Saturday, 17 October 2026

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

*कल्याण (संजय कांबळे) :* हातातोंडाशी आलेले भात पीक डोळ्यादेखत करपत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी केली आहे.

गोवेली येथे आज आयोजित शेतकरी बैठकीत ते बोलत होते. या मागणीचे निवेदन लवकरच तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा प्रश्न शासनासमोर गांभीर्याने मांडण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

*बैठकीतील प्रमुख मागण्या :*

- कल्याण तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करावा
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी
- पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत खात्यावर जमा करावी
- खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत
- रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत
- शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत दिलासा द्यावा
- जनावरांसाठी चारा, पशुखाद्य व पाण्याची व्यवस्था करावी
- सन २०२५-२६ चा धान बोनस तातडीने जाहीर करावा

दसरा-दिवाळी सण तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात असल्याने तातडीने मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी कुंडलिक रामा गायकर, गोपाल गायकर, शिवाजी रोहणे, हरिभाऊ शेलार, बुधाजी बुटेरे, दत्तू काथोडे रोहणे, गुरुनाथ रोहणे, जयराम बुटेरे, प्रभाकर मिरकुटे, तुकाराम बुटेरे, भालचंद्र मिरकुटे आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...