टिटवाळ्यात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या !!
**आरोपी पतीविरोधात वडिलांची फाशीची मागणी
कल्याण, संदीप शेंडगे : टिटवाळा येथील बल्याणी परिसरात घरगुती भांडणाचे रूपांतर थेट रक्तरंजित घटनेत झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीला अमानुष मारहाण करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव सतीश काळूराम वाघे असून मृत महिलेचे नाव सारिका उर्फ रुखसार असे आहे. पत्नी माहेरी वडिलांकडे होती गोड बोलून सतीश ने पत्नीला आपल्या घरी बोलाविले. त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले घरगुती वादाच्या रागातून सतीश वाघे याने पत्नीला बेदम मारहाण केली. संतापाच्या भरात त्याने पाण्याने भरलेला हंडा तिच्या डोक्यात घातल्याचे तसेच भिंतीवर डोके आपटत अमानुष अत्याचार केल्याचे वडिलांनी सांगितले. या क्रूर मारहाणीमध्ये गंभीर जखमी अवस्थेतील रुखसारला तातडीने जवळील महागणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे कारण देत जखमी महिलेला इतरत्र हलविण्यास सांगण्यात आले. टिटवाळा सारख्या शहरात एका खाजगी दवाखान्यात ऑक्सिजन उपलब्ध नाही त्यामुळेच माझ्या मुलीचा मृत्यू झाला असा आरोप रुखसारच्या वडिलांनी केला आहे
या प्रकरणी रुखसार चे वडील सुलतान अकबर अन्सारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपी सतीश वाघे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच, कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणात अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा गंभीर आरोपही अन्सारी यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे टिटवाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment