भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; फरार सूत्रधाराची पत्नी पटना येथून अटक, ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगात; मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ताच्या शोधासाठी महाराष्ट्र-उत्तर प्रदेशात छापेमारी सुरू,
भिवंडी प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 30 जून 2026 :
महाराष्ट्रातील बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारमधील पटना येथून अटक करण्यात आली. मंगळवारी कोनगाव पोलिसांनी तिला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याच्या शोधासाठी ठाणे पोलिसांचे विशेष पथक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील कुम्हरार गावात पोहोचले होते. तेथे तो लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांच्या आगमनापूर्वीच तो फरार झाला. तपासादरम्यान कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याची पत्नी सुमन कुमारी हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर तिची औपचारिक अटक करण्यात आली.
तपास यंत्रणांच्या मते, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे सुमन कुमारीच्या बँक खात्यांशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीच्या बँक खात्यांद्वारे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले का, तिने फरार मुख्य आरोपीला मदत केली का आणि तिच्यामार्फत मुख्य आरोपीपर्यंत पोहोचता येईल का, याचा तपास सध्या सुरू आहे.
दरम्यान, पोलिस तपासात आतापर्यंत उघड झाले आहे की, टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई केंद्रातून बाहेर काढण्यात आले होते. तेथून दिल्लीमार्गे महाराष्ट्रात आणून नियोजनबद्ध पद्धतीने पेपरफुटी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमन कुमारीच्या अटकेनंतर अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. मात्र आग्रा येथून प्रश्नपत्र उपलब्ध करून देणारे अन्य चार आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने छापेमारी सुरू आहे.
कोनगाव पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासली जात आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे, बँक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, येत्या काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपी पक्षाचे वकील ॲड. शैलेश गायकवाड यांनी न्यायालय परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची अशिल सुमन कुमारी तपासापासून पळ काढत नव्हती आणि तिने पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. अटकेनंतर तिने आपल्या पती बिजेंद्र कुमार गुप्ता याच्याशी मोबाईलवर संवाद साधल्याच्या आधारावरच पोलिसांनी तिला अटक केली आहे. आतापर्यंत कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा थेट पुरावा समोर आलेला नसून, सध्या कॉल डिटेल्सच्या आधारे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या या हाय-प्रोफाइल टीईटी पेपरफुटी प्रकरणात आता तपासाची दिशा आर्थिक व्यवहार, तांत्रिक पुरावे आणि फरार सूत्रधारापर्यंत पोहोचण्यावर केंद्रित झाली आहे. सुमन कुमारीच्या चौकशीतून मुख्य आरोपीसह या संपूर्ण रॅकेटमधील इतर संबंधितांविषयी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. ६ जुलै रोजी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपासाच्या प्रगतीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment