साई फाउंडेशनच्या "सेवा गौरव पुरस्कार २०२६" ने नागरी संरक्षण दलाचे बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे सन्मानित !!!
ठाणे, दि. २८ जून २०२६ : समाजसेवा, मानवता आणि राष्ट्रहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, समाजसेवक व परिवर्तनकर्त्यांचा गौरव करण्यासाठी साई फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित "सेवा गौरव पुरस्कार २०२६" तसेच संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या पाचपाखाडी येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहात पार पडले.
या विशेष सोहळ्यात श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांना सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल "सेवा गौरव पुरस्कार २०२६" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समाजातील गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या नागरी संरक्षण दलाच्या कार्याची दखल घेत साई फाउंडेशनने हा सन्मान प्रदान केला. या पुरस्कारामुळे नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांमध्ये अधिक उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बेलापूर विभागाचे डिव्हिजन वार्डन श्री. लक्ष्मीकांत पोपळे म्हणाले, "सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन साई फाउंडेशनने आम्हाला 'सेवा गौरव पुरस्कार २०२६' ने सन्मानित केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान व कृतज्ञता वाटते. हा गौरव केवळ आमच्या संपूर्ण टीमच्या सामूहिक प्रयत्नांची पोचपावती नसून, ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर जिथे-जिथे आपत्ती व गरज असेल तिथे निःस्वार्थ भावनेने धावून जाण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मिळालेली थाप आहे.
"हा सन्मान आमची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. समाज, मानवता आणि राष्ट्रसेवेसाठी यापुढेही अधिक समर्पण, करुणा व शिस्तीने कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. साई फाउंडेशनच्या विश्वास, प्रोत्साहन आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत."
यावेळी त्यांनी "सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!" असा संदेश देत "जय हिंद! जय महाराष्ट्र!" अशा घोषणेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
साई फाउंडेशन ही संस्था समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने करत आहे. "Be a Reason for Someone's Smile" या प्रेरणादायी संदेशातून संस्था समाजात सेवा, करुणा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सेवा, सुरक्षा, शिस्त - हेच आमचे ब्रीद!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳
वृत्तांकन - विश्वनाथ राऊत सर
No comments:
Post a Comment