मच्छिमार कुटुंबांना जून व जुलै या दोन महिन्याचे उदरनिर्वाह भत्ता देण्याची कोकण किनारा मच्छिमार संघटनेची प्रशासनाकडे मागणी !
जून, जुलै महिन्यात समुद्रातील मासेमारी बंद असल्याने मच्छिमार बांधवांवर आर्थिक संकट.
मच्छिमार बांधवांना आंध्रप्रदेश सरकार प्रमाणे पॅटर्न राबवून दिलासा देण्याची मागणी.
उरण दि २३,'(विठ्ठल ममताबादे) :
मच्छिमार कुटूंबियांना माहे जुन व माहे जुलै दोन महिन्यांचा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावे अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व संबंधित विभागाना करण्यात आली आहे.
सरकारी आदेशानुसार कोकण किनारपटटीवरील मच्छिमारी १ जुन ते ३१ जुलै कालावधीकरीता बंद करण्यात येणार आहे. तशा प्रकारचा आदेश सहा. मत्स्यव्यवसाय विभागाने जाहीर केलेला आहे. या दोन महिन्यांत माश्यांचा प्रजनन काळ असल्यामुळे तसेच जोरदार पाऊस व वादळाचा धोका यामुळे मच्छिमारी बंद ठेवणे योग्यच आहे. परंतु कोकण किनारपटट्टी वरील मच्छिमाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह संपुर्ण मच्छिमारीवर चालतो. पुढील २ महिन्यांमध्ये त्यांना कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होत असतो व आताही झालेला आहे. त्यांना या २ महिन्यांकरीता उदरनिर्वाह भत्ता अथवा आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
नुकताच आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील मच्छिमारांच्या कुटूंबियांना दोन महिन्यासाठी प्रतिमहिना २०,०००/- रू. देण्याचे मान्य केले आहे व त्याचे वाटप सुध्दा चालु आहे. महाराष्ट्र राज्य हे मच्छिमारी व्यवसायातुन मोठया प्रमाणात महसुल गोळा करते. तरी या सारख्या आर्थिक सधन राष्ट्राने गरजु मच्छिमारांसाठी आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे.असे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे मच्छिमारांच्या प्रत्येक कुटूंबाला प्रतिमहिना रू. २५,०००/- प्रमाणे दोन महिन्याचे ५०,०००/-आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.या संदर्भात कामगार नेते तथा संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार कॉम्रेड भूषण पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोट (चौकट ):-
कोकण किनारा मच्छिमार संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत की महाराष्ट्रातील मच्छिमारांना ५०, ०००/- उदरनिर्वाह भत्ता द्या.१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यामध्ये माशांचा प्रजनन काळ व जोरदार पाऊस या कारणास्तव मच्छिमारी बंद करण्याचे आदेश मच्छिमार आयुक्ताने काढला आहे त्यामुळे मच्छिमारांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.नुकतेच आंध्रप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील मच्छिमारांना उदरनिर्वाह रु ४०, ०००/-भत्ता दिला आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारणे सुद्धा द्यावा हि मागणी करीत आहोत .
- कॉम्रेड भूषण पाटील,कामगार नेते तथा मार्गदर्शक कोकण किनारा मच्छिमार संघटना.
No comments:
Post a Comment