आचार्य अत्रे रंगमंदिरात महापुरुषांना संगीतमय मानवंदना !
*३० जून रोजी कल्याणमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रम*
*कल्याण, संदीप शेंडगे
भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्यासह समाजपरिवर्तन घडवणाऱ्या महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यासाठी 'महापुरुषांना संगीतमय मानवंदना' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
*कार्यक्रमाची माहिती*
हा कार्यक्रम मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण पश्चिम येथे होणार आहे. कार्यक्रमात लोकप्रिय गायक दादूस उर्फ संतोष चौधरी यांच्यासह तब्बल 25 कलावंतांचा ताफा आपल्या सादरीकरणातून महापुरुषांच्या विचारांचा जागर करणार आहे. गीत, संगीत आणि सांस्कृतिक कलाविष्काराच्या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याला मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.
*संदेश व प्रवेश*
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य असून सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण शक्यतो येताना सर्वांनी सोबत एक वही व पेन घेऊन यावे जे गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल असे सांगितले.
*आवाहन*
यावेळी गायक दादूस उर्फ संतोष चौधरी यांनी कल्याण डोंबिवली परिसरातील पुरोगामी, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारे नागरिक, भारतीय संविधानाला सर्वोच्च मानणारे कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक सलोखा, परिवर्तनवादी विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment