Saturday, 27 June 2026

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !!

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !!

*नागरिकांना बोगस डॉक्टरांची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्याचे आवाहन*

*उल्हासनगर, प्रतिनिधी* : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. जिल्हाधिकारी ठाणे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या २६ बोगस डॉक्टरांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व पोलिस पथकाने आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली.

या तपासणीत २६ डॉक्टरांपैकी १७ डॉक्टर ‘क्रॉस पॅथी’ पद्धतीने उपचार करत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय ३ डॉक्टर नोंदणीकृत आढळले, १ डॉक्टरचे नाव दुबार होते, १ डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत येत असल्याने तेथील प्रशासनाला कळवण्यात आले, तर ४ बोगस डॉक्टर घटनास्थळी आढळले नाहीत.

*पुन्हा धडक मोहीम*  
अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार दि. १६/०६/२०२६ रोजी पुन्हा बोगस डॉक्टरांवर धडक मोहीम राबवण्यात आली. यात आधी गुन्हा दाखल झालेल्या १७ डॉक्टरांपैकी १ डॉक्टर पुन्हा ‘क्रॉस पॅथी’ करताना आढळला. त्याच्यावर दुबार गुन्हा दाखल करण्यात आला. ९ डॉक्टर घटनास्थळी आढळले नाहीत. उर्वरित ७ डॉक्टर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार व्यवसाय करताना आढळले. त्यांच्यासोबत BAMS डॉक्टरही वैद्यकीय व्यवसाय करत असून ते कायद्याने वैध आहे.

*महापालिकेची समिती आणि नागरिकांना आवाहन*  
शासन निर्णय क्र. सीआयएम १०९१/सीआर १७२/९१/एमईडी-८, दि. ०५ सप्टेंबर १९९१ नुसार उल्हासनगर महापालिका स्तरावर बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाते. बोगस डॉक्टरांवर नियमितपणे कारवाई सुरूच राहील. 

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सत्यम गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले की, उल्हासनगर हद्दीत बोगस डॉक्टर आढळल्यास त्याची तक्रार तातडीने वैद्यकीय आरोग्य विभागाकडे करावी.

*बोगस डॉक्टरांची तक्रार कुठे कराल?*  
महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुकास्तरीय समित्या आहेत. बनावट पदव्या वापरून प्रॅक्टिस करणाऱ्यांवर पालिका प्रशासन व पोलिसांमार्फत धाडी टाकून गुन्हे दाखल केले जातात.

- *स्थानिक आरोग्य विभाग*: संबंधित महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार द्या.
- *पोलीस स्टेशन*: जवळच्या पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल FIR नोंदवा.
- *वैद्यकीय परिषद*: डॉक्टरच्या पदवीची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडे तक्रार करा.

*डॉक्टर खरा की बोगस? अशी करा पडताळणी*  
- *नोंदणी क्रमांक*: डॉक्टरकडे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- *क्यूआर कोड*: राज्य सरकारने डॉक्टरांची माहिती तपासण्यासाठी डिजिटल QR Code प्रणाली सुरू केली आहे.
- *तपासणी पोर्टल*: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर डॉक्टरचा नोंदणी क्रमांक टाकून माहिती तपासता येते.

बोगस डॉक्टर किंवा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकाबद्दल माहिती असल्यास स्थानिक पोलीस किंवा पालिकेच्या आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधा.

No comments:

Post a Comment

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !!

उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम; १७ जणांवर गुन्हे दाखल !! *नागरिकांना बोगस डॉक्टरांची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्याचे आवाहन*...