Friday 5 May 2023

शिक्षक भरती होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक सोडू देणार नाही - 'सभापती संदेश ढोणे'

शिक्षक भरती होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक सोडू देणार नाही - 'सभापती संदेश ढोणे'

जव्हार, जितेंद्र मोरघा :

प्राथमिक शिक्षक उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत एकही शिक्षकाची आंतरजिल्हा बदली करू देणार नाही असा इशारा बांधकाम व आरोग्य  समिती सभापती तथा जिल्हाध्यक्ष जिजाऊ संघटना, पालघर संदेश ढोणे यांनी दिला आहे. 
सदर विषयासंदर्भात सभापती ढोणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली.

जिल्ह्यात २८% शिक्षक कमी असून सध्या आंतरजिल्हा बदलीने ४७८ शिक्षक आणि ठाणे जिल्हा परिषदेकडील २५० शिक्षक असे एकूण ७२८ शिक्षक अर्थपुर्ण संबंधाने व्यवहार होवून सोडणार असल्याचे समजते, असे ढोणे यांनी म्हटले असून जिल्हा परिषदे कडे इयत्ता ९ वी, १० वी चे ६० वर्ग सुरू करण्याबाबत  शासनाची मान्यता असून यापैकी जिल्हा परिषदे मार्फत मागील पाच वर्षात ४१ वर्ग सुरू करण्यात आले आहेत,अद्यापही उर्वरित १९ वर्ग सुरू करण्याचे काम प्रलंबित आहे. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये ८ वी नंतर शाळाबाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असून २६ वर्ग सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषद कार्यालयात धूळ खात पडले आहेत. अशी खंत सभापती संदेश ढोणे यांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्हा हा आदिवासी व पेसा जिल्हा असून जिल्ह्याचा मुख्य भाग असलेल्या वसई विरार महानगरपालिकेची स्वतःची स्वतंत्र शिक्षण व्यवस्था नाही. तेथील गोरगरीब विद्यार्थीं हे पूर्णपणे  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर अवलंबून आहेत. 

शिक्षणा अभावी गडचिंचले मधील साधु हत्याकांड सारखे प्रकार घडतात. अशिक्षितपणामुळे इथल्या गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून डहाणू तालुक्यातील धानिवरी येथिल जमीन भूसंपादन वेळी बेघर केलेली आदिवासी कुटुंबे हे त्याचे ताजे आणि ज्वलंत उदाहरण आहे. 

देहर्जे येथे धरण उभारणी सारखा मोठा प्रकल्प चालू असून, तेथिल लोकांचे आजपर्यंत पुनर्वसन झालेले नाही. अपूर्ण शिक्षण किंवा अशिक्षित पणा यामुळे केवळ हे दुष्परिणाम इथल्या आदिवासी जनतेला भोगावे लागत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख समस्या असलेल्या कुपोषण,मातामृत्यू ,बालमृत्यू, बालविवाह या प्रश्नांमागे अशिक्षित पणा हे मोठे कारण आहे.
शासनाकडून आलेला हजारो कोटी रुपये निधी आमच्या पर्यंत न पोहोचता तो परत जातो. आपल्या जिल्हा परिषदेच उदाहरण घ्यायच तर २२० कोटी रुपये २०२० साली परत गेले. आणि वर्षानुवर्षे तेच अधिकारी या जिल्हा परिषदला बसून फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करत आहेत. परंतु अज्ञानामुळे या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवला जात नाही. या सर्व बाबींचा येथे उल्लेख करण्याचे कारण असे की आजही पालघर जिल्ह्यामध्ये १९०० शिक्षकांची कमतरता आहे. त्याचबरोबर हे शिक्षक सोडल्यास तब्बल ३०० जिल्हा परिषद शाळा
शिक्षकांअभावी बंद होतील.

असे वास्तव या पत्राद्वारे सभापती ढोणे यांनी निदर्शनास आणून दिले असून जर शिक्षक भरती झाल्याशिवाय जिल्ह्यातील शिक्षक आंतरबदलीने सोडल्यास पालक व विद्यार्थी यांच्या समवेत तीव्र आंदोलन करू असा इशारा सभापती संदेश ढोणे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...