Tuesday, 30 June 2026

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, प्रतिनिधी :
अन्न व औषध प्रशासनाने 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत २५ ते २७ जून २०२६ या कालावधीत पुणे व सोलापूर जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग तसेच हॉटेल आस्थापनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे १३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट केला.

शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२,२७८ लिटर दूध नष्ट करून संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

आंबेगाव येथील उमिया मिल्क प्रॉडक्टमध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन होत असल्याने १,१५५ किलो एडिबल केसिनेट व कोयागुलम जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरी येथे विनापरवाना व अस्वच्छ ठिकाणी मिठाई उत्पादन होत असल्याने १८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूध नष्ट करून परवाना निलंबित करण्यात आला.

याशिवाय, ताथवडे (पुणे) येथील गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शाळा प्रवेशासाठी लाच घेताना दोघे जाळ्यात !!

ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; शाळा प्रवेशासाठी लाच घेताना दोघे जाळ्यात !!

*ठाणे, दि. २९ जून* : ठाण्यातील एका खासगी शाळेत इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी लाच मागून त्यातील रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खासगी शैक्षणिक प्रवेशातील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राबोडी येथील तक्रारदार महिलेच्या मुलीचा घोडबंदर रोड परिसरातील खासगी शाळेत प्रवेश करून देण्यासाठी आरोपींनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

तडजोडीनंतर आरोपींनी लाचेच्या रकमेपैकी ७७ हजार ३०० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. फातिमा अन्सारी (वय ३५, रा. राबोडी, ठाणे) आणि चैतन्य प्रदीप प्रधान (रा. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर शिंदे आणि उपअधीक्षक भगवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने नितीन ठाकरे यांना शुभेच्छा !

रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेलच्या वतीने नितीन ठाकरे यांना शुभेच्छा !

*उरण, दि. ३० (विठ्ठल ममताबादे)* : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदी पदोन्नती झाल्याबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे, पनवेलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चंद्रकांत महादेव गुजर, रमेश आगरे, संजय चाळके, प्रशांत भेकरे, अमोल धुमाळी व वसंत सोनावणे उपस्थित होते. नितीन ठाकरे यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व ; चालकाला थेट सव्वा कोटींचा बंगला भेट !

महेंद्रशेठ घरत यांचे अफाट दातृत्व ; चालकाला थेट सव्वा कोटींचा बंगला भेट ! 

उरण दि ३०, प्रतिनिधी : सध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, मानवी मूल्यांचे, माणुसकीचे जतन करणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आपले वाहनचालक मेहबूब लदाप यांना सव्वा कोटी रुपये किमतीचा, सर्व आधुनिक सुविधा असलेला ‘मयुरेश व्हिला’ हा बंगला अधिकृतपणे नावावर करून दिला आहे. द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बंगल्याचे (सोमवारी, दिनांक २९ जून) सोनाली रिअॅलिटीचे डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि मेहबूब लदाप याच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई घरत, कुणाल घरत उपस्थित होते. 

ही घटना श्रमाचा गौरव करणारी आणि संपत्तीचा वापर सामाजिक न्यायासाठी कसा करावा, याचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे. कष्टाचे मूल्य केवळ पैशात न ठरवता त्याला कौटुंबिक भावना देणे ही गोष्ट आजच्या काळात अत्यंत दुर्मीळ मानली जात आहे. पाच वर्षांच्या सेवेमध्ये एका कर्मचाऱ्याला थेट सव्वा कोटी रुपयांचा बंगला भेट देण्यामागे महेंद्रशेठ यांची कोणतीही जात-पात न मानता माणूस म्हणून सर्वांना समान मानण्याची भूमिका दिसून येते. स्वतःला एकच मुलगा असून त्याला राहण्यासाठी एक बंगला पुरेसा आहे, या विचाराने दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी धर्म, प्रांत किंवा भाषा असा कोणताही संकुचित विचार मनामध्ये आणला नाही, तर केवळ तिशीतील एका सामान्य तरुणाचे आणि त्याच्या कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. शेलघर येथील त्यांचा 'सुखकर्ता' हा बंगला गरजू लोकांसाठी नेहमीच हक्काचे ठिकाण राहिला असून तिथून कोणताही गरजू माणूस रिकाम्या हाताने परत जात नाही, हा जनमानसातील विश्वास या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.

या अनपेक्षित भेटीमुळे भारावून गेलेले चालक मेहबूब लदाप यांनी वृत्तप्रतिनिधींशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, २८ एप्रिल २०२१ रोजी गव्हाण येथील शांतादेवी यात्रेच्या दिवशी मी कामाच्या शोधात महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील ‘सुखकर्ता’ बंगल्यावर गेलो होतो. तेथे महेंद्रशेठ यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी चालक म्हणून काम करण्याची मला संधी दिली. गव्हाणच्या शांतादेवी यात्रेचा तो दिवस माझे संपूर्ण जीवन बदलणारा ठरला आणि शांतादेवीच मला प्रसन्न झाली. आपण केवळ साहेबांची गाडी चालवत होतो, पण ते आपल्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत आहेत. मेहबूब लदाप यांनी पुढे सांगितले की, मी कोण आणि कुठल्या गावचा, याचा महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी कधीही विचार केला नाही. केवळ पाच वर्षांच्या सेवेमध्ये आपल्या कर्मचाऱ्याला आलिशान बंगला थेट भेट म्हणून देणारी अशी दानशूर व्यक्ती महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई यांनी हे स्वप्न माझ्यासारख्या तिशीतील तरुणासाठी प्रत्यक्षात आणले आहे. आजचा दिवस माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी मोठा आनंदाचा असून 'मयुरेश व्हिला' हा बंगला नावावर करून साहेबांनी एक आदर्श निर्माण केला आहे. जनसेवेचे हे काम असेच सुरू राहण्यासाठी महेंद्रशेठ आणि शुभांगीताई यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना मेहबूब आणि त्यांच्या कुटुंबाने केली आहे.

महेंद्रशेठ घरत यांचे हे काम केवळ याच घटनेपुरते मर्यादित नसून त्यांच्या सामाजिक जीवनाचा तो एक भाग आहे. त्यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून आतापर्यंत सुमारे १५०० लोकांना हक्काच्या घरांसाठी लागणारे साहित्य किंवा थेट आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. अनेक गरजू व्यक्तींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासोबतच, त्यांनी अनेक अनाथ आणि गरीब मुले दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक फी, कपडे आणि इतर आवश्यक गरजांचा खर्च स्वतः उचलला आहे. आर्थिक अडचणींमुळे ज्या पालकांना आपल्या मुलांना जास्त शुल्क भरून इंग्रजी माध्यमात शिकवणे शक्य नव्हते, अशा सर्वसामान्यांसाठी त्यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाण येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना करून शिक्षणाची दारे खुली केली आहेत. याशिवाय त्यांनी आजवर अनेकांना चारचाकी गाड्या आणि महागडे मोबाईल फोन देखील भेट दिले आहेत.

महेंद्रशेठ घरत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची कौटुंबिक मूल्ये आणि लिंगसमानतेविषयीची स्पष्ट भूमिका होय. समाजात मुलगा आणि मुलगी समान मानण्याच्या केवळ गप्पा मारल्या जात असताना, त्यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतील चार हिस्से केले आणि मुलीला, मुलाला आणि शुंभांगीताईंनाही समान वाटा  दिला. मुलीचाही समान अधिकार असतो, हे महेंद्रशेठ घरत यांनी कृतीतून सिद्ध केले. नवी मुंबई परिसरामध्ये साडेबारा टक्के जमिनींच्या वाटणीवरून, अनेक कुटुंबात वाद निर्माण होऊन नाती कोर्टकचेऱ्यांत अडकल्याचे त्यांनी जवळून पाहिले होते. अनेक रक्ताची नाती तुटली आहेत. आपल्या कुटुंबात असा प्रसंग येऊ नये म्हणून त्यांनी पत्नी शुभांगी आणि मुलगा कुणाल यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला. 

 मालमत्ता किती मूल्याची आहे यापेक्षा ती देण्याची मानसिकता महत्त्वाची असते, हेच त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले. यासोबतच, त्यांना मिळालेली सर्व वडिलोपार्जित संपत्तीही भावांना, बहिणींना व्यवस्थित वाटप केली. तसेच त्यांनी आपल्या आईच्या नावाने यमुना सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्ट स्थापन करून समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे.

संपत्तीपेक्षा कौटुंबिक शांतता, सामाजिक न्याय आणि नैतिक मूल्ये किती श्रेष्ठ असतात, याचा एक नवा पायंडा महेंद्रशेठ घरत यांनी या संपूर्ण कार्यातून घालून दिला आहे. यावेळी एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी मेहबूब लदाप याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

भिवंडीत झाड कोसळून कारचा चुराडा; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

भिवंडीत झाड कोसळून कारचा चुराडा; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

भिवंडी प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 30 जून 2026 :

भिवंडी शहरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या हलक्या पावसानंतर मोठी दुर्घटना टळली. शहरातील वऱ्हाळ तलाव परिसरात असलेले एक जुने व विशाल झाड अचानक मुळासकट उन्मळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसरोवर रोडवरील वऱ्हाळ तलाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक जुने व मोठे झाड अचानक मुळासकट उन्मळून जवळ उभ्या असलेल्या एमएच-०१-ईडब्ल्यू-२०३२ क्रमांकाच्या वॅगनआर कारवर कोसळले. झाडाच्या प्रचंड वजनामुळे कारचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेपूर्वी काही वेळ कारचालकाने वाहन तेथे उभे करून घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. जर तो त्यावेळी वाहनात असता, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापून हटवल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

दरम्यान, पावसाळ्यात शहरातील जुनी व धोकादायक झाडे कोसळण्याचा धोका कायम असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अशा झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी अथवा हटविण्याची कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; फरार सूत्रधाराची पत्नी पटना येथून अटक, ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; फरार सूत्रधाराची पत्नी पटना येथून अटक, ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगात; मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ताच्या शोधासाठी महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात छापेमारी सुरू

भिवंडी प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 30 जून 2026 :

महाराष्ट्रातील बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारमधील पटना येथून अटक करण्यात आली. मंगळवारी कोनगाव पोलिसांनी तिला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याच्या शोधासाठी ठाणे पोलिसांचे विशेष पथक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील कुम्हरार गावात पोहोचले होते. तेथे तो लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच तो फरार झाला. तपासादरम्यान कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याची पत्नी सुमन कुमारी हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिची औपचारिक अटक करण्यात आली.

तपास यंत्रणांच्या मते, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे सुमन कुमारीच्या बँक खात्यांशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीच्या बँक खात्यांद्वारे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले का, तिने फरार मुख्य आरोपीला मदत केली का आणि तिच्यामार्फत मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येईल का, याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान, पोलिस तपासात आतापर्यंत उघड झाले आहे की, टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई केंद्रातून बाहेर काढण्यात आले होते. तेथून दिल्लीमार्गे महाराष्ट्रात आणून नियोजनबद्ध पद्धतीने पेपरफुटी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमन कुमारीच्या अटकेनंतर अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. मात्र आग्रा येथून प्रश्नपत्र उपलब्ध करून देणारे अन्य चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने छापेमारी सुरू आहे.

कोनगाव पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासली जात आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे, बँक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरोपी पक्षाचे वकील ॲड. शैलेश गायकवाड यांनी न्यायालय परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची अशिल सुमन कुमारी तपासापासून पळ काढत नव्हती आणि तिने पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. अटकेनंतर तिने आपल्या पती बिजेंद्र कुमार गुप्ता याच्याशी मोबाईलवर संवाद साधल्याच्या आधारावरच पोलिसांनी तिला अटक केली आहे. आतापर्यंत कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा थेट पुरावा समोर आलेला नसून, सध्या कॉल डिटेल्सच्या आधारे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या या हाय-प्रोफाइल टीईटी पेपरफुटी प्रकरणात आता तपासाची दिशा आर्थिक व्यवहार, तांत्रिक पुरावे आणि फरार सूत्रधारापर्यंत पोहोचण्यावर केंद्रित झाली आहे. सुमन कुमारीच्या चौकशीतून मुख्य आरोपीसह या संपूर्ण रॅकेटमधील इतर संबंधितांविषयी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. ६ जुलै रोजी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपासाच्या प्रगतीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.

Monday, 29 June 2026

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!

*ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर; ३० जूनपासून 'बीएलओ' घरोघरी जाणार !!

*ठाणे, दि. २९* : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) राबवण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन गणनाप्रपत्र भरून घेणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

*राजकीय पक्षांसोबत बैठक*  
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत रोडे, विठ्ठल डाके आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*७४.५ लाख मतदारांची तपासणी*  
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ६,८९४ मतदान केंद्रांशी जोडलेल्या ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांची पात्रता या मोहिमेत तपासली जाणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भागनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

*कार्यक्रमाचा टप्पा*  
- *३० जून ते २९ जुलै २०२६*: BLO घरोघरी जाऊन गणनाप्रपत्र भरून घेणार. नाव, लिंग, वय, पालकांचा तपशील, स्थलांतरित, मृत व दुहेरी नोंद असलेल्या मतदारांचे वर्गीकरण केले जाईल. 
- *५ ऑगस्ट २०२६*: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. विसंगती असलेल्या मतदारांची सुनावणी होईल.
- *५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६*: दावे व हरकतींचा कालावधी. नवीन नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, दुरुस्ती व स्थलांतरासाठी फॉर्म ८ भरावा लागेल.

*नागरिकत्वाचा पुरावा बंधनकारक*  
- *१ जुलै १९८७ पूर्वी जन्म*: स्वतःची जन्मतारीख/जन्मस्थळाचा कोणताही एक वैध पुरावा.
- *१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४*: आई किंवा वडिलांचा भारतातील जन्माचा पुरावा.
- *२ डिसेंबर २००४ नंतर जन्म*: पालकांपैकी कोणी भारतीय नागरिक नसल्यास, जन्माच्या वेळचा वैध पासपोर्ट व व्हिसा.
- *परदेशात जन्म*: भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणी पुरावा.
- *नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व*: नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र.

मतदाराचा २०२६ च्या यादीतील छापील तपशील, गणना प्रपत्र आणि घोषणापत्राशिवाय नवीन नोंद केली जाणार नाही. ज्या भागात ४० टक्क्यांपेक्षा कमी मॅपिंग आहे, तेथे राजकीय पक्षांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

*'पात्र मतदार सुटणार नाही, अपात्र समाविष्ट होणार नाही'*  
‘पात्र असलेल्या कोणत्याही नागरिकाचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही’ हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अंतिम यादी छापेपर्यंत दर आठवड्याला आढावा बैठक होणार असून राजकीय पक्षांनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमीच्या जागेसाठी जनआक्रोश मोर्चा !!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमीच्या जागेसाठी जनआक्रोश मोर्चा !!

भिख्खू गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जनसमुदाय हजर

कल्याण, संदीप शेंडगे : वालधुनी येथील बुद्धमूर्तीची तोडफोड प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर बौद्धभूमी फाउंडेशन च्या वतीने जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या दहा दिवसापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर बौद्ध भिक्खू संघ दे मदत धरणे आंदोलन करत आहे परंतु महापालिकेकडून अजूनही बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागे संदर्भात निर्णय होत नसल्याने आज मोर्चाची हाक देण्यात आली होती. गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली हजारो बौद्ध अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व फुले शाहू आंबेडकरी नागरिकांनी 'विशाल जनआक्रोश महामोर्चा' काढला. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी निळे व पंचशील ध्वज फडकावत परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

"बौद्धभूमी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची!", "संविधान वाचवा, बुद्धभूमी वाचवा!" अशा जोरदार घोषणा देत आपला विरोध दर्शवला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले.

मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या.
१) खासदार श्रीकांत शिंदे यांनी बौद्ध मूर्ती तोडफोड प्रकरणी देशातील तमाम बौद्ध अनुयायांची जाहीर माफी मागून आपल्या खासदारपदाचा राजीनामा द्यावा.
 २) श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे तथा उद्योजक अभिषेक घोरडे व त्यांच्या सर्व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
३) आयुक्त अभिनव गोयल व उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.
४) सातबारा उताऱ्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची करण्यात आलेली खोटी नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी. सदर जमिन बौद्धभूमी फाउंडेशनच्या नावे करावी.
५) बेकायदेशीर टीडीआर प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व महापालिका अधिकारी व भूमाफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

मोर्चामध्ये हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त
सहभाग दिसून आला. आंदोलकांनी बौद्ध समाजाच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. या मोर्चामध्ये बामसेफ प्रणित बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन मुक्ती पार्टी सह अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर, संजय मंगला गोपाळ यांचे गौरवोद्गार !!

एकलव्य विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारे समता संस्कार शिबिर, संजय मंगला गोपाळ यांचे गौरवोद्गार !!

ठाणे, दि. 29,

“दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र - मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ३२ व्या वार्षिक समता संस्कार शिबिराच्या समारोपात काढले. समता विचार प्रसारक संस्थेने येऊरच्या निसर्ग समृद्ध वातावरणात हे चार दिवसीय युवा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले होते. संजय मं गो पुढे म्हणाले, “शिबिरातील स्त्री - पुरुष संबंध, मुली मुलांमधील प्रेम व आकर्षण या सत्रांमधून तुम्हाला तुमची आई, बहीण व मैत्रीण यांच्याकडे पाहण्याचा जो समतेचा दृष्टीकोन मिळाला आहे तो कधीच विसरु नका. जसं जगण्यासाठी अन्न आवश्यक असलं तरी आपण ठराविक वेळी व प्रमाणात खातो तसेच मोबाईल सोबत वागा. दिवसांची ठराविक वेळच मोबाईल हातात घ्या. त्या वेळात वर्तमानपत्र, अवांतर पुस्तकं वाचा, चांगल्या फिल्म्स पहा. आपल्या परिसरातील अनेक समस्या तुम्ही मांडल्यात. आता त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या! आपल्या करियरविषयी अधिक पर्यायांचा विचार करा.

यावेळी शिबिरार्थींनीही मनोगतात शिबिर अनुभव अविस्मरणीय आहेत. आम्हांला खूप महत्वाचे ज्ञान शिबिरातून मिळाले, हे आवर्जून सांगितले. पालकांनीही आम्हा सामान्य परिस्थितीत जगणाऱ्यांच्या घरातील मुली - मुलांसाठी संस्था करत असलेल्या धडपडीसाठी आभार व्यक्त केले. संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी यांनी मुलांना शिबिरात मिळालेली शिकवण लक्षात ठेऊन त्या प्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. यानी मुलांना संस्थेच्या कार्यक्रमांशी जोडून रहा असे सांगत संस्थेच्या पुस्तक पेढी उपक्रमाची माहिती दिली.

या वर्षीचे हे युवा शिबिर एकलव्य गौरव पुरस्कार प्राप्त एकलव्यांनी आणि वंचितांच्या रंगमंचाच्या कलाकारांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साही वातावरणात आणि संस्थेची माजी एकलव्य दिपाली सावंत आणि संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांच्या संयोजनात संपन्न झालं. संस्थेच्या संस्थापनात सक्रिय असलेले बिरपाल भाल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी उद्घाटनाच्या सत्रात मुलांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली. या वेळी ठाणे शहरातील किसन नगर, येऊर, मानपाडा, धर्मवीर नगर या वस्तीतील विद्यार्थ्यांबरोबरच घणसोली, काल्हेर, केवणी – दिवे येथील आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची वैचारिक, सामाजिक आणि कलात्मकतेची जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ, कार्यशाळा, व्याख्याने, गट – चर्चा आणि नाटिकांच्या माध्यमातून  त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या साठी अनेक तज्ज्ञ व्यक्ती शिबिरार्थींशी संवाद करायला आले होते.

राजेंद्र बहाळकर यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मित्र - मैत्रिणींशी निखळ मैत्रीच्या दृष्टीने खेळकरपणे समजुतीने कसे राहायचे, मोबाईल फ़ोन, सोशल माध्यमांचा प्रभावावर मात करून टेन्शन फ्री पण ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कसे करायचे या बद्दल खूप प्रभावीपणाने दाखवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बुवांच्या चमत्कारांमागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितले. जादूटोणा, करणी, भूताखेतांच्या गोष्टींमागचा खोटेपणा प्रयोगांद्वारे उघड करून मुलांच्या विचारात बदल घडवून आणला.

आरती नाईक यांनी शरीर विज्ञानामध्ये स्त्री - पुरुषांच्या शारिरीक जडणं घडणीची शास्त्रीय माहिती दिली. वयात येताना प्रकर्षाने जाणवणाऱ्या आकर्षण, प्रेम आणि सेक्स या विषयांवरही त्यांनी शिबिरार्थींना सविस्तर माहिती दिली. मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत मोकळेपणाने चर्चा केली.

सतीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पुढे घेता येऊ शकणाऱ्या विविध करियर निवडींबद्दल माहिती सांगत विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली. मकरंद जोशी यांनी मुलांना अल्गोरिदमची माहिती आणि महत्व समजावून सांगत ते आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवाशी कसे निगडित आहे हे अतिशय छान समजावून सांगितले.

आसावरी जोशी यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू हस्तकलेने कसा साध्य करू शकतो हे शिकवलं आणि मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनात कागदाच्या वस्तू बनवल्या.

सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी नाट्य कार्यशाळा घेऊन मुलांना नाटक या कलेबद्दल माहिती दिली आणि त्यांचे 4 गट पाडून त्या गटांची 4 छोटी नाटकं बसवण्याची तयारी केली. मुलांनी या नाटकांची तालीम करून ती बसवली आणि शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
संस्थेचे कार्यकर्ते अक्षता दंडवते, किशन सिंग बेदी, ओम गायकवाड, एनॉक कोलियार, अजय भोसले, मयूर बने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन मेहनत केली.

संस्थेचे हितचिंतक शरद जोशी, संध्या धारडे, संगीता धनुकटे, सुप्रिया कर्णिक, विनीता मोकाशी, प्रशांत पाटील, सहभागी एकलव्यांचे पालक आदिनी शिबिराला भेट देऊन मुलांचे अभिनंदन केले.

मीनल उत्तुरकर 
समता विचार प्रसारक संस्था 
9833113414

साई फाउंडेशनच्या "सेवा गौरव पुरस्कार २०२६" ने नागरी संरक्षण दलाचे बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे सन्मानित !!!

साई फाउंडेशनच्या "सेवा गौरव पुरस्कार २०२६" ने नागरी  संरक्षण दलाचे बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे सन्मानित !!! 

ठाणे, दि. २८ जून २०२६ : समाजसेवा, मानवता आणि राष्ट्रहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, समाजसेवक व परिवर्तनकर्त्यांचा गौरव करण्यासाठी साई फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित "सेवा गौरव पुरस्कार २०२६" तसेच संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या पाचपाखाडी येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहात पार पडले.

या विशेष सोहळ्यात श्री. लक्ष्मीकांत पोपळे  यांना सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल "सेवा गौरव पुरस्कार २०२६" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या नागरी  संरक्षण दलाच्या कार्याची दखल घेत साई फाउंडेशनने हा सन्मान प्रदान केला. या पुरस्कारामुळे नागरी  संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांमध्ये अधिक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन  श्री. लक्ष्मीकांत पोपळे म्हणाले, "सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन साई फाउंडेशनने आम्हाला 'सेवा गौरव पुरस्कार २०२६' ने सन्मानित केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान व कृतज्ञता वाटते. हा गौरव केवळ आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांची पोचपावती नसून, ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर जिथे-जिथे आपत्ती व गरज असेल तिथे निःस्वार्थ भावनेने धावून जाण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मिळालेली थाप आहे.

"हा सन्मान आमची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. समाज, मानवता आणि राष्ट्रसेवेसाठी यापुढेही अधिक समर्पण, करुणा व शिस्तीने कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. साई फाउंडेशनच्या विश्वास, प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत."

यावेळी त्यांनी "सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!" असा संदेश देत "जय हिंद! जय महाराष्ट्र!" अशा घोषणेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

साई फाउंडेशन ही संस्था समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. "Be a Reason for Someone's Smile" या प्रेरणादायी संदेशातून संस्था समाजात सेवा, करुणा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर 

खाकीतील कुटुंबालाच न्यायासाठी संघर्ष; डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेतील वादाच्या तपासावर प्रश्नचिन्ह !!

खाकीतील कुटुंबालाच न्यायासाठी संघर्ष; डोंबिवलीतील गृहनिर्माण संस्थेतील वादाच्या तपासावर प्रश्नचिन्ह !!

महेंद्र (अण्णा) पंडित / प्रतिनिधी 

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गृहनिर्माण संस्थेतील वादाने गंभीर वळण घेतले असून, अनुसूचित जातीच्या (एससी) एका महिलेने पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन पिढ्या पोलीस सेवेशी संबंधित असलेल्या कुटुंबातील या महिलेने, ठोस डिजिटल पुरावे आणि लेखी कागदपत्रे सादर करूनही मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आजोबा सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावरून सेवानिवृत्त झाले असून, पती सध्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून कार्यरत आहेत. संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि काही व्यक्तींनी संगनमताने मानसिक, सामाजिक व जातीय छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, सोसायटीतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्यात आली आणि गुन्ह्याशी संबंधित फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. घटनास्थळाच्या पंचनाम्यावेळीही अडथळे निर्माण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मूळ डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची 'हॅश व्हॅल्यू' तसेच भारतीय पुरावा कायद्यातील कलम ६५-अ व ६५-ब अन्वये आवश्यक प्रमाणपत्र पोलिसांना दिल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमे ३५१, ३५२, ३६५, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन तीन महिने आणि आरोपींची नावे स्पष्टपणे दिल्यानंतरही अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपास अधिकारी "शहानिशा सुरू आहे" आणि "आरोपींचे म्हणणे ऐकणे आवश्यक आहे" अशी भूमिका घेत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेने आणखी असा आरोप केला आहे की, इमारतीतील एकमेव अनुसूचित जातीच्या कुटुंबाला लक्ष्य करून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करण्यात आले असून, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर जबाब बदलण्यासाठी दबाव व धमक्या दिल्या जात आहेत.

याशिवाय, गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही दस्तऐवजांवर खोट्या सह्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेच्या खजिनदारांनी स्वतंत्र लेखी तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

पीडित महिलेने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर विभाग) तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे सादर केली असून, तपासावर देखरेख ठेवून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित आरोपी किंवा मानपाडा पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

Sunday, 28 June 2026

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

*मुरबाड, प्रतिनिधी* : मुरबाड-कल्याण मार्गावरील हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. परिवहन विभागाने मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज १० नवीन बसेस सुपूर्द केल्या आहेत. 

यापैकी ५ बसेस मुरबाड आगारात तर ५ बसेस कल्याण आगारात दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस केवळ मुरबाड-कल्याण मार्गावरच धावणार आहेत. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.

नवीन १० बसेसमुळे या मार्गावर दैनंदिन ३० अतिरिक्त फेऱ्या वाढणार असून प्रवासी वाहतूक क्षमता ३० ते ३५ टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नोव्हेंबरपर्यंत मुरबाड बस डेपोचे नूतनीकरणही पूर्ण होईल,” असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका मा. सौ. माया कांबळे यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी व पाणी दौरा केला. या दौऱ्यात नदीच्या विविध पाच ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

नदीतील वाढलेले प्रदूषण, साचलेला गाळ, दुर्गंधी आणि नदीची झालेली दयनीय अवस्था पाहून सौ. माया कांबळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. "कल्याण हे एक सुंदर शहर असून शहरातील नदीची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. आपण सर्वांनी मिळून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे. नदी ही आपली आई आहे आणि तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे," असे त्या म्हणाल्या.

वालधुनी नदीच्या पुनर्जीवनासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून येणाऱ्या सभागृहात हा विषय लक्षवेधी स्वरूपात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात संस्थेचे प्रमुख सदस्य श्री. अनिल गायकवाड, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. अनिल सरदार, श्री. किरण म्हात्रे, श्री. दिलीप दादा गायकवाड तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर उदयकर यांनी नदीची सद्यस्थिती, प्रदूषणाची  आणि पुनर्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली.

दौऱ्याच्या शेवटी सौ. माया कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !!

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !!

बौद्धजन सेवा संघ, रत्नबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन  समितीने शुक्रवार, दि. २६/६/२०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या १५२वी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयात विद्यावाचस्पती पदवी (Ph.D.) प्राप्त केलेल्या व विद्यादानच्या पवित्र सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राध्यापक व प्राचार्यांच्या सत्काराचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे एकूण ७ निवडक सत्कारमूर्तीमध्ये ५ महिला प्राध्यापिका /संशोधकांचा समावेश होता. 

यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. लक्ष्मी साळवे, डॉ.‌ जयश्री खंडागळे, ठाणे येथील के. बी. महिला महाविद्यालयाच्या साहयक प्राध्यापिका डॉ. उषा भंडारे, सावित्रीबाई फुले बी.एड. कॉलेजच्या प्राध्यापिका रुपाली सदरे-पवार, तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव डॉ. एस. के. भंडारे व सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विष्णु ज. भंडारे यांचा  बौद्धजन सेवा संघांच्या विश्र्वस्तांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व जेष्ठ साहित्यिक आयु. प्रेमानंद गज्वी लिखित 'बोधी संस्कृती' हा ग्रंथ भेट देऊन सर्वाना सन्मानित केले. 

त्यानंतर प्रत्येकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना बहूजन समाजातील महिला व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांसह, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थीपणे केलेल्या समाजकार्याचा आढावा सादर केला. 

आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत संविधानाचे महत्व व गौरवशाली परंपरेचा मागोवा घेताना, त्यांनी  समता, स्वातंत्र, बंधूभाव, सामाजिक न्याय व‌ नैतिक आचरण अशा समस्त प्राणीमात्राच्या कल्याणसाठी सर्वश्रेष्ठ मुल्यांवर आधारित शासनव्यवस्था चालवण्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली तरच येणाऱ्या काळात देशातील अनेक गंभीर प्रश्न सुटतील व बहूजनांचा जगण्याचा मार्ग सुकर होईल. चातुर्वण व्यवस्थेमुळे हजारो वर्षांपासून माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आमच्या पुर्जजाना नाकारल्यामुळेच आजपर्यंत आमच्या दोन पिढ्या प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आहेत, असे सकारात्मक विश्लेषण एका वक्त्याने केले.

आज‌ बहूजन‌ समाजातील महिला व‌ पुरुष विविध क्षेत्रात उच्चपदस्थ पहायला मिळताना दिसतात, तसेच त्यांच्या पुढच्या पिढीतील तरूणदेखिल व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक, प्रशासकिय‌ अधिकारी, वैद्यकीय डॉक्टर, अभियंता, संगणक व आय. टी. तज्ञ होताना दिसत आहे. अलीकडे काहीजण स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योजक बनताना दिसत आहेत, हे सर्व शिक्षण व आपल्या मुलांना मिळालेल्या संविधानिक हक्क व अधिकारांमुळे शक्य झाले आहे, असेही एका वक्त्याने नम्रपणे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौध्दजन सेवा संघ, रत्नबोधी विहार संचालक मंडळाचे विश्र्वत-अध्यक्ष आयु. प्रविण केदारेसर होते, त्यांनी येणाऱ्या काळात रत्नबोधी विहारात समाजप्रबोधनाचे अनेक उत्तम उपक्रम राबविण्याचे वेळापत्रकच थोडक्यात सादर केले. तसेच जुलैपासून सुरू होणार्या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेत यावेळी १००% विविध क्षेत्रातील महिलांना व्याख्यानासाठी आमंत्रित करुन त्यांचा गौरव करण्याचा मनोदय देखील त्यांनी बोलून दाखविला. 

संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. दिपक पगारे सरांनी केले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस आयु. जगदीश गवारे, उपाध्यक्ष आयुनी निर्मलाताई गवळी, खजिनदार आयु. भूपेंद्र हिरे, चिटणीस आयु. आनंद घोक्षे , आयुनी. सुवर्णाताई टिळक आयु. अरविंद जाधव, ऍड. वैभव झेंडे, आयु. विशाल कांबळे, आयु. राजेश साळवे, आयु. शशिकांत गांगुर्डे, आयु. महेंद्र कदम, आयु. दशरथ गायकवाड यांनीदेखील भरपूर मेहनत घेतली. याशिवाय संस्थेचे आजीव सभासद व हितचिंतकांचेही सहकार्य लाभले.

*-आयु. प्रविण केदारे (अध्यक्ष)* 
बौद्धजन सेवा संघ, रत्नबोधी बुद्ध विहार, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई

प्रसिद्धी/वृत्तांकन - अश्विनी निवाते 

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

जलजीवन मिशन योजना कागदावरच

टिटवाळा (संदीप शेंडगे) : टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात पाणी भरण्यासाठी जात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात तिन लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने घरी गॅलनमध्ये पाणी घेऊन जाणाऱ्या तीन मुलांना जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्यालगत असलेल्या गाळ्यात शिरली. या अपघातात गाळ्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले.

हर घर जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा पुरवणे सरकारचे उद्दिष्ट असून अध्याप हे टिटवाळा सारख्या शहरी भागात उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे दिसत आहे. ही योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजही येथील नागरिकांना टँकर ने किंवा सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.

या अपघातात किशन आनंद (१२), अनीकेत कुमार (१३) आणि रिषभ शर्मा (१३) हे तिघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे टिटवाळा परिसरातील पाणीटंचाई, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!
उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 29 तारखेला होणाऱ्या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी बुद्धभूमी प्रकरणावर आपली भूमिका ठामपणे मांडत जोरदार घोषणा दिल्या.

"बुद्धभूमी आमच्या हक्काची आहे, कोणाच्या बापाची नाही" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी आणि आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. तसेच 29 तारखेला होणारा महामोर्चा शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामोर्चामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले.

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांनी सर्व समाजबांधवांना 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सुप्रसिद्ध सिने कलाकार गायत्री मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर अध्यक्षा युवती आघाडी (सांस्कृतिक विभाग) पदी निवड !!

सुप्रसिद्ध सिने कलाकार गायत्री मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर अध्यक्षा युवती आघाडी (सांस्कृतिक विभाग) पदी निवड !!

नाशिक (सचिन ननगरे) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अतिशय जोमाने संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. नाशिक शहरात देखील पक्ष प्रवेश जोमाने सुरू आहे त्याच अनुषंगाने टी.व्ही सिरीयल मधील सिने अभिनेत्री गायत्रीताई मोरे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या नाशिक शहर युवती आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली. गायत्रीताई मोरे यांनी विविध मराठी मालिकांमध्ये उत्कृष्टरित्या भूमिका साकारली आहे, सध्या देखील त्या स्टार प्रवाह चॅनेल च्या मालिकांमध्ये काम करत आहे. गायत्री ताई मोरे यांच्या जनसंपर्क समस्त युवा/युवतींमध्ये दांडगा असून संपूर्ण नाशिक शहरात युवक आघाडी लवकरच जोमाने मोठ्या ताकदीने उभी राहणार असे आश्वासन निवडी प्रसंगी गायत्री ताई मोरे यांनी दिले.

गायत्री ताई मोरे यांच्या निवडीने समस्त नाशिक शहरातील यांच्या संपर्कातील नागरिकांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच गायत्री ताई यांच्या माध्यमातून नाशिक शहरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे "युवा जोडो" अभियानाला सुरुवात करून शहरातील युवा युवतींचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

निवडी प्रसंगी युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपीन कटारे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, सातपूर महिला अध्यक्षा मायाताई कांबळे, नितीन बोबडे आदी उपस्थित होते.

एसटी सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना नवा नियम !!

एसटी सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून NCMC कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांना नवा नियम !!

** डिजिटल व्यवस्थापनाला चालना; बनावट लाभार्थ्यांवर बसणार आळा, सवलतीची पडताळणी होणार अधिक सुलभ

मुंबई | सचिन ननगरे : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने सवलतीच्या प्रवासात अधिक पारदर्शकता, अचूक पडताळणी आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांसाठी केली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, विविध पुरस्कारार्थी तसेच इतर सर्व सवलतधारक प्रवाशांनाही एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या या नव्या धोरणामुळे सवलतीच्या प्रवासाची पडताळणी अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल. तसेच बनावट लाभार्थ्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्याचा उद्देश असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :
१ ऑगस्टपासून सवलतीच्या एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य.

सुरुवातीला महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना नियम लागू.

पुढील टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर सर्व सवलतधारकांनाही कार्ड बंधनकारक.

सवलतीच्या प्रवासात पारदर्शकता, अचूक पडताळणी आणि डिजिटल व्यवस्थापनाला चालना मिळणार.

अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणी घोटाळ्यावर सरकारचा मोठा प्रहार; दोषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फीची कारवाई, १० ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी !!

अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणी घोटाळ्यावर सरकारचा मोठा प्रहार; दोषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फीची कारवाई, १० ते २० हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी !!

नवी मुंबई |  सचिन ननगरे : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

यासोबतच मुद्रांक शुल्काशी संबंधित अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर झालेल्या सर्व दस्त नोंदणी प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या चौकशीतून राज्यातील १० ते २० हजार कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली. विधानसभेत ज्येष्ठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही भूमिका स्पष्ट केली.

या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

आचार्य अत्रे रंगमंदिरात महापुरुषांना संगीतमय मानवंदना !

आचार्य अत्रे रंगमंदिरात महापुरुषांना संगीतमय मानवंदना !

*३० जून रोजी कल्याणमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम*  

*कल्याण, संदीप शेंडगे 

भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्यासह समाजपरिवर्तन घडवणाऱ्या महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यासाठी 'महापुरुषांना संगीतमय मानवंदना' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*कार्यक्रमाची माहिती*  
हा कार्यक्रम मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण पश्चिम येथे होणार आहे. कार्यक्रमात लोकप्रिय गायक दादूस उर्फ संतोष चौधरी यांच्यासह तब्बल 25 कलावंतांचा ताफा आपल्या सादरीकरणातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करणार आहे. गीत, संगीत आणि सांस्कृतिक कलाविष्काराच्या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याला मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.

*संदेश व प्रवेश*  
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण शक्यतो येताना सर्वांनी सोबत एक वही व पेन घेऊन यावे जे गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल असे सांगितले.

*आवाहन*  
यावेळी गायक दादूस उर्फ संतोष चौधरी यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील पुरोगामी, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारे नागरिक, भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणारे कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सामाजिक सलोखा, परिवर्तनवादी विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Saturday, 27 June 2026

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !!

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !!

*नागरिकांना बोगस डॉक्टरांची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्याचे आवाहन*

*उल्हासनगर, प्रतिनिधी* : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. जिल्हाधिकारी ठाणे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या २६ बोगस डॉक्टरांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाने आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली.

या तपासणीत २६ डॉक्टरांपैकी १७ डॉक्टर ‘क्रॉस पॅथी’ पद्धतीने उपचार करत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय ३ डॉक्टर नोंदणीकृत आढळले, १ डॉक्टरचे नाव दुबार होते, १ डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत येत असल्याने तेथील प्रशासनाला कळवण्यात आले, तर ४ बोगस डॉक्टर घटनास्थळी आढळले नाहीत.

*पुन्हा धडक मोहीम*  
अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार दि. १६/०६/२०२६ रोजी पुन्हा बोगस डॉक्टरांवर धडक मोहीम राबवण्यात आली. यात आधी गुन्हा दाखल झालेल्या १७ डॉक्टरांपैकी १ डॉक्टर पुन्हा ‘क्रॉस पॅथी’ करताना आढळला. त्याच्यावर दुबार गुन्हा दाखल करण्यात आला. ९ डॉक्टर घटनास्थळी आढळले नाहीत. उर्वरित ७ डॉक्टर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार व्यवसाय करताना आढळले. त्यांच्यासोबत BAMS डॉक्टरही वैद्यकीय व्यवसाय करत असून ते कायद्याने वैध आहे.

*महापालिकेची समिती आणि नागरिकांना आवाहन*  
शासन निर्णय क्र. सीआयएम १०९१/सीआर १७२/९१/एमईडी-८, दि. ०५ सप्टेंबर १९९१ नुसार उल्हासनगर महापालिका स्तरावर बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाते. बोगस डॉक्टरांवर नियमितपणे कारवाई सुरूच राहील. 

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सत्यम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले की, उल्हासनगर हद्दीत बोगस डॉक्टर आढळल्यास त्याची तक्रार तातडीने वैद्यकीय आरोग्य विभागाकडे करावी.

*बोगस डॉक्टरांची तक्रार कुठे कराल?*  
महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुकास्तरीय समित्या आहेत. बनावट पदव्या वापरून प्रॅक्टिस करणाऱ्यांवर पालिका प्रशासन व पोलिसांमार्फत धाडी टाकून गुन्हे दाखल केले जातात.

- *स्थानिक आरोग्य विभाग*: संबंधित महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार द्या.
- *पोलीस स्टेशन*: जवळच्या पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल FIR नोंदवा.
- *वैद्यकीय परिषद*: डॉक्टरच्या पदवीची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडे तक्रार करा.

*डॉक्टर खरा की बोगस? अशी करा पडताळणी*  
- *नोंदणी क्रमांक*: डॉक्टरकडे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- *क्यूआर कोड*: राज्य सरकारने डॉक्टरांची माहिती तपासण्यासाठी डिजिटल QR Code प्रणाली सुरू केली आहे.
- *तपासणी पोर्टल*: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर डॉक्टरचा नोंदणी क्रमांक टाकून माहिती तपासता येते.

बोगस डॉक्टर किंवा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकाबद्दल माहिती असल्यास स्थानिक पोलीस किंवा पालिकेच्या आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधा.

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...