सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला कर्करोग जनजागृती व्याख्यान उत्साहात संपन्न !!
वसई प्रतिनिधी/ मयुरी चव्हाण
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए३ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ वसई यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट पीटर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, दिवाणमान, वसई (प.) येथे बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी महिला कर्करोग जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला विद्यार्थिनी, महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विश्वस्त श्री. राहुल जोसेफ आणि प्राचार्या सौ. लता के. सौंदाणे, प्रमुख पाहुण्या म्हणून लायन्स क्लब ऑफ वसई च्या भारती पवार (सॅटेलाइट को-ऑर्डिनेटर), डॉ. जुली सिंह (डीसी – महिला व बालकल्याण) तसेच हनुमंत भोसले (डीएफए – एचपीव्ही सर्व्हायकल कर्करोग लसीकरण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी गेल्या १५ वर्षांपासून मीरा-भाईंदर परिसरात प्रख्यात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंध, जनजागृती आणि एचपीव्ही लसीकरण तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्याच्या संबंधित समितीच्या संयोजक म्हणूनही कार्यरत असणाऱ्या डॉ. नवनीत देसाई यांनी आपल्या मार्गदर्शनात स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत सविस्तर माहिती दिली. कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, योग्य वेळेत निदानाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणीची आवश्यकता, उपलब्ध आधुनिक उपचारपद्धती तसेच एचपीव्ही (HPV) लसीचे महत्त्व, लस घेण्याचे योग्य वय आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणामधील तिची भूमिका याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहावे, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्याख्यानानंतर विद्यार्थिनी, महिला शिक्षक, कर्मचारी आणि उपस्थित पालक यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या संवादात्मक सत्रामुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर लायन श्रद्धा मोरे व लायन वनिता निनावकर, एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन चे प्रतिनिधी मनोज परब, शाहीन शेख तसेच सेंट पीटर ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
एमओसी कॅन्सर केअर फाउंडेशन गेल्या आठ वर्षापासून कर्करोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीसाठी कार्यरत आहे. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कर्करोगाचे वेळेत निदान व प्रतिबंधाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण, उपयुक्त आणि समाजोपयोगी असल्याची भावना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment