Sunday, 28 June 2026

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

टिटवाळा इंदिरानगर येथे पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांना भरधाव कारने उडवले !!

जलजीवन मिशन योजना कागदावरच

टिटवाळा (संदीप शेंडगे) : टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात पाणी भरण्यासाठी जात असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात तिन लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने घरी गॅलनमध्ये पाणी घेऊन जाणाऱ्या तीन मुलांना जोरदार धडक दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्यालगत असलेल्या गाळ्यात शिरली. या अपघातात गाळ्याचे तसेच तेथे उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले.

हर घर जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा पुरवणे सरकारचे उद्दिष्ट असून अध्याप हे टिटवाळा सारख्या शहरी भागात उद्दिष्ट पूर्ण न झाल्याचे दिसत आहे. ही योजना कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजही येथील नागरिकांना टँकर ने किंवा सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागत आहे.

या अपघातात किशन आनंद (१२), अनीकेत कुमार (१३) आणि रिषभ शर्मा (१३) हे तिघे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे टिटवाळा परिसरातील पाणीटंचाई, नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट आणि भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !!

" राजर्षी शाहू महाराजांची १५२वी जयंती विक्रोळीतील रत्नबोधी बुद्ध विहारात उत्साहात संपन्न " !! बौद्धजन सेवा संघ, रत्नबो...