  बंदरे उद्योग,  , परिवहन महासंघाचे महामंत्री  राजू भालेराव, प्रवासी कामगार प्रकोष्ठाचे प्रभारी  श्रीपाद कुटासकर,  बॅक प्रभारी रामनाथ किणी , श्रीमती तृप्ती आळती, रेल्वे उद्योग मंगेश देशपांडे,  बाळासाहेब भुजबळ  यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे २० वरिष्ठ पदाधिकारी तसेच देशभरातील विविध उद्योग महासंघांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुधांशू रानडे आणि प्रदेश सरचिटणीस श्री किरण मिलगीर यांनी राज्यातील सर्व संलग्न संघटना, पदाधिकारी आणि हजारो कामगारांना दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित देशव्यापी धरणे आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.



या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत :

1. ईएसआयसी (ESIC) वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
2. ईपीएफ (EPF) अंतर्गत किमान पेन्शन ₹१,००० वरून ₹७,५०० प्रतिमहिना करण्यात यावी.
3. ईपीएफ वेतन मर्यादा ₹१५,००० वरून ₹३०,००० करण्यात यावी.
4. बोनस गणनेसाठी वेतन मर्यादा ₹७,००० वरून ₹१८,००० करण्यात यावी.
5. बोनस पात्रतेची वेतन मर्यादा ₹२१,००० वरून ₹४२,००० करण्यात यावी.
6. सर्व योजना (Scheme) कामगारांचे मानधन भरीव प्रमाणात वाढविण्यात यावे.
7. कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना "समान काम – समान वेतन" या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
8. श्रमसंहितांमधील (Labour Codes) कामगारविरोधी तरतुदी रद्द अथवा आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.
9. बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील पाच दिवसांचा कामकाजाचा नियम तातडीने लागू करण्यात यावा.
10. ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा ₹२० लाखांवरून ₹४० लाखांपर्यंत वाढविण्यात यावी तसेच सर्व पात्र कामगारांना ग्रॅच्युइटीचा लाभ सुनिश्चित करण्यात यावा.
11. देशातील सर्व कामगारांसाठी किमान वेतन ₹३०,००० प्रतिमहिना निश्चित करण्यात यावे.

सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला कर्करोग जनजागृती व्याख्यान उत्साहात संपन्न !!

सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला कर्करोग जनजागृती व्याख्यान उत्साहात संपन्न !!

वसई प्रतिनिधी/ मयुरी चव्हाण

महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए३ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ वसई  यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट पीटर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, दिवाणमान, वसई (प.) येथे बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी महिला कर्करोग जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला विद्यार्थिनी, महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. राहुल जोसेफ आणि प्राचार्या सौ. लता के. सौंदाणे, प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लब ऑफ वसई च्या भारती पवार (सॅटेलाइट को-ऑर्डिनेटर), डॉ. जुली सिंह (डीसी – महिला व बालकल्याण) तसेच हनुमंत भोसले (डीएफए – एचपीव्ही सर्व्हायकल कर्करोग लसीकरण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी गेल्या १५ वर्षांपासून मीरा-भाईंदर परिसरात प्रख्यात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंध, जनजागृती आणि एचपीव्ही लसीकरण  तसेच  इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्याच्या संबंधित समितीच्या संयोजक म्हणूनही कार्यरत असणाऱ्या डॉ. नवनीत देसाई  यांनी आपल्या मार्गदर्शनात स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत सविस्तर माहिती दिली. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, योग्य वेळेत निदानाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता, उपलब्ध आधुनिक उपचारपद्धती तसेच एचपीव्ही (HPV) लसीचे महत्त्व, लस घेण्याचे योग्य वय आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणामधील तिची भूमिका याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहावे, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

व्याख्यानानंतर विद्यार्थिनी, महिला शिक्षक, कर्मचारी आणि उपस्थित पालक यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर लायन श्रद्धा मोरे व लायन वनिता निनावकर, एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन चे प्रतिनिधी मनोज परब, शाहीन शेख तसेच सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन गेल्या आठ वर्षापासून कर्करोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहे. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कर्करोगाचे वेळेत निदान व प्रतिबंधाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त आणि समाजोपयोगी असल्याची भावना व्यक्त केली.

Tuesday, 28 July 2026

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

            कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या (केडीएमटी) डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौक मधील मुख्य बस स्थानक हे गैरसोय, असुविधा मुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. येथून एमआयडीसी निवासी, कल्याण आणि डोंबिवली ग्रामीण परिसरात जाणाऱ्या बसेस सुटतात. पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्री उशिरा पर्यंत येथून बसची येजा चालू असते. हजारो प्रवासी येथून ये जा करीत असतात. केडीएमटीचा दृष्टीने सर्वात गर्दीचा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे एमआयडीसी निवासी हा होय. निवासी येथे जाण्यासाठी या बाजीप्रभू चौकातील स्थानकात एक बस थांबा उभा केला आहे. परंतु हा बस थांबा प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीने, असुविधेने असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. याच निवासी थांब्यावर सकाळ, सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते तरी केडीएमटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधा देण्यात चालढकल/निष्काळजीपणा होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तेथे केडीएमटी वाहतूक नियंत्रक यांची केबिन आहे, त्यातील कर्मचारी हा प्रवाशांना होणारा त्रास मुकाटपणे बघत असतात.
१) सद्या पावसाळा सुरू आहे, पाऊस पडल्यावर बस थांब्यासमोर पाणी साचते. थांब्यावर बस उभी राहिल्यावर प्रवासी त्या पाण्यातूनच बस मध्ये चढत असतात. २) केडीएमटी बस स्थानकाच्या जवळ रिक्षावाले, फेरीवाले, टपरीवाले यांच्या गराडा असतो. जर बस वेळेवर आल्या नाहीत तर रिक्षावाले बिनधास्तपणे थांब्याजवळ उभे राहून प्रवासी घेत असतात. ३) निवासी बस थांबा छोटा असल्याने प्रवाशांची गर्दी झाली किंवा रांग वाढली तर प्रवाशांना बस थांब्याबाहेर भर पावसात, उन्हात उभे राहावे लागते. ४) महिला , पुरुष प्रवाशांसाठी येथे जवळच प्रसाधन /स्वच्छता गृह याची व्यवस्था नाही आहे. ५) जर जोरात पाऊस आला तर बस थांब्यापुढे शेड/पत्रा नसल्याने पावसाच्या सरी अंगावर येऊन भिजायला होते.

       उपरोक्त बाबतीत प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. आता प्रवाशांना याविषयी आंदोलन करावे लागेल असे दिसते असे डोंबिवलीतील समाजसेवक राजू नलावडे यांनी सांगितले.

       एमआयडीसी निवासी मधील रहिवाशांनी यावर दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :-

१. अनेकदा रिक्षा किंवा इतर बस मधे असल्याने निवासी बस स्टॉपच्या मागे किंवा पुढे थांबते व रांग मोडून सर्व प्रवासी चढायला चेंगराचेंगरी करतात. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना फार त्रास होतो.
2. बस स्टॉप वर लाईन सुरु होण्याच्या जागेच्या आधी अनेक घुसखोर प्रवासी घोळक्याने उभे रहातात व बसमध्ये घुसतात. लाईनीत उभे असणारे मागे रहातात.
3. बस स्टॉपच्या शेजारी अतिक्रमित चायनीज टपरी च्या अती उग्र वासाने प्रवासी हैराण होतात.
4. ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी राखीव आसने दर्शवण्यासाठी असलेल्या पट्ट्या अनेक बसमध्ये गायब झाल्या आहेत. 
5. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी (समुहात नसलेल्या) वेगळे तिकीट न देता एकाच नागरीकाच्या हातात अनेक जणांसाठीचे तिकीट दिले जाते. 

👆 मुकुंद साबळे ( व्यवसाय सीए, वय 65 वर्षे )

बाजीप्रभू चौक निवासी बस स्टॉप च्या बाजूलाच पान टपरी आहे आणि त्यामुळे तिथे अनेक लोक सिगारेट ओढत असतात त्यामुळे तिथे तो धूर होतो आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो एवढी सगळ्या वयाची लोकांची तिथे गर्दी असते त्या गर्दीच्या ठिकाणी सिगारेटचा धूर नसावा. तसेच त्या चायनीजच्या दुकानातून देखील वास येतो त्यामुळे त्या बसस्टॉप वर थांबणे असहाय्य होते. तसेच पावसामुळे तिथे खूप पाणी साचते ज्यामुळे तिकडे उभे सुधा राहता येत नाही. तसेच त्या बसस्टॉप वर बसचे एक वेळापत्रक असावे. बऱ्याच वेळा गाडी अर्धा अर्धा तास येत नाही ते का होते ते ही बघावे व अस होऊ नये ह्याचीही दक्षता घेण्यात यावी.

👆 मीनाक्षी नेरकर, गृहिणी, वय 74 वर्षे 

केडीएमटीची बस सर्विस खूपच अनियमित झाली आहे. तासभर बस येत नाही.
बाजी प्रभू चौकात निवासी विभाग बस स्टॉप वर खूप पाणी साचलेले असते. त्या पाण्यातून बस मधे चढावे लागते. 

👆 राजीव देशपांडे, निवृत्त, वय 70 वर्षे

   मला नोकरीसाठी रोजच प्रभादेवी, मुंबई येथे रेल्वेने जावे लागते. त्यासाठी प्रथम मला सकाळी 6.20 वाजताची बस निवासी बस थांबा येथून आणि सायंकाळी/रात्री बाजीप्रभू चौक थांबा येथून केडीएमटी बस पकडावी लागते. सकाळची 6.20 आणि 6.25 वाजताची बस कधीच वेळेवर येत नाही. अनियमित बस सेवेमुळे अनेक वेळा मला रिक्षाचा भुर्दंड सहन करावा लागतो. सद्या असलेल्या बस या देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न ठेवता तशाच पाठविल्या जात आहेत. प्रशासनाने सुस्थितीतील बस पाठवाव्यात जेणेकरून प्रवाशांना आणि चालक, वाहक यांना त्रास होणार नाही. वातानुकूलित बस सेवा का बंद केल्या हे समजत नाही, त्या पुन्हा चालू कराव्यात ही विनंती. जर बस सेवेत सुधारणा झाली नाही तर आम्हा Gen z तरुणांना यासाठी उग्र आंदोलन करावे लागेल.
 
👆 निहाल आंबेरकर, पदवीधर नोकरदार, वय 30 वर्षे

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*नवी मुंबई, प्रतिनिधी*

लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांनी नेत्रदान आणि अवयवदानाविषयी समाजात असणारी अनास्था चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. 

वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीनांसाठी घरत यांच्या 34 व्या 'लेकुरे उदंड झाली' आणि 35 व्या 'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन 27 जुलै रोजी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

*श्रीलंकेचे उदाहरण*  
घरत म्हणाले, "श्रीलंका हा देश भारताच्या एखाद्या राज्याइतकाच आहे. परंतु तेथे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतात मरणोत्तर नेत्रदान करणारे केवळ 10 ते 12 टक्के आहेत. देहदानाची परिस्थितीही अशीच आहे."

"मौल्यवान डोळे, यकृत आणि इतर मानवी अवयव मृत्यूनंतर त्या देहासोबतच जाळून टाकून राख करण्याऐवजी ते अवयवदान म्हणून दिल्यास कित्येकांना नवजीवन मिळू शकते," असेही त्यांनी सांगितले.

*पुस्तक प्रकाशन*  
'लेकुरे उदंड झाली' या पुस्तकाचे प्रकाशन विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे यांच्या हस्ते झाले. त्या म्हणाल्या, "दृष्टीहीनांच्या संगीत साधनेबद्दल आपण जाणतो. डोळ्यांच्या उणीवेच्या बदल्यात नियतीने त्यांना अतिरिकीत इंद्रिय दिले असावे इतके तन्मयतेने ते संगीत सादर करतात. आपले अवयव शाबूत असल्याने आपण मोठ्या आरोग्यसंपदेचे धनी आहोत."

'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या पुस्तकाचे प्रकाशन घरत यांचे महाविद्यालयीन सहकारी प्रा. एकनाथ जाधव यांच्या हस्ते झाले. जाधव म्हणाले, "आपल्यावर समाजाचे कर्ज आहे. त्याची फेड करताना घरत यांना पाहून समाधान वाटते. असाच ज्ञानप्रकाश सर्वत्र पसरावा."

*उपस्थिती*  
या कार्यक्रमाला डॉ. श्रद्धा सोमण, अध्यापिका विभावरी तरटे, शुभदा बोराडे आणि देशमुख पर्यटन केंद्राचे प्रमुख दिलीप देशमुख उपस्थित होते. देशमुख यांनी घरत यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या 38 वर्षांच्या सेवेला नागरिकांचा सलाम !!

डोंबिवलीतील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांच्या 38 वर्षांच्या सेवेला नागरिकांचा सलाम !!

*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवली शहरात गेल्या 38 वर्षांपासून अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रदीप ढाके यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची 38 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या निरंतर सेवेबद्दल नागरिकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

*सेवाभावी वृत्तीचे कौतुक*  
या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री. प्रकाश माने यांनी डॉ. ढाके यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना श्री. प्रकाश माने म्हणाले, _"वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. प्रदीप ढाके. गेल्या 38 वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना योग्य उपचार आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करून समाजात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे."_

*रुग्ण आणि सहकाऱ्यांसह साजरा केला गौरव*  
कार्यक्रमात डॉ. ढाके यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना डोंबिवली विधानसभा समन्वयक तथा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह श्री. विजय देशमुख, शिवसेना डोंबिवली शहर उपसंघटक सौ. प्रतीक्षा प्रकाश माने, टिळक नगर येथील हरी मुकुंद सोसायटीचे पदाधिकारी श्री. महाजन, श्री. महापदी, ज्येष्ठ समाजसेविका सौ. मालती ताई साटम, एकरूप सहकार मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे डॉ. ढाके यांच्या सेवेला साथ देणाऱ्या स्टाफमधील श्री. रघुनाथ कांबळे, सौ. प्रियांका गायकर, सौ. मनीषा गरुड, सौ. सोनल पिस्ते, दर्शन सोनावणे, नागेश पवार, पूनम जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. प्रदीप ढाके आणि त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अशीच निरंतर समाजसेवा करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !

*एक तास बस न आल्याने प्रवाशांचा संताप; डेपोत जाणाऱ्या बसवरून वाद, प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात !

*डोंबिवली, प्रतिनिधी 

डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक या केडीएमटी बससेवेत वारंवार गोंधळ होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यातूनच सोमवारी दुपारी वाद होऊन प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले.

*काय घडले?*  
निवासीतील एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर सागर पाटील हे दुपारी 2 वाजल्यापासून डोंबिवलीला जाण्यासाठी वाट पाहत होते. एक तास उलटूनही बस न आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यात विनाफलक असलेल्या दोन बसेस डेपोत जात असल्याचे सांगून आल्या. 

त्यातील एका बसमध्ये सर्व प्रवासी चढले असता वाहकाने "ही बस कल्याण डेपोत जाते, डोंबिवलीला जाणाऱ्यांनी उतरा" असे सांगितले. इतर ज्येष्ठ नागरिक उतरले, मात्र उशीर झाल्याने सागर पाटील यांनी ही बस आधी डोंबिवलीला घेऊन जावी अशी विनंती केली. यावरून वाहकाशी वाद झाला. वाहकाने उर्मटपणे बोलून बस मानपाडा पोलीस ठाण्यात नेली आणि सरकारी कामात अडथळा केल्याचा आरोप केला. 

पोलिसांनी चौकशीअंती तक्रार तथ्यहीन असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनीही तरुणाची बाजू घेतली.

*प्रवाशांच्या तक्रारी*  
केडीएमटीच्या वेळापत्रकानुसार दुपारी 2 ते 3 या वेळेत किमान 3 बसेस यायला हव्या होत्या, पण एकही आली नाही. बसेस वारंवार बिघडतात आणि फेऱ्या रद्द होतात. डेपोत जाणाऱ्या बसेसवर फलक नसल्याने गोंधळ वाढतो. याचा फायदा रिक्षाचालक घेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

*प्रशासनाला इशारा*  
डोंबिवली एमआयडीसी निवासी हा केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. वेळेत सुधारणा न झाल्यास प्रवाशांचा संताप अनावर होईल आणि तरुण वर्ग आंदोलनाच्या मार्गाने जाईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !

एक तास केडीएमटी बस न आल्याने व त्यानंतर आलेली बस ही डेपोत जात असल्याने तरुणाचा संताप ! प्रकरण पोलीस ठाण्यात !!

महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर...

          डोंबिवली एमआयडीसी निवासी ते डोंबिवली रेल्वे स्थानक अशी बस सेवा कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन (KDMT) तर्फे चालविण्यात येते. मागील मार्च महिन्यापासून सर्वच मार्गावरील नवीन घेतलेल्या वातानुकूलित बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच मार्गावर जुन्या बीना वातानुकूलित (नॉनएसी) बसेस चालविण्यात येत होत्या. त्या बसेस मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने त्या वाटेत बंद पडत असल्याने या निवासी व इतर मार्गावरील काही बसेस फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे प्रवासी जाम वैतागले गेले आहेत. यामुळे त्याचीच परिणीती काल सोमवारी दुपारी घडली.

             निवासी भागात राहणारे  सागर पाटील हे आपल्या नोकरी व्यवसाय करीता जाण्यासाठी सोमवारी दुपारी दोन वाजता निवासी मधील एमएसईबी ऑफीस बस स्टॉपवर आले, त्यांना डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे जायचे असल्याने केडीएमटी बसची वाट बघत बसले परंतु तासभर थांबून तीन वाजले तरी एकही बस आली नाही, त्यात जोराचा पाऊस पडत होता त्यामुळे ते आणि बसस्टॉपवर उभे असलेले इतर ज्येष्ठ पुरुष/महिला संतापले होते. तेवढ्यात तेथे एक केडीएमटीची विनाफलक लावलेली बस आली पण त्यातील चालक वाहक यांनी सदर बस ही डेपोत जात असल्याचे सांगितले त्यामुळे ते सर्वजण या बस मध्ये चढले नाहीत. अजून थोड्यावेळाने विनाफलक लावलेली एक बस आली असता त्यात या स्टॉपवरील सर्वजण त्यात चढले असता त्यातील वाहकाने सांगितले की ही बस कल्याण डेपोत जात आहे तेव्हा त्या मार्गावरील प्रवासी बसा, बाकी सगळे खाली उतारा. परंतु येथील स्टॉपवरील सर्व प्रवाशांना डोंबिवली कडेच जायचे होते. त्यामुळे गुपचूपपणे ज्येष्ठ पुरुष, महिला प्रवासी या बस मधून उतरले पण तरुण असलेले सागर पाटील याना कामावर तातडीने जायचे असल्याने व आधीच उशीर होवून तासभर स्टॉपवर थांबल्याने ते संतापले होते. त्यांनी शांतपणे बसमधून उतरण्यास नकार दिला व ही बस डोंबिवलीकडे नेहून नंतर ती डेपोत घेऊन जावी असा सल्ला दिला. त्याला कारणही असे होते की तासभर बस न आल्याने पुढील प्रत्येक बस स्टॉपवर डोंबिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली होती. परंतु सदर बसचा वाहक उर्मटपणे वागून बस डोंबिवलीकडे जाणारच नाही असे सांगू लागला. शिवाय उर्मटपणे बोलला की तुम्ही मुख्यमंत्री, आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली तरी आमचे कोणीकाही वाकडे करू शकणार नाही. यानंतर सागर पाटील याने विनंतीने, नम्रपणे सांगूनही या बसच्या वाहक, चालकाने डोंबिवली स्थानकाकडे बस नेण्यास नकार दिला. सदर बस वाहकाने चालकास सांगून ही बस मानपाडा पोलिस ठाण्याकडे घेऊन त्या तरुणाला धमकावले की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिस ठाण्यात तुझाविरुद्ध गुन्हा दाखल करतो. खरे तर सागर पाटील या तरुणाने कोणतीही शिविगाळ आणि मारहाण केलेली नसतानाही पोलिसांना या वाहकाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले असता पोलिसांनी सागर पाटील याच्याशी बोलून सदर तक्रार तथ्यहीन असल्याने तक्रार घेण्यास नकार दिला. शिवाय त्यावेळी पोलिस ठाण्यात आलेल्या काही राजकीय पदाधिकारी इत्यादींनी या सागर पाटील तरुणाची बाजू घेतली. त्यामुळे शेवटी या वाहकाने तेथून काढता पाय घेतला. सदर या बसचा रोजनामा (फेरीपत्रक) हे सागर पाटील याने पाहून त्याचा फोटो घेतला असता त्यात असे पाहण्यास आले की या बस मध्ये सकाळी ११.५५ वाजता बसच्या पुढील डावीकडील टायरच्या बेअरिंग मध्ये आवाज येत होता व तो दुरुस्त करण्यात आला होता, शिवाय ही बस क्रमांक :- ५१ डोंबिवली कासा रिओ (मेन गेट निळजे मार्गे) आणि डोंबिवली - निवासी अशा फेऱ्या मारणारी होती. या बसचा क्रमांक ११५५ आणि वाहकाचा/कंडक्टरचा क्रमांक ७१११ असा होता. हे सर्व फेरीपत्रक मधून समजले आहे. या सर्व प्रकाराने या तरुणाचे आणि सदर बस वाहक, चालकाचे दोन तास वाया गेले. याच वेळेत पंधरा मिनिटांवर असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकवर अनेक बस फेऱ्या झाल्या असत्या. विशेष म्हणजे या डेपोत जाणाऱ्या दोन्ही बसेसवर बस कुठे जात आहे याचा कोणताही फलक लावला नव्हता. त्यामुळे प्रवाशांच्या आणखी गोंधळ उडाला.

केडीएमटीच्या अधिकृत बस वेळापत्रकाप्रमाणे दुपारी दोन ते तीन दरम्यान कमीतकमी तीन बस (१४.१०, १४.२०, १४.४५)  या एमएसईबी ऑफीस बसस्टॉपवर यायला पाहिजे होत्या पण त्या दरम्यान एकही बस आली नाही. या सर्व गोंधळाला केडीएमटी प्रशासन जबाबदार असून रोजच दिवसभर असाच प्रकाराचा गोंधळ तसेच बसेस वेळेवर न येण्याच्या प्रकार चालू असतो. यामुळे याच्या फायदा रिक्षावाले उचलीत असून केडीएमटी प्रशासनाशी रिक्षावाल्यांचे साटेलोटे होत असल्याचे आरोप बस प्रवासी करीत आहेत. एकंदर प्रवाशांना वेळ नसल्यामुळे व पोलिस स्टेशनला जाण्याची भीती असल्यामुळे कोणी प्रवासी या अन्यायाविरुद्ध समोर येत नाही याचा गैरफायदा हे केडीएमटी बसवाले घेत असल्याचे दिसत आहेत.

डोंबिवली एमआयडीसी निवासी हा मार्ग केडीएमटीचा सर्वात फायदेशीर मार्ग असून रोज या मार्गावरून हजारो प्रवासी जात येत असतात. केडीएमटी प्रशासनाने या मार्गावरील बस सेवेत वेळीच सुधारणा न केल्यास येथील प्रवाशांचा संताप अनावर होऊन त्याची मोठी किंमत प्रशासनाला कधीतरी मोजावी लागणार आहे. त्यात सागर पाटील सारखे तरुण वर्ग एकटवले तर हे तरुण जेन झी (Gen z) संतापून उठून आंदोलनाच्या मार्ग अवलंबतील तर प्रशासनाची मोठी गोची होईल. प्रशासनाने यात वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

Monday, 27 July 2026

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

शिवप्रतिमा मित्र मंडळाने केडीएमसीच्या सहकार्याने लावली आठ फूट उंचीची 50 बकुळ फुलांची झाडे, आयुक्तांनी लावली उपस्थिती !!

        डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उत्सव, कला , सेवा आणि पर्यावरणीय कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या शिवप्रतिमा मित्र मंडळातर्फे निवासी भागात 50 बकुळ फुलांची झाडे लावली गेली आहेत. वृक्षारोपण केलेली ही झाडे आठ फूट उंचीची असल्याने लवकरच त्या झाडांवर फुले बहरणार असून एमआयडीसी निवासी परिसर त्याच्या सुगंधाने आणि सुहासिक वासाने प्रदूषण मुक्त होणार आहे. सदर ही झाडे आणि त्याना लागणारे खत हे केडीएमसी तर्फे मोफत देण्यात आले होते. 

विशेष म्हणजे आज रविवारी 26 जुलै रोजी झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त श्री अभिनव गोयल, मुख्य उद्यान अधीक्षक श्री संजय जाधव, नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका पूजा योगेश म्हात्रे, शिवसेना (उबाठा) कल्याण जिल्हा अध्यक्ष अभिजित सावंत, योगेश म्हात्रे हे जातीने उपस्थित होते. माननीय आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आयुक्तांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले की कल्याण डोंबिवली महापालिका तर्फे यावर्षी दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये सामाजिक संस्था, मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, गृहनिर्माण संस्था, नगरसेवक इत्यादींनी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी महापालिका सर्व सहकार्य करेल.

            एमआयडीसी निवासी मध्ये या पावसाळ्यात काही कारणांमुळे अनेक झाडे कोसळली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही 50 मोठ्या उंचीची बकुळ फुलांची झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात काही अंशी कमी होईल तसेच या नगरीच्या सौंदर्यात वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची झाडे लावण्याच्या संकल्प शिवप्रतिमा मित्र मंडळाने केला आहे. 

           शिवप्रतिमा मित्र मंडळाच्या या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री दिलीप साळवी, सचिव श्री जयसिंग आयरे, श्री विजय कुलकर्णी, राजू नलावडे, मंदार स्वर्गे, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, निहाल आंबेरकर, सौ. रजनी कुचे इत्यादींनी परिश्रम घेतले होते.

सौजन्य - राजू नलावडे (डोंबिवली)

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६६ झाडांचे वृक्षारोपण !

डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतर्फे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आज 27 जुलै वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांना ६६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज सकाळी एमआयडीसी निवासी भागात एकूण ६६ देशी झाडे लावण्यात आली आहेत. यात जांभूळ, वड, पिंपळ, कडुनिंब, बकुळ इत्यादी प्रकाराच्या झाडांचा समावेश आहे. 

              डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये प्रदूषणाची समस्या मोठी आहे. शिवाय येथे नवीन गटारे/नाले आणि काँक्रिट रस्ते बनविताना झाडाच्या खोडांना/बुंध्याला धक्के बसल्याने तसेच काँक्रीटीकरणामुळे झाडांना पाणी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात झाडे पडली होती. यामुळे पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक होते. सदर ही ६६ देशी झाडे लावल्यामुळे एमआयडीसी मधील प्रदूषण भविष्यात कमी होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारची देशी झाडे लावण्याचे उद्दिष्ट एमआयडीसी शिवसेना शाखेने ठरविले आहे.

        नुकत्याच झालेल्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते, आमदार श्री आदित्यजी ठाकरे यानी डोंबिवली एमआयडीसी मधील धोकादायक रासायनिक उद्योगांचे स्थलांतर करण्याविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा मा. उद्योग मंत्री श्री उदय सामंत यानी उत्तर देऊन धोकादायक रासायनिक स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भविष्यात डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार आहे.

              सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हा प्रमुख श्री अभिजीत सावंत, उपविभाग प्रमुख मंदार स्वर्गे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, महिला विभाग संघटक सौ रजनी कुचे, शाखा संघटक सौ विनिता सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप साळवी, राजू नलावडे, जयसिंग आयरे, विजय कुलकर्णी, रामदास मेंगडे, मनोहर पाटील, रमेश गुरव, भरत सावंत इत्यादी उपस्थित होते.

Sunday, 26 July 2026

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !!

साई ट्रस्ट विद्यालयात रंगला भक्तीचा मळा !!

उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे) : साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात आषाढी एकादशीचा सोहळा मोठया भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेच्या सुमारे अकराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सलवार कुर्ता आणि विद्यार्थिनींनी नऊवारी साडी परिधान केले होती आणि हातात भगवे झेंडे घेतले होते. विठू नामाच्या गजरात टाऊनशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. 

यावेळी जे एन पी ए चे अधिकारी वर्ग उपस्थित होते त्यामध्ये सयाजीराव साळुंखे  मॅनेजर इस्टेट जे एन पी ए, प्रवीण पाटील लेबर वेल्फेअर ऑफिसर जे एन पी ए आणि संदीप घरत मॅनेजर जे एन पी ए यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे, माध्यमिक इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव, आणि अंकुश जोगळे यांनी केले.सुरुवातीला शाळेचे आदर्श पिटी शिक्षक मनोहर टेमकर  यांनी सर्व प्रमुख मान्यवरांचे महाराष्ट्राचे पारंपारिक नृत्य लेझीमच्या गजरात स्वागत केले. यानंतर रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक पंडित गणेश बंडा यांनी आणि विद्यार्थ्यांनी भजन केले.दिंडी शिस्त आणि फलक लेखन कलाशिक्षक मिलिंद ठाकूर यांनी उत्तमप्रकारे केले.या रिंगण सोहळ्यात सर्व मान्यवरांनी सहभाग घेतला. जे एन पी ए चे उपस्थित सर्व अधिकारी विद्यार्थ्यासोबत नृत्याच्या भक्तीरसात दंग झाले. प्रमुख पाहुण्यांनी फुगडी देखील घातली. 

यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी श्री विठ्ठलाची मनोभावे पूजा केली. यावेळी साईट ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे झाडाचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी सयाजीराव साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेने आषाढी एकादशीची दिंडी काढताना पर्यावरणाचा संदेश दिल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी झाड लावले पाहिजे आणि ते जगविले पाहिजे असे आवाहन केले. तसेच इयत्ता दहावी आणि स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांनी शाळेच्या इतिहासात अशाप्रकारे प्रथमच भव्य दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले असे म्हटले. तसेच तसेच मराठी माध्यमाचा निकाल गेली अनेक वर्ष सातत्याने १००% लागत आहे. तसेच तालुक्यातील मराठी माध्यमात पहिले चार विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत असे म्हटले. इंग्रजी माध्यमाचा निकाल  उत्तम आहे. यावर्षी अधिकाधिक विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा अधिक गुण मिळतील असे आश्वासन त्यांनी मान्यवरांना दिले. 

त्यानंतर संगीत शिक्षक  गणेश बंडा यांनी महाआरती घेतली. यामध्ये सर्व प्रमुख मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी भजनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुमारी स्वरा कांबळे आणि यांनी सुंदर अभंग गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या सहशिक्षिका श्रीमती वंदना कपूर आणि माध्यमिक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका श्रीमती कीर्ती शिरसाठ , किशोर म्हात्रे  यांनी केले.आषाढी एकादशीच्या अभंगवाणी कार्यक्रमात इंग्रजी व मराठी माध्यमाचे इयत्ता दहावीचे खालील विद्यार्थी सहभागी होते 
कु.स्वरा कांबळे, कु.प्रियांसी डाकी, कु.अविष्कार घोडके, कु.जिग्नेश, कु.तन्मय कोळी, कु.कार्तिक ठाकूर त्याचबरोबर या पर्यावरण रक्षण दिंडी सोहळ्यामध्ये शाळेच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या भक्तिभावाने सक्रिय सहभाग घेतला. सर्वांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !! अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ : भा...