Tuesday, 30 June 2026

भिवंडीत झाड कोसळून कारचा चुराडा; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

भिवंडीत झाड कोसळून कारचा चुराडा; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

भिवंडी प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 30 जून 2026 :

भिवंडी शहरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या हलक्या पावसानंतर मोठी दुर्घटना टळली. शहरातील वऱ्हाळ तलाव परिसरात असलेले एक जुने व विशाल झाड अचानक मुळासकट उन्मळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मानसरोवर रोडवरील वऱ्हाळ तलाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक जुने व मोठे झाड अचानक मुळासकट उन्मळून जवळ उभ्या असलेल्या एमएच-०१-ईडब्ल्यू-२०३२ क्रमांकाच्या वॅगनआर कारवर कोसळले. झाडाच्या प्रचंड वजनामुळे कारचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेपूर्वी काही वेळ कारचालकाने वाहन तेथे उभे करून घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. जर तो त्यावेळी वाहनात असता, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापून हटवल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.

दरम्यान, पावसाळ्यात शहरातील जुनी व धोकादायक झाडे कोसळण्याचा धोका कायम असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अशा झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी अथवा हटविण्याची कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !! *कल्याण, दि. 1 जुलै ...