कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या '९/आय' प्रभागात अनधिकृत बांधकामांना अभय? नागरिकांचा सवाल !!
*कल्याण, प्रतिनिधी : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या ९/आय प्रभागात अनधिकृत बांधकामे आणि जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांचा या अनधिकृत बांधकामांना पाठिंबा असल्याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
या प्रभागात दावडी गाव, कल्याण-शील क्रॉस रोड, सुझुकी शोरूमच्या मागे नवीन अनधिकृत बांधकाम जोरात सुरू असून याबाबत १२ दिवसांपूर्वी तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाईसाठी तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या अर्जाचीही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर उपोषणाच्या दिवसापासून संबंधित अधिकाऱ्यांनी सुट्टी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नागरिकांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात असून बांधकाम पूर्ण झाल्यावर केवळ कागदी कारवाई केली जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.
हा प्रकार म्हणजे माननीय न्यायालयाच्या आणि आयुक्तांच्या आदेशाची अवमानना असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, अशी चर्चा कल्याण-डोंबिवली महापालिकेत रंगली आहे.
No comments:
Post a Comment