शब्दसुरांच्या उत्सवात रंगली काव्यस्पर्धा; वैभव कानिटकर आणि सरोज गाजरे यांनी मारली बाजी !
वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
शब्दांची नजाकत, कल्पकतेची उधळण आणि भावनांचा ओघवती प्रवाह अशा अत्यंत रसाळ वातावरणात 'यंग स्टार्स ट्रस्ट, आगाशी' आणि 'म्हात्रे परिवार, वासळई' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धा मोठ्या थाटात व उत्साहात पार पडली. ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचे खंदे शिलेदार आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे माजी अध्यक्ष कै. हरिभाऊ रामचंद्र म्हात्रे यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात सुरू केलेली ही सुंदर काव्यसंमेलनाची परंपरा त्यांचे जावई विकास वर्तक आणि कन्या सौ. वंदना विकास वर्तक मोठ्या अभिमानाने व सार्थपणे पुढे नेऊन जपत आहेत. आयोजक म्हणून त्यांनी घेतलेल्या या विशेष पुढाकाराचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. अशोक बागवे लाभले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकारा मा. ज्योती बालिगा-राव विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी उपस्थितीमुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.
स्पर्धेत तब्बल ५७ कवींनी आपल्या विविधरंगी आणि भावगर्भ कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवींच्या अथांग कल्पनाशक्तीने आणि काव्यप्रतिभेने रसिकांच्या हृदयाचा थेट ठाव घेतला. या अटीतटीच्या स्पर्धेत खुल्या गटातून आपल्या सिद्धहस्त लेखणीने आणि प्रभावी सादरीकरणाने वैभव कानिटकर यांनी प्रथम क्रमांकाचे तब्बल ७ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून बाजी मारली. तर गोविंद पारकर यांनी द्वितीय क्रमांकाची ५ हजार रुपयांची मोहर उमटवली आणि शबाना व्हिक्टर यांनी तृतीय क्रमांकाच्या ३ हजार रुपयांच्या बहुमानावर आपले नाव कोरले. याच गटात शिवम जोशी व महेंद्र पाटील यांनी प्रत्येकी १ हजार रुपयांचे, तर रुपाली राऊत ५०० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले.
दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांच्या गटातही तितकाच उत्साह आणि अनुभवाचा समृद्ध परिपाक पाहायला मिळाला. या गटात सरोज गाजरे यांनी आपल्या प्रगल्भ व चिंतनशील कवितेने प्रथम क्रमांकाचे २ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांकावर सुधाकर कांबळी यांनी आणि तृतीय क्रमांकावर जोसेफ परेरा यांनी प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे बक्षीस जिंकत आपली छाप पाडली.
स्पर्धेचे अत्यंत सूक्ष्म व पारदर्शक परीक्षण प्रसिद्ध कवी, लेखक तथा प्रकाशक गितीश शिंदे आणि 'ग्रंथाली'च्या विश्वस्त लतिका भानुशाली यांनी पार पाडले. या सोहळ्याला माजी महापौर नारायण मानकर, 'जल्लोष'चे सचिव संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, डाॅ प्रकाश जाधव,नगरसेविका पुष्पा जाधव, सुरेखा कुरकुरे, शांताराम वाळिंजकर, प्रकाश पाटील, चंदा वनमाळी, अश्विनी भोईर, ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे, पत्रकार संदीप पंडित, डॉ. सुरेखा धनावडे आणि रंगकर्मी सुधीर चित्ते यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून कवींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुषमा राऊत आणि शिल्पा परुळेकर-पै यांनी आपल्या ओघवत्या व रसाळ शैलीत करून सबंध सोहळ्यात वेगळीच रंगत आणली तर देवेंद्र म्हात्रे ह्यांनी आभार मानून सोहळ्याची सांगता केली.
विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सर्व विजेत्यांचे व सहभागी गुणवंत कवींचे आयोजकांनी व उपस्थितांनी मनापासून कौतुक करत या अविस्मरणीय काव्यसोहळ्याची सांगता केली.
No comments:
Post a Comment