डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!
*डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे)
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. आज सोमवारी सकाळी निवासी मधील माणिक रत्न सोसायटी RH 121 च्या आवारातील आंब्याचे मोठे झाड कोसळून शिवाई बालक मंदिर शाळेच्या मैदानातील संरक्षक भिंतीवर पडले.
सुदैवाने घटनेच्या वेळी शालेय विद्यार्थी मैदानात नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड कोसळल्याने शाळेच्या आणि सोसायटीच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे.
*अग्निशमन दलाची मदत*
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाड कापून बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली.
*15 ते 16 झाडे आधीच पडली*
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत एमआयडीसी निवासी परिसरात 15 ते 16 झाडे पडली आहेत. त्यामुळे वाहन, संरक्षक भिंती यांसारख्या मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. यापुढेही अजून काही धोकादायक झाडे पडू शकतात अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
*प्रशासनाला मागणी*
नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीने परिसरातील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून छाटणी आणि तोडणी करावी अशी मागणी केली आहे.
अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या आणि धोकादायक झाडांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच महावितरणकडून उच्च दाबाच्या वाहिन्याजवळील फांद्या फक्त एका बाजूने तोडल्या जातात. त्यामुळे दुसऱ्या बाजूला भार पडून झाडे कोसळत आहेत.
त्यामुळे महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी यांनी समन्वय साधून झाडांच्या फांद्यांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. पुढे जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment