Friday 12 April 2024

बौद्ध कुटुंबाचा जातीय छळ करणा-या महिलेवर अखेर गुन्हा दाखल...

बौद्ध कुटुंबाचा जातीय छळ करणा-या महिलेवर अखेर गुन्हा दाखल...

उल्हासनगर (प्रतिनिधी) - जातीय द्वेष भावनेतुन बौद्ध कुटुंबाचा छळ करणा-या जातीवादी महिलेवर अखेर मध्यवर्ती पोलीस ठाणे, उल्हासनगर येथे रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधे राधे अपार्टमेंट उल्हासनगर ३.येथे भाडेतत्त्वावर राहणा-या राधाबाई गायकवाड यांच्या कुटुंबावर त्याच इमारतीमध्ये राहणारी मनिषा राजपुत नामक महिला गेले वर्षभर गायकवाड कुटुंबाचा छळ करीत होती. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून इमारतीतील लोकांसमोर अपमानित करीत होती. घराजवळून जातांना या महार लोकांचा खुप वास येतो असे  बोलून नाकाला हात लावुन राधाबाई गायकवाड यांच्या कुटुंबाला हिणवत होती, पाण्याचे हंडे पायाने लाथ मारुन पाडून देत असे, तेथे उपस्थित लोकांसमोर पाणउतारा  करून अपमानित करीत असे. तुम्ही नीच जातीचे लोक आहात इथे पाणी भरायचे नाही. अशी निर्भत्सना करुन  गायकवाड कुटूंबाला अपमानित करीत असे. गायकवाड कुटूंबाला पाणीच मिळू नये म्हणुन घरात येणा-या पाण्याचे पाईप लाईन कापुन राधाबाई आणि त्यांच्या आईला तसेच मुलांना मारहाण केलेली आहे. गायकवाड कुटुंब अनुसूचित जातीचे असल्यामुळे वेळोवेळी पाणी भरण्यापासून रोखले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तिरस्कार बाळगुन घराच्या दारात असलेला छोट्या अक्षरात जयभीम लिहलेला निळा झेंडा खाली फेकून पायाखाली तुडवला आणि आंबेडकर जयंती साजरी केली तर घर जाळून टाकण्याची धमकी दिलेली आहे.

गायकवाड कुटुंबावरील जातीय अत्याचारा संदर्भात राधाबाई वेळोवेळी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता पोलीसांनी त्यांची दखल घेतली नाही. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे  प्रदेश सरचिटणीस आणि श्रमिक पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब पंडीत,अ‍ॅड.जय गायकवाड, अ‍ॅड.राहुल बनकर, इत्यादींनी या संदर्भात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. परंतु आम्ही अगोदर चौकशी करु, वरिष्ठांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी कारणे सांगुन गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदरची माहीती सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच बीआरएसपी चे महाराष्ट्र प्रदेश सचिव, सतीश बनसोडे, अजिंठा फाउंडेशनचे अजय सावंत, करण धनगर, वंचित बहुजन आघाडीचे प्रसाद देठे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाघ, अमित साळवे इत्यादी कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदरची बातमी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचल्यानंतर पहाटे उशीरपर्यंत पोलीस ठाण्यात मनिषा राजपुत हिचे विरोधात भारतीय द॔ड विधान संहितेसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 comments:

  1. ज्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास मनाई केली त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी.

    ReplyDelete
  2. येवढा त्या महिलेचा छळ केला तरी ही पोलिस अधिकारी तक्रार घेत नाही किती लाजीरवाणी घटना आहे करवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर

    ReplyDelete

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...