Sunday, 31 May 2026

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

महिलांच्या आरोग्य जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !!

ठाणे, प्रतिनिधी :
जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सत्यमेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्य व मासिक पाळी जनजागृती विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवाती चे वातावरण हलके-फुलके आणि संवादात्मक करण्यासाठी "आइस ब्रेकिंग गेम" ने करण्यात आली. "Passing the Sentence" या खेळामध्ये एका महिलेच्या कानात एक वाक्य सांगण्यात आले आणि तेच वाक्य पुढील सहभागीच्या कानात सांगण्यास सांगितले गेले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचताना त्या वाक्यात झालेला बदल सर्वांसमोर मांडण्यात आला. या उपक्रमातून माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्यामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, याची जाणीव सहभागी महिलांना करून देण्यात आली,ह्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पवन जोहारे  ह्यांनी ही माहिती दिली.

जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अर्जुन बनसोडे यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ग्रामीण व शहरी वस्त्यांमधील महिला, मुले आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल बनसोडे ह्यांनी सागितले.

कार्यक्रमाच्या मुख्य सत्रामध्ये संस्थेच्या सदस्या अस्मिता कहाळे यांनी महिलांशी संवाद साधत मासिक पाळीविषयी चर्चा सुरू केली. त्यांनी उपस्थित महिलांना आणि मुलींना त्यांच्या मासिक पाळीची पहिली तारीख, तसेच पाळीबाबतची पहिली माहिती त्यांना कोणी दिली, असे प्रश्न विचारून विषयाची सुरुवात केली. या संवादातून महिलांच्या अनुभवांना वाव मिळाला आणि अनेकांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले.यानंतर त्यांनी मासिक पाळीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीची सुरुवात कशी होते, मासिक पाळीचे चक्र कसे असते, पाळी किती दिवस येणे सामान्य मानले जाते, तसेच सॅनिटरी पॅडचा योग्य आणि सुरक्षित वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच मासिक पाळी ही कोणतीही लाजिरवाणी किंवा वाईट गोष्ट नसून ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महिलांनी आणि मुलींनी या विषयाबाबत खुलेपणाने बोलणे आणि योग्य माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे असल्याचा संदेशही देण्यात आला, महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्तन कर्करोग (Breast Cancer) यावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्तन कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात, त्याची वेळेत ओळख का महत्त्वाची आहे, तसेच महिलांनी स्वतः घरच्या घरी स्तनांची तपासणी कशा प्रकारे करावी याबाबत माहिती देण्यात आली. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास स्तन कर्करोगावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते, याबाबत उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली,अशी माहिती अस्मिता कहाले यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी शंकांचे निरसन करून घेतले. महिलांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती, जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे उपक्रम समाजात आरोग्यविषयक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत संस्थेची सदस्य श्वेता पाटील ह्यांनी व्यक्त केले. अशी माहिती सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत  संगमेश्वर : खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर...