Tuesday, 29 September 2026

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने !!

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने !!

रायगड जिल्ह्यात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ श्रुती शाम म्हात्रे जिल्हा अध्यक्ष राजा ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक 

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : मतदारांचा मतदानाचा अधिकार, मतदार याद्यांमधील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेसने देशभरात आंदोलनाची हाक दिली. त्याच अनुषंगाने  देशातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांवर स्थानिक पातळीवर मोर्चे व निवेदने देण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातही काँग्रेसच्या वतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात  पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि विविध आघाड्यांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले.

‘मतदाराचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे’

मतदार यादीतील बदल, मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदाराला त्याच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ नये आणि निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने अधिक पारदर्शक व उत्तरदायी पद्धतीने काम करावे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

महाराष्ट्रातील विशेष गहन मतदार यादी पुनरावलोकनाच्या (SIR) पार्श्वभूमीवर मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील नावांच्या बदलांवरही राजकीय वाद निर्माण झाला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेत ९.७८ कोटी मतदारांपैकी २.०७ कोटी नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली होती; मात्र निवडणूक आयोगाने हा आकडा अंतिमतः वगळल्या जाणाऱ्या मतदारांची निश्चित संख्या मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

घोषणांनी दणाणला अलिबाग परिसर:- 

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मतदाता बचाव, लोकतंत्र बचाव’, ‘लोकतंत्र जिंदाबाद’, ‘आपले मत, आपला अधिकार’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच ‘EVM हटाव’ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करणारे फलकही आंदोलकांच्या हातात होते.
काही फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करणारे घोषवाक्य झळकत होते. त्यामुळे अलिबाग येथील आंदोलनाला राजकीयदृष्ट्या आक्रमक स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
आंदोलनातील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संविधान दाखविण्यात येत असल्याचे चित्र असलेला बॅनर. संविधानिक मूल्यांचे संरक्षण, नागरिकांचा मतदानाचा अधिकार आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता यांचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबतही आक्षेप नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागण्या काँग्रेसच्या राजकीय भूमिकेचा भाग असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले. रायगडमध्ये यापूर्वीही विविध राजकीय मुद्द्यांवर काँग्रेसकडून आंदोलने झाली असली, तरी यावेळी मतदार यादी आणि कथित ‘मत चोरी’च्या मुद्द्यावर थेट केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि भाजपच्या राजकीय नेतृत्वावर टीका करणारे फलक झळकवल्याने आंदोलनाची राजकीय धार अधिक तीव्र असल्याचे चित्र दिसून आले.

निवडणूक आयोगासंदर्भातील काही अलीकडील वृत्तांवरूनही राजकीय वाद सुरू आहे. द इंडियन एक्स्प्रेसने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तात दोन निवडणूक आयुक्तांनी नवीन मतदारांची नोंदणी व नावे वगळण्यासंदर्भातील काही प्रक्रियांवर आक्षेप घेतल्याचे नमूद केले होते; त्यावर निवडणूक आयोगाकडूनही भूमिका मांडण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन:- 

मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील बदल आणि मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे प्रदेश, रायगड जिल्हाध्यक्ष राजा ठाकूर, प्रदेश पदाधिकारी मिलिंद पाडगावकर, नंदा म्हात्रे, श्रद्धा ठाकूर,कोकण ओबीसी अध्यक्ष शंभू म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेविका शशिकला सिंग, विजय केणी, कोषाध्यक्ष लतीफ नलकांडे, अरविंद सोनटक्के, जयवंत देशमुख, मुनावर देशमुख, ब्लॉक अध्यक्ष चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे ,अमित दवे, प्रदीप सुंके, बबन केणी  अमिना खान, महेनूर खान, झीनत मालदार, अलसाबा खान, हलिमा खान, अय्या खान, असरार खान, आसिफ मालदार, फरजाना खान, खैरुन्निसा शेख, निखत खान यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर व गाव पातळीवरील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

चौकट:- 

या आंदोलनादरम्यान पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षा डॉ श्रुती म्हात्रे यांनी प्रत्येक निवडणुकी मध्ये भाजप ला फायदा होईल असे निर्णय घेणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांना अटक करू त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली

No comments:

Post a Comment

अवैध वाळू माफियांवर ठाणे जिल्हा प्रशासनाचा धडक सर्जिकल स्ट्राईक...!  भिवंडीतील दिवे-केवणी खाडीत १० बार्ज अन् १६ सक्शन पंप जप्त; तब्बल ३.६० क...