Wednesday, 30 September 2026

उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्री एकविरा आई गडाचा देखावा !

उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्री एकविरा आई गडाचा देखावा !

आगरी कोळी कराडी समाजाचे श्रद्धास्थान आई एकविरा देवीच्या गडाचा देखाव्या साठी अलोट गर्दी.

सजावट मधून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा दिला संदेश.

उरण, दि. ३० (विठ्ठल ममताबादे) : उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा – २०२६’ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू असून आकर्षक सजावट, भव्य गणेशमूर्ती आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या गणेशोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मंडळाच्या वतीने श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी उरण शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक भक्त मोठ्या संख्येने मंडपात दाखल होत असून, दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘एक ताल, एक नाद, गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.

यंदा मंडळाने गणेशमूर्तीची आकर्षक सजावट, श्री एकवीरा देवी कार्ला गड देखावा तसेच नेत्रदीपक रोषणाई केली असून, सजावटीमुळे गणेशभक्तांचे विशेष लक्ष वेधले जात आहे. मंडळाच्या वतीने आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस, हौशी स्पर्धा व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांना भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.मंडळाचे अध्यक्ष तेजस म्हात्रे, संस्थापक ओमकार घरत व उपाध्यक्ष मयूर केकतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. भाविकांसाठी दर्शन व इतर धार्मिक कार्यक्रमांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी, कला-संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपण्याचा संदेश मंडळाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेशही मंडळा मार्फत देण्यात येत आहे.गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे उत्साहात स्वागत करण्यात येत असून, परिसरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“गणरायाच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख-समृद्धी लाभो,” अशी प्रार्थना मंडळाच्या पदाधिकारी व भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे.

शिंदे गदाची महिला तालुकाप्रमुख प्रणाली किशोर म्हात्रे हिचा उपसरपंच निवडणुकीत दारुण पराभव करून युवा सामाजिक संस्थेच्या सीमा रवींद्र ठाकूर विजयी !

शिंदे गदाची महिला तालुकाप्रमुख प्रणाली किशोर म्हात्रे हिचा उपसरपंच निवडणुकीत दारुण पराभव करून युवा सामाजिक संस्थेच्या सीमा रवींद्र ठाकूर विजयी !

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : जसखार गावाच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये युवा सामाजिक संस्थेच्या वतीने  सीमा रवींद्र ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या  महिला तालुका अध्यक्ष  प्रणाली किशोर म्हात्रे यानी  शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी हात मिळवणी करून सुद्धा युवा सामाजिक संस्थेच्या  सीमा रवींद्र ठाकूर यांनी प्रणाली किशोर म्हात्रे यांचा दारूण पराभव केला.  याच ग्रामपंचायतीमध्ये  उपसरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे ह्या कार्यरत होत्या त्यावेळी बाकी सर्व सदस्यांनी त्याच्यावर अविश्वास ठराव टाकून त्यांना पदावर हटवण्यात आले होते. तरीसुद्धा त्या पुन्हा एकदा उपसरपंच पदासाठी उभ्या राहिल्या व सत्तेच्या हव्यासा पोटी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षांसोबत युती करून सुद्धा पराभव झाला त्यामुळे परिसरात त्यांच्याविरुद्ध अनेक तर्क वितरक लावले जात आहेत.

तसेच नवनिवार्चीत उपसरपंच सीमा रवींद्र ठाकुर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.सीमा रविंद्र ठाकूर यांनी या विजयाचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल आणि सचिन घरत  तसेच युवा सामाजिक संस्थेच्या संपूर्ण टीम ला दिले आहे

अवैध वाळू माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; १० बार्ज, १६ सक्शन पंप जप्त, ३.६० कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त !!

अवैध वाळू माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; १० बार्ज, १६ सक्शन पंप जप्त, ३.६० कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त !!

*भिवंडी, अरुण पाटील, दि. २९ :* जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उत्खननावर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

भिवंडी तालुक्यातील दिवे-केवणी (दिवे बंदर) खाडीपात्रात महसूल विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग, दक्षता पथक, पोलीस आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून *१० बेकायदेशीर बार्ज आणि १६ सक्शन पंप जप्त केले.* सुमारे ३.५० ते ३.६० कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई सुरू आहे.

सोमवार २८ सप्टेंबर रात्रीपासून सुरू झालेली ही मोहीम मंगळवार २९ सप्टेंबर पहाटे २.४५ वाजता निर्णायक ठरली. जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक १ व २, ठाणे तहसीलदार उमेश पाटील, भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांचे पथक दिवे-केवणी स्मशानभूमीजवळ गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला.

पथकाची चाहूल लागताच कामगारांनी बार्ज व सक्शन पंपाचे व्हॉल्व्ह उघडून ते पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला. पळून जाताना बार्जने खाडीतील कांदळवनाला धडक देऊन पर्यावरणाचे नुकसानही केले. बहुतांश कामगारांनी पाण्यात उड्या मारून पलायन केले, मात्र *तोहीब रमझान शेख (वय १९, रा. झारखंड)* याला पकडण्यात यश आले. त्याला पोलीस स्वाधीन करण्यात आले आहे.

जप्त केलेले १० ही बार्ज महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओहोटीची वाट पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः खाडीपात्रात उतरून बार्जचे व्हॉल्व्ह बंद करून ते पुन्हा तरंगते केले. त्यानंतर भरतीच्या वेळी बोटींच्या सहाय्याने हे बार्ज कळव्यातील गणेश घाट आणि मुंब्रा येथे हलवून स्क्रॅप (नष्ट) करण्याची प्रक्रिया पार पाडली. मुद्देमालाचा ताबा खारबावचे मंडळ अधिकारी सुधाकर कामडी यांच्याकडे देण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा आणि महसूल अधिनियमांतर्गत भिवंडी व मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढेही अवैध वाळू उत्खननाविरोधात झिरो टॉलरन्स कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या मोहिमेत उपविभागीय अधिकारी अमित सानप, उर्मिला पाटील, तहसीलदार अभिजीत खोले, उमेश पाटील, मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, तलाठी सूर्यकांत पाटील तसेच सहाय्यक महसूल अधिकारी संजय जाधव, दिनेश बोऱ्हाडे, दर्शन नटे, अनिल राजपूरे, पोलीस शिपाई संदीप शिसोदे, मारुती यमगार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

डोंबिवलीतील ज्येष्ठ रहिवासी दत्तात्रय गाडेकर यांचे निधन !!

डोंबिवलीतील ज्येष्ठ रहिवासी दत्तात्रय गाडेकर यांचे निधन !!

*डोंबिवली :* एमआयडीसी निवासी, मिलापनगर येथील सर्वात वयोवृद्ध आणि डोंबिवलीतील जुने जाणते रहिवासी दत्तात्रय किसनराव गाडेकर (वय ९६) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

गाडेकर हे रेल्वेच्या ठाकुर्ली पॉवर हाऊसमध्ये ३६ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते. चांदीच्या अत्तरदाण्या बनवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि त्या कामात ते कुशल कारागीर म्हणून ओळखले जात होते. ते सन १९५२ पासून डोंबिवलीत राहत होते.

रोज सकाळ-संध्याकाळ फिरणे हा त्यांचा नित्यक्रम होता. फिरताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने चौकशी करणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची सर्वपरिचित ओळख होती. त्यांच्या जाण्याने निवासी परिसरात, विशेषतः सकाळ-संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. मिलापनगरमधील बंगल्यात ते तीन मुलांसह एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते.

त्यांच्यावर आज दुपारी पाथर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डोंबिवलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे (डोंबिवली) यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या '९/आय' प्रभागात अनधिकृत बांधकामांना अभय? नागरिकांचा सवाल !!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या '९/आय' प्रभागात अनधिकृत बांधकामांना अभय? नागरिकांचा सवाल !!

*कल्याण, प्रतिनिधी‌ : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या ९/आय प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांचा या अनधिकृत बांधकामांना पाठिंबा असल्याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

या प्रभागात दावडी गाव, कल्याण-शील क्रॉस रोड, सुझुकी शोरूमच्या मागे नवीन अनधिकृत बांधकाम जोरात सुरू असून याबाबत १२ दिवसांपूर्वी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाईसाठी तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाचीही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर उपोषणाच्या दिवसापासून संबंधित अधिकाऱ्यांनी सुट्टी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नागरिकांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात असून बांधकाम पूर्ण झाल्यावर केवळ कागदी कारवाई केली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

हा प्रकार म्हणजे माननीय न्यायालयाच्या आणि आयुक्तांच्या आदेशाची अवमानना असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, अशी चर्चा कल्याण-डोंबिवली महापालिकेत रंगली आहे.

Tuesday, 29 September 2026

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने !!

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने !!

रायगड जिल्ह्यात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ श्रुती शाम म्हात्रे जिल्हा अध्यक्ष राजा ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक 

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : मतदारांचा मतदानाचा अधिकार, मतदार याद्यांमधील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेसने देशभरात आंदोलनाची हाक दिली. त्याच अनुषंगाने  देशातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर स्थानिक पातळीवर मोर्चे व निवेदने देण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातही काँग्रेसच्या वतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात  पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि विविध आघाड्यांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले.

‘मतदाराचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे’

मतदार यादीतील बदल, मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदाराला त्याच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ नये आणि निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने अधिक पारदर्शक व उत्तरदायी पद्धतीने काम करावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

महाराष्ट्रातील विशेष गहन मतदार यादी पुनरावलोकनाच्या (SIR) पार्श्वभूमीवर मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील नावांच्या बदलांवरही राजकीय वाद निर्माण झाला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेत ९.७८ कोटी मतदारांपैकी २.०७ कोटी नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली होती; मात्र निवडणूक आयोगाने हा आकडा अंतिमतः वगळल्या जाणाऱ्या मतदारांची निश्चित संख्या मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

घोषणांनी दणाणला अलिबाग परिसर:- 

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मतदाता बचाव, लोकतंत्र बचाव’, ‘लोकतंत्र जिंदाबाद’, ‘आपले मत, आपला अधिकार’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच ‘EVM हटाव’ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करणारे फलकही आंदोलकांच्या हातात होते.
काही फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करणारे घोषवाक्य झळकत होते. त्यामुळे अलिबाग येथील आंदोलनाला राजकीयदृष्ट्या आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
आंदोलनातील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संविधान दाखविण्यात येत असल्याचे चित्र असलेला बॅनर. संविधानिक मूल्यांचे संरक्षण, नागरिकांचा मतदानाचा अधिकार आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता यांचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबतही आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागण्या काँग्रेसच्या राजकीय भूमिकेचा भाग असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले. रायगडमध्ये यापूर्वीही विविध राजकीय मुद्द्यांवर काँग्रेसकडून आंदोलने झाली असली, तरी यावेळी मतदार यादी आणि कथित ‘मत चोरी’च्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि भाजपच्या राजकीय नेतृत्वावर टीका करणारे फलक झळकवल्याने आंदोलनाची राजकीय धार अधिक तीव्र असल्याचे चित्र दिसून आले.

निवडणूक आयोगासंदर्भातील काही अलीकडील वृत्तांवरूनही राजकीय वाद सुरू आहे. द इंडियन एक्स्प्रेसने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दोन निवडणूक आयुक्तांनी नवीन मतदारांची नोंदणी व नावे वगळण्यासंदर्भातील काही प्रक्रियांवर आक्षेप घेतल्याचे नमूद केले होते; त्यावर निवडणूक आयोगाकडूनही भूमिका मांडण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन:- 

मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील बदल आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे प्रदेश, रायगड जिल्हाध्यक्ष राजा ठाकूर, प्रदेश पदाधिकारी मिलिंद पाडगावकर, नंदा म्हात्रे, श्रद्धा ठाकूर,कोकण ओबीसी अध्यक्ष शंभू म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेविका शशिकला सिंग, विजय केणी, कोषाध्यक्ष लतीफ नलकांडे, अरविंद सोनटक्के, जयवंत देशमुख, मुनावर देशमुख, ब्लॉक अध्यक्ष चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे ,अमित दवे, प्रदीप सुंके, बबन केणी  अमिना खान, महेनूर खान, झीनत मालदार, अलसाबा खान, हलिमा खान, अय्या खान, असरार खान, आसिफ मालदार, फरजाना खान, खैरुन्निसा शेख, निखत खान यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर व गाव पातळीवरील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चौकट:- 

या आंदोलनादरम्यान पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षा डॉ श्रुती म्हात्रे यांनी प्रत्येक निवडणुकी मध्ये भाजप ला फायदा होईल असे निर्णय घेणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांना अटक करू त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात कोकण प्रदेश कार्यकारणी बैठक व पत्रकार परिषद संपन्न..*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात कोकण प्रदेश कार्यकारणी बैठक व पत्रकार परिषद संपन्न..*

ठाणे (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे कोकण प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली..

ह्या बैठकीचे व पत्रकार परिषदेचे आयोजन कोकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठलदादा चौधरी यांच्या वतीने  करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने वेगाने सुरू आहे दररोज महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील अनेक नामावंत व्यक्ती विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षाने नेहमीच गोरगरीब/ दलित /बौद्ध/मागासवर्गीय/ अल्पसंख्यांक /आदिवासी/ ओबीसी/ भटके विमुक्त समूहाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे नेहमीच डोळे झाक केलेली दिसते. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही या घटकांची कोणत्याही क्षेत्रात सर्वांगीण प्रगती नाही अजूनही त्यांना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे म्हणून राज्यातील आता हे सर्व समाज घटक प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ते पर्यायच शोधत आहे त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असेही कटारे यांनी शेवटी सांगितले.

*"गाव तिथे शाखा"* निर्माण करणार व मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा व कोकण प्रदेश मध्ये पक्षामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्याचे कार्य कोकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

प्रामुख्याने या बैठकीस व पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे, मुंबई प्रदेश नेते अशोकराव भोगले, महाराष्ट्र राज्य युवा संपर्क प्रमुख संतोष राजगुरू, येवला युवा नेते तुषार वाघ, युवा नेते बबन वाघ, युवा नेते प्रशांत कटारे प्रदेश नेते, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख राजभाऊ मोकळ, नाशिक जिल्हा उप-अध्यक्ष राजू जाधव, युवा नेतेसागर वाघ , येवला तालुका संघटक चेतन वाघ, येवला तालुका सरचिटणीस विजय वाघ, मराठवाडा नेते वाल्मिक पठारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईनाथ खरात ठाणे शहर/जिल्हा युवा अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्षा - आरोग्य विभाग रंजना भांगे, दिवा शहर अध्यक्ष रमेश तुपे आदींनी परिश्रम घेतले.

शब्दसुरांच्या उत्सवात रंगली काव्यस्पर्धा; वैभव कानिटकर आणि सरोज गाजरे यांनी मारली बाजी !

शब्दसुरांच्या उत्सवात रंगली काव्यस्पर्धा; वैभव कानिटकर आणि सरोज गाजरे यांनी मारली बाजी !

वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

शब्दांची नजाकत, कल्पकतेची उधळण आणि भावनांचा ओघवती प्रवाह अशा अत्यंत रसाळ वातावरणात 'यंग स्टार्स ट्रस्ट, आगाशी' आणि 'म्हात्रे परिवार, वासळई' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धा मोठ्या थाटात व उत्साहात पार पडली. ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे खंदे शिलेदार आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे माजी अध्यक्ष कै. हरिभाऊ रामचंद्र म्हात्रे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात सुरू केलेली ही सुंदर काव्यसंमेलनाची परंपरा त्यांचे जावई विकास वर्तक आणि कन्या सौ. वंदना विकास वर्तक मोठ्या अभिमानाने व सार्थपणे पुढे नेऊन जपत आहेत. आयोजक म्हणून त्यांनी घेतलेल्या या विशेष पुढाकाराचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. अशोक बागवे लाभले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकारा मा. ज्योती बालिगा-राव विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी उपस्थितीमुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

स्पर्धेत तब्बल ५७ कवींनी आपल्या विविधरंगी आणि भावगर्भ कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवींच्या अथांग कल्पनाशक्तीने आणि काव्यप्रतिभेने रसिकांच्या हृदयाचा थेट ठाव घेतला. या अटीतटीच्या स्पर्धेत खुल्या गटातून आपल्या सिद्धहस्त लेखणीने आणि प्रभावी सादरीकरणाने वैभव कानिटकर यांनी प्रथम क्रमांकाचे तब्बल ७ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून बाजी मारली. तर गोविंद पारकर यांनी द्वितीय क्रमांकाची ५ हजार रुपयांची मोहर उमटवली आणि शबाना व्हिक्टर यांनी तृतीय क्रमांकाच्या ३ हजार रुपयांच्या बहुमानावर आपले नाव कोरले. याच गटात शिवम जोशी व महेंद्र पाटील यांनी प्रत्येकी १ हजार रुपयांचे, तर रुपाली राऊत ५०० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले.

दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांच्या गटातही तितकाच उत्साह आणि अनुभवाचा समृद्ध परिपाक पाहायला मिळाला. या गटात सरोज गाजरे यांनी आपल्या प्रगल्भ व चिंतनशील कवितेने प्रथम क्रमांकाचे २ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांकावर सुधाकर कांबळी यांनी आणि तृतीय क्रमांकावर जोसेफ परेरा यांनी प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे बक्षीस जिंकत आपली छाप पाडली.

स्पर्धेचे अत्यंत सूक्ष्म व पारदर्शक परीक्षण प्रसिद्ध कवी, लेखक तथा प्रकाशक गितीश शिंदे आणि 'ग्रंथाली'च्या विश्वस्त लतिका भानुशाली यांनी पार पाडले. या सोहळ्याला माजी महापौर नारायण मानकर, 'जल्लोष'चे सचिव संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, डाॅ प्रकाश जाधव,नगरसेविका पुष्पा जाधव, सुरेखा कुरकुरे, शांताराम वाळिंजकर, प्रकाश पाटील, चंदा वनमाळी, अश्विनी भोईर, ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे, पत्रकार संदीप पंडित, डॉ. सुरेखा धनावडे आणि रंगकर्मी सुधीर चित्ते यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुषमा राऊत आणि शिल्पा परुळेकर-पै यांनी आपल्या ओघवत्या व रसाळ शैलीत करून सबंध सोहळ्यात वेगळीच रंगत आणली तर देवेंद्र म्हात्रे ह्यांनी आभार मानून सोहळ्याची सांगता केली.

 विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सर्व विजेत्यांचे व सहभागी गुणवंत कवींचे आयोजकांनी व उपस्थितांनी मनापासून कौतुक करत या अविस्मरणीय काव्यसोहळ्याची सांगता केली.

पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिद्ध !!

पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची सुचना मंगळवारी प्रसिद्ध !!

पुणे, दि.२९ : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली असून त्यानुसार विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ यांनी निवडणुकीची सूचना आज प्रसिद्ध केली आहे.

निवडणूकीसाठीची नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे यांचेकडे मंगळवार ६ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत  दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ  आणि पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, पुणे विभाग,  यांचे कार्यालयात करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला वरील  विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास शुक्रवार २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे या सुचनेद्वारे घोषित करण्यात आले आहे.

ही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी, विभागातील सर्व जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबरोबरच विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त, नगरपालिका तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायती कार्यालयातही प्रसिद्ध करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी  तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.                                                                                     

जागतिक श्वानदंश दिनानिमित्त डोंबिवलीत जनजागृती वॉकेथॉन व चर्चासत्र !!

जागतिक श्वानदंश दिनानिमित्त डोंबिवलीत जनजागृती वॉकेथॉन व चर्चासत्र !!

*डोंबिवली, राजू नलावडे: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे जागतिक श्वानदंश दिनानिमित्त (२८ सप्टेंबर) जनजागृती वॉकेथॉन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत ६ ते १२ आणि २५-२६ सप्टेंबर दरम्यान भटक्या कुत्रा/मांजरांसाठी मोफत अँटी-रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. केडीएमसी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने २३९७ भटके कुत्रे व २०६ मांजरे अशा एकूण २६०३ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. गेल्या १५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. ही मोहीम डोंबिवली पूर्व-पश्चिम, एमआयडीसी निवासी, रिजेन्सी अनंतम, पलावा, रुणवाल परिसरात राबवण्यात आली.

सोमवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता वंदेमातरम उद्यान, मिलापनगर येथून वॉकेथॉनला सुरुवात झाली. मिलापनगर रस्ता क्र. २, सिस्टर निवेदिता स्कूल, औदुंबर कट्टा, घरडा सर्कल मार्गे डोंबिवली जिमखाना येथे त्याचा समारोप झाला. यात विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, रोटरियन, सायकल सखी ग्रुप, प्राणीमित्र व नागरिक सहभागी झाले होते.

त्यानंतर सकाळी १०.१५ ते १२ वाजता डोंबिवली जिमखाना सभागृहात चर्चासत्र झाले. यावेळी सहभागी संस्था व प्राणीप्रेमींचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, नगरसेविका खुशबू चौधरी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. निलेश जयवंत, असिस्टंट गव्हर्नर संजय तांबे, मिडटाऊनचे अध्यक्ष किशोर अढळकर, सचिव गणेश डोयफोडे, प्रकल्प प्रमुख डॉ. मनोहर अकोले उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मकरंद गणपुले यांनी केले. डॉ. अकोले यांनी केलेल्या मागण्या मान्य करून लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

रोटरी क्लब चोपडातर्फे गूळ नदी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश !!

रोटरी क्लब चोपडातर्फे गूळ नदी स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश !!

चोपडा, प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर तालुक्यातील नद्यांमध्ये गणपती विसर्जनामुळे पीओपीच्या मूर्तींचे अवशेष, निर्माल्य आणि प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात साचून प्रदूषण झाले होते. या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आणि नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी रोटरी क्लब चोपडा तर्फे "गूळ नदी स्वच्छता प्रकल्प" हा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. रोटरीच्या "पर्यावरण संरक्षण" या मूलभूत तत्त्वाला अनुसरून हा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला.

विशेष बाब म्हणजे गूळ नदीचे पाणी चोपडा तालुक्यासह इतर काही तालुक्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पुरविले जाते. ही माहिती समजल्यानंतर रोटरी क्लब चोपडाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने नदी परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, निर्माल्य तसेच पीओपीच्या गणेशमूर्तींचे अवशेष आढळून आले. अनेक ठिकाणी नदीपात्र हे या कचऱ्याने भरून गेलेले दिसून आले. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची अशी अवस्था पाहून रोटरी क्लबने त्वरित स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.

गणेश विसर्जनानंतर नदीपात्राची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन रोटरी क्लब चोपडाने सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीतून या मोहिमेला सुरुवात केली. रोटरीच्या सर्व सदस्यांनी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत गूळ नदीपात्रातील पीओपी मूर्तींचे अवशेष, निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा संकलित करून परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त केला. या मोहिमेमुळे नदीपात्राने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला.

यावेळी रोटरी क्लब चोपडाच्या वतीने नागरिकांना शाडू मातीच्या व पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करण्याचे, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे तसेच प्लास्टिकचा वापर व प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले. श्रद्धा आणि पर्यावरण यांचा समतोल राखत सण साजरे करणे ही काळाची गरज असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले.

रोटरी क्लब चोपडा हे सदैव पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूक राहिले असून, अशा प्रकारच्या लोककल्याणकारी व निसर्गपूरक प्रकल्पांमुळे रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे चोपडा तालुक्यातील विविध क्षेत्रांतून आणि समाजाच्या सर्व स्तरांतून मोठे कौतुक करण्यात येत आहे.

या स्वच्छता मोहिमेत रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे. संजय बारी, मानद सचिव रोटे. लीना पाटील, सहसचिव रोटे. चंद्रशेखर साखरे, प्रकल्प मार्गदर्शक रोटे. नितीन अहिरराव, प्रकल्प प्रमुख रोटे. शशिकांत पाटील व रोटे. मनोज पाटील, तसेच रोटे. विलास कोष्टी, रोटे. प्रदीप पाटील, रोटे. संदेश क्षीरसागर, रोटे. विलास पी. पाटील, रोटे. निखिल सोनवणे, रोटे. संदीप सूर्यवंशी, रोटे. वसंत नागपुरे, रोटे. विश्वास दलाल यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

"स्वच्छ नदी, निरोगी पर्यावरण" या मूळ उद्देशाला धरून राबविण्यात आलेला हा प्रकल्प सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Saturday, 26 September 2026

शहापूर मृद व जलसंधारण विभागाने शाई नदीवर चुकिच्या ठिकाणी अनाधिकृत पणे बंधारा बांधल्याने खरांगणच्या शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ, शेतीच वाहून गेल्याने वयोवृद्ध आजी' जिवंत, असल्याचा पुरावा म्हणून पोहचली कार्यालयात !

शहापूर मृद व जलसंधारण विभागाने शाई नदीवर चुकिच्या ठिकाणी अनाधिकृत पणे बंधारा बांधल्याने खरांगणच्या शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ, शेतीच वाहून गेल्याने वयोवृद्ध आजी' जिवंत, असल्याचा पुरावा म्हणून पोहचली कार्यालयात !

कल्याण, (संजय कांबळे) : शासनाचे अधिकारी व ठेकेदार काय करु शकतात याचे धक्कादायक व संतापजनक प्रकरण नुकतेच समोर आले असून शहापूर मृद व जलसंधारण विभागाने कोणत्याही शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची,ग्रामपंचायतीची परवानगी न घेता तेथील शेतकऱ्यांची मागणी नसताना शाई नदीवर चुकीच्या ठिकाणी साधारणपणे १ कोटी रुपये खर्च करून केटी सिंमेट बंधारा बांधला, यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन नदीचा प्रवाह बदलला आणि येथील वयोवृद्ध महिला शेतकरी सोनूबाई वाळकू हरड, सुमनबाई धोंडू हरड, आण्णा बाबू हरड, हरि धोडू हरड, गणपत वाळकू हरड, आदी ३० ते ४० शेतकऱ्यांची भात शेतीच वाहून गेली. त्यामुळे यांच्यावर पाणी असून'ओला दुष्काळ, ओढावला आहे, याहूनही संतापजनक व चिड आणणारी घटना म्हणजे या वयोवृद्ध आजीची मुले ही तक्रार करण्यासाठी शहापूर येथील मृद व जलसंधारण कार्यालयात गेली असता तक्रारदार 'आजी जिवंत, असलेल्याचा पुरावा मागू लागल्याने या माउलीला, उठता बसता, चालता येत नसताना तिला कार्यालयात न्हावे लागल्याने परिसरात संताप पसरला आहे,

शहापूर तालुक्यातील शाई नदीच्या काठावर खरांगण हे छोटे ठुमदार गाव वसलेले आहे, शहरापासून अगदीच लांब असल्याने शेती हा एकमेव पर्याय उदरनिर्वाहाचा बनला आहे, याच गावातील वाळकू हरड, सोनूबाई हरड व त्यांचे कुटूंबियाची नदीच्या पात्रापासून ५० ते १०० मीटर अंतरावर माळरान व भात शेती आहे, त्यामध्ये भुईमूग, मुग, उडिद, नागली, नाचणी, व भाजीपाला पिके घेतली जात होती, वाळकू हरड यांचे निधन झाल्यावर कुंटूबाची सर्व जबाबदारी सोनूबाई हरड यांच्या वर खाली, ३०/४० लोकांचा परिवार याच शेतीवर अवलंबून असताना अचानक काही महिन्यात पुर्वी शाई नदीवर सुमारे ९८ लक्ष ते १ कोटी रुपयांचा केटी बंधारा बांधण्यात आला, विशेष म्हणजे याबाबत येथील कोणत्याही शेतकऱ्यांनी आम्हांला बंधारा पाहिजे अशी मागणी केली नाही, ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीला विचारले नाही, आणि महत्त्वाचे या परिसरात अगोदरच ३ ते ४ बंधारे असताना हा बंधारा केवळ ठेकेदार व अधिकां-याचे खिशे भरण्यासाठी बांधल्याचा आरोप होत असून यामुळे या शेतकऱ्यांची भातलागवड वाहून गेली आहे. ऐवढे होऊनही ज्या उद्देशासाठी बंधारा बांधला तो साध्य झाला नाही, कारण बंधाऱ्याच्या बाजूचा सर्व किनारा वाहून गेल्याने पाणी देखील वाहून जात आहे.

या आजीची मुले रमेश हरड, गणपत हरड यांनी याविरोधात शहापूर कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता सोनूबाई हरड या जिवंत असल्याचा पुरावा मागीतला, त्यामुळे अगोदरच वैतागलेल्या मुलांनी चक्क आईलाच कार्यालयात नेले व अधिका-यासमोर उभं केलं? त्यामुळे काय म्हणावं या निर्दयी अधिका-यांना?

राज्याचे मुख्यमंत्री राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करतात, हंबरडा फोडणा-या शेतकऱ्यांला छातीशी कवटाळतात, आणि दुसरीकडं त्यांचे अधिकारी उठता बसता, चालता येत नसणाऱ्या वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांला जिवंत असल्याचा पुरावा मागतात, !मात्र या विरोधात आजीने देखील कंबर कसली असून प्रंसगी जीव गेला तरी उपोषण करणार असा इशारा दिला आहे.

*प्रतिक्रिया
*सोनूबाई हरड (तक्रारदार) वयोवृद्ध आजी (खरांगण) शहापूर -
जवळपास ६ एकरच्या आपसात आमची शेती असून त्यामध्ये भात, भुईमूग, उडिद, मुग आदी पिके घेत होतो, परंतु आता शेतीच वाहून गेल्याने जगणं मुश्कील झाले आहे.

*संदिप हरड (तरुण शेतकरी) खरांगण -
तक्रार केल्यानंतर ता विभागाच्या महिला अधिकारी आल्या, आम्हांला कोणत्याही प्रकारची विचारणा केली नाही, संपर्क केला नाही, ठेकेदारांशी संगणमत करून निघून गेल्या.

*गणपत हरड (शेतकरी) - हा बंधारा एका वन कर्मचाऱ्यांशी संगणमत करून बांधला असल्याचा आम्हांला संशय असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

Friday, 25 September 2026

वीज ग्राहकांसाठी योजना' महावितरण सेवासेतू कार्यालय उघडले‌ !!

वीज ग्राहकांसाठी योजना' महावितरण सेवासेतू कार्यालय उघडले‌ !!

डोंबिवली, राजू नलावडे 
            डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी योजना काय आहेत याची माहिती देण्यासाठी महावितरण कल्याण पूर्व विभागीय कार्यालय तर्फे सेवासेतू कार्यालय 20 सप्टेंबर पासून उघडण्यात आले असून ते 17 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वीत राहणार आहे. हे तात्पुरते महावितरणचे सेवासेतू कार्यालय केडीएमसीच्या ई वॉर्ड, रिजेन्सी इस्टेट, दावडी, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.30 या वेळेत असणार असून वीजग्राहकांनी त्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री गिरीश भगत यानी केले आहे. 

वीजग्राहकांसाठी योजना खालील प्रमाणे आहेत.
१) स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटॉप (स्मार्ट) सोलर योजना 
२) मागेल त्याला सौर कृषी पंप 
३) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन 
४) पीएम सूर्यघर मोफत वीज योजना 
५) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
            वरील योजनेची सविस्तर माहिती या सेतू कार्यालयात पत्रकाद्वारे आणि प्रत्यक्ष मिळणार असून वीजग्राहकांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय वीज सुरक्षेसाठी आवाहन करण्यात आले असून 'कृपया हे करू नये', 'कृपया हे करावे', 'वीज बचतीसाठी सोपे उपाय', 'एवढी खबरदारी घेऊया', या हेडिंग खाली एका माहिती पत्रकाद्वारे ग्राहकांना सर्व माहिती देण्यात येत आहे. तसेच सर्व प्रकाराच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक  1800-212-3435/1800-233-3435/1922/19120 तसेच खंडीत वीजपुरवठा तक्रारीसाठी नोंदणीकृत मोबाईल द्वारे मिस्ड कॉल सेवा 022-50897100 असे असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
          ज्या वीजग्राहकांना या योजनेसाठी लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी या सेवासेतू जनजागृती कक्ष कार्यालयात येऊन तेथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घ्यावी.
     *महावितरण सेतू कार्यालय संपर्क :- श्री चेतन तेलगरे (कनिष्ठ अभियंता), मोबाईल क्रमांक 8879626473*

Thursday, 24 September 2026

गणेश विसर्जन यापुढे बंद ! डोंबिवलीतील मंडळाचा स्तुत्य निर्णय !!

गणेश विसर्जन यापुढे बंद ! डोंबिवलीतील मंडळाचा स्तुत्य निर्णय !!

*डोंबिवली, राजू नलावडे:* १९७७ मध्ये स्थापना झालेल्या डोंबिवलीतील श्रीखंडे वाडी येथील तरुण मित्र मंडळाचे यंदा सुवर्णमहोत्सवी ५० वे वर्ष होते. या निमित्ताने मंडळाने एक ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे.

यावर्षीपासून मंडळाने फायबरची अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी विकत घेतली असून यापुढे या मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी कायमस्वरूपी गणेश मूर्ती घेऊन स्थापना करणारे हे डोंबिवलीतील एकमेव मंडळ ठरले आहे. फक्त छोटी पूजेची मूर्तीच ते विसर्जन करणार आहेत.

मंडळाची स्वतःची मोठी जागा नसल्याने ही कायमस्वरूपी मूर्ती जवळच असलेल्या एका मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

दरवर्षी या मंडळाची विसर्जन मिरवणूक डोंबिवलीच्या प्रमुख रस्त्यांवरून विविध देखावे, चित्ररथ, पथनाट्य, लेझीम, ढोल पथकासह मोठ्या उत्साहात निघते. ही देखणी मिरवणूक पाहण्यासाठी डोंबिवलीकर आवर्जून उपस्थित राहतात.

यापुढेही ही परंपरा कायम राहणार असून मोठ्या मूर्तीसह विविध भव्य देखाव्यांसहित विसर्जन मिरवणूक नेहमीप्रमाणे काढण्यात येणार आहे. मात्र शेवटी मंडपातच ड्रममधील स्वच्छ पाण्यात छोट्या पूजेच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

Wednesday, 23 September 2026

आदिवासी बांधवांच्या नागरी सुविधांसाठी पनवेल महापालिकेसमोर आमरण उपोषण; आयुक्तांच्या दुर्लक्षाचा निषेध !!

आदिवासी बांधवांच्या नागरी सुविधांसाठी पनवेल महापालिकेसमोर आमरण उपोषण; आयुक्तांच्या दुर्लक्षाचा निषेध !!
 
*(प्रतिनिधी/पत्रकार महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*

*पनवेल, दि. -* पनवेल महानगरपालिका हद्दीतील आदिवासी वाड्यांतील नागरिकांना गेल्या 10 वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत, जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *संतोष चाळके* व वाघऱ्याची वाडी, टेंभोडे, सागवाडी, वळवली येथील आदिवासी बांधवांच्या वतीने *बुधवार, दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर* हे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन सुमारे 10 वर्षे उलटूनही या आदिवासी वस्त्यांमध्ये आजही मूलभूत नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. महापालिका आयुक्त हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

*प्रमुख मागण्या काय?*
या आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवांच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

*1.  नियमित पाणीपुरवठा:* आदिवासी वाड्यांमध्ये आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करावा.
*2.  रस्ते व पायाभूत सुविधा:* वस्त्यांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. पावसाळ्यात चिखलामुळे मोठी गैरसोय होते.
*3.  पथदिवे:* रात्रीच्या वेळी अंधारामुळे महिला व विद्यार्थ्यांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागते. तातडीने पथदिवे बसवावेत.
*4.  आरोग्य व स्वच्छता सुविधा:* आरोग्य केंद्र, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध कराव्यात.
*5.  प्रत्यक्ष पाहणी व अहवाल:* संबंधित आदिवासी वस्त्यांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सर्वंकष विकासाचा अहवाल तयार करावा.

*संविधानिक हक्कांची अंमलबजावणी करा*
भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 (समानतेचा हक्क), अनुच्छेद 21 (जीवन जगण्याचा हक्क) व अनुच्छेद 46 (दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताचे संवर्धन) मधील तत्त्वांचा विचार करून आदिवासी बांधवांच्या संविधानिक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी जनहक्क अधिकार संघर्ष संस्थेने केली आहे.

प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा 30 सप्टेंबरपासून सुरू होणारे आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संस्थापक अध्यक्ष *संतोष चाळके* यांनी दिला आहे.

वेगवान निर्णय गतिमान सरकारच्या'एक रेशन एक साडी, करतायेत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे रक्षण, साड्या हलक्या असल्याने' कुंपणासाठी वापर?

वेगवान निर्णय गतिमान सरकारच्या'एक रेशन एक साडी, करतायेत शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे रक्षण, साड्या हलक्या असल्याने' कुंपणासाठी वापर?

कल्याण, (संजय कांबळे) : आनंदाचा शिधा,रेशन दुकानातून गायब झाल्यानंतर मायबाप सरकारने वेगवान निर्णय घेऊन अंत्योदय योजनेत असलेल्या कुटुंबाना'एक रेशनकार्ड एक साडी, या नव्या योजनेमार्फत महिलांना मोफत साड्या वाटप केल्या, परंतु यांचा दर्जा इतका हलका निघाला की त्या अंगावर घालू शकत नाहीत, अशातच या साडीला फाँल बिंडिंगसाठी किमान पाचपट रक्कम व ब्लाऊज शिवण्यासाठी किमान ३०० रुपये खर्च येत असल्याने '४ आण्यांची कोंबडी व १२ आण्यांचा मसाला, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने या महिलांनी या साडीचा उपयोग मोकाट व भटक्या जनावरापासून भाजीपाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी'कुपंण,म्हणून केल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

राज्यातील  गतिमान सरकारने वेगवान निर्णय घेऊन शेकडो योजनांची घोषणा केली, यातील बहुतांश योजना या तितक्याच वेगाने बंद पडल्या/गायब झाल्या, त्यापैकी एक'आनंदाचा शिधा, यामुळे जनतेमध्ये संताप पसरला, हा रोष कमी करण्यासाठी पुन्हा मायबाप सरकारने अंत्योदय योजनेतील महिलांना'एक रेशनकार्ड एक साडी, मोफत दिवाळी भेट दिली, यासाडीची किंमत ४०० रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते, परंतु हिचा दर्जा, कापड पाहिले तर मार्केटमध्ये याची किंमत ५० किंवा १०० रुपये असू शकते, ती इतकी पातळ आहे की यातून अंगप्रदर्शन होऊ शकते, याशिवाय यासाडीला फाँल बिडिंग व ब्लाऊज शिवण्यासाठी किमान पाच पट खर्च येवू शकते, त्यामुळे हा प्रकार म्हणजे चार आण्यांची कोंबडी व बारा आण्यांचा मसाला असा असल्याने या साड्यांच्या उपयोग शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांचे मोकाट जनावरे (गायी, म्हशी, शेळ्या) कुत्रे, मांजरी आणि ससे यांच्या पासून संरक्षण करण्यासाठी'कुपंण, म्हणून केल्याचे शिवारात दिसून येत आहे,

कल्याण ग्रामीण भाग, वाशिंद, शहापूर, अजनूप, कसारा, मुरबाड, माळशेज घाट या परिसरात याचे अधिक प्रमाण जाणवते,
कल्याण मध्ये १५ हजार ८१५ कार्डधारक आहेत, अंबरनाथ १४ हजार ३९९, मुरबाड ३७ हजार १८६, शहापूर ५२ हजार २१० आणि भिवंडी मध्ये ४९ हजार २३६ रेशनकार्ड धारक आहेत. मुरबाड मध्ये २९७ दुकानातून ११ हजार ५९२ साड्या वाटप करण्यात आल्या आहेत. एकूण १ लाख ६८ हजार ८४६ रेशनकार्ड असून राज्यातील २४ लक्ष महिलांना मोफत साड्या वाटल्या आहेत, परंतु जुलै २०२६ मध्ये राज्य सरकारने वस्त्रोद्योग विभागामार्फत शासन निर्णय जारी करून ही योजनाच बंद केली आहे. त्यामुळे ज्या महिलांना या साड्या मिळाल्या असतील त्यांनी त्याचे काय केले असेल हे त्यांनाच माहिती? याबाबत कल्याण तालुक्यातील एका रेशनदुकानदाराला विचारले असता ते म्हणाले, माझ्या दुकानात १२९ अंत्योदय लाभार्थी आहेत, साडीचे कापड फारच निकृष्ट दर्जाचे असल्याने महिला साड्या घ्यायला तयार नव्हत्या पण आम्ही वाटप केले, तर कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले की, पक्षी भाजीपाल्याची कोवळी रोपे उपटतात, किंवा फळे टोचतात, परंतु साड्यांच्या रंगीबेरंगी पडद्यामुळे पक्षी पिकाकडे येण्याचे टाळतात, शिवाय पांढरीमाशी किंवा इतर काही उडणारे कीटक साड्यांच्या अडथळ्यामुळे थेट पिकांपर्यत पोहचू शकत नाही.

भाड्याचे घर’ या लघुपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद !!

भाड्याचे घर’ या लघुपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद !!

लय भारी Production प्रस्तुत “भाड्याचे घर” या भावनिक आणि कौटुंबिक लघुपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दिग्दर्शक, संकल्पना व पटकथा प्रमोद सूर्यवंशी, कथा रेखा चंद्रकांत हरियाण, संवाद लेखन प्रमोद सूर्यवंशी व सौ. वसुधा नाईक यांनी केली असून छायाचित्रण-एडिटिंग कुणाल मगर यांनी केले आहे. यात कलाकार उत्तम कुलकर्णी, किशोरी पाटील, हरीशचंद्र दळवी, युवराज्ञी सोनवणे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

“घर म्हणजे केवळ चार भिंती नसतात, तर माणसांच्या नात्यांनी, प्रेमाने आणि भावनांनी ते घरपण मिळवत असते” या सुंदर भावनेला स्पर्श करणारी ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहे.

काही दिवसातच या लघुपटाला २०७ लाईक आणि जवळपास ३०,००० व्ह्यूज मिळाले आहेत. 

प्रत्येक लाईक ही कलाकारांचा उत्साह असून प्रत्येक कमेंट ही त्यांच्या मेहनतीला दाद आणि प्रत्येक शेअर ही कलाकृतीला मिळालेली नवी वाट आहे. कलाकार घडतात ते केवळ पडद्यावर नाही, तर रसिकांच्या प्रेमातून आणि प्रोत्साहनातूनही घडतात, अशी भावना टीमने व्यक्त केली असून सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Sunday, 20 September 2026

नालासोपारातील साई जिवदानी उत्सव मंडळाने साकारले वृंदावन! श्री कृष्णाची मनमोहक गणेश मूर्ती ठरत आहे सर्वांचे आकर्षक....

नालासोपारातील साई जिवदानी उत्सव मंडळाने साकारले वृंदावन! श्री कृष्णाची मनमोहक गणेश मूर्ती ठरत आहे सर्वांचे आकर्षक....

*बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांनी घेतले दर्शन...*

नालासोपारा:- नालासोपारातील श्रीप्रस्था येथील साई जिवदानी उत्सव मंडळाने वृंदावनच्या या थीममुळे व गणेशोत्सवात भगवान श्रीकृष्ण ची गणेश मूर्ती सर्वांचे खास आकर्षक ठरत आहे.

साई जीवदानी  मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी खास आकर्षण साकारले आहे. भगवान श्रीकृष्णाचा वृंदावन  थीम असा भव्य देखावा मंडळाने उभारला आहे. अहोरात्र कष्ट करून, एकत्र येऊन मंडळाचे अध्यक्ष प्रविण उमरकर व कार्यकर्त्यांनी जो भव्य देखावा साकारला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. तुमच्यातील एकजूट आणि बाप्पाप्रती असलेली भक्ती या देखाव्यातून स्पष्ट दिसत आहे. मंडळाचे नाव उंचवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस उत्स्फूर्त शुभेच्छा दिल्या आहेत.

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-सिस्टर मारहाण प्रकरण: नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या खटल्यात सरकारी पंच साक्षीदाराची साक्ष नोंद, पुढील सुनावणी आज !!

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-सिस्टर मारहाण प्रकरण: नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या खटल्यात सरकारी पंच साक्षीदाराची साक्ष नोंद, पुढील सुनावणी आज !!

*कल्याण डोंबिवली : दीपक इंगळे*

*कल्याण, दिनांक  : २० सप्टेंबर २०२६ -* डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या गाजलेल्या प्रकरणात आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र जलदगती न्यायालयात वेगाने सुरू आहे. काल शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या प्रकरणातील एका महत्त्वाच्या सरकारी साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराच्या कारणावरून वाद होऊन नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीसाठी एका रजिस्टरचा वापर करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ते रजिस्टर जप्त केले होते आणि जप्तीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पंचनामा करण्यात आला होता.

काल झालेल्या सुनावणीत याच जप्ती पंचनाम्याशी संबंधित असलेल्या सरकारी पंच साक्षीदाराची साक्ष मा. न्यायालयासमोर नोंदवण्यात आली. सरकारी वकिलांनी या साक्षीदारामार्फत जप्तीची प्रक्रिया कशी पार पडली याबाबत न्यायालयात माहिती मांडली.

या सुनावणीच्या वेळी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे स्वतः न्यायालयात हजर होते. मा. जिल्हा सत्र न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात ही संपूर्ण कार्यवाही पार पडली.

आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अनंत पत्की, अॅड. एम. के. काझी आणि अॅड. यू. झेड. काझी यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, या प्रकरणाकडे संपूर्ण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्राचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या दिनांक २१ सप्टेंबर रोजी होणार असून पुढील सरकारी साक्षीदारांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...