Tuesday 10 September 2024

साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश !!

साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश !!

ठाणे दि. १० - 

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमा नुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन अदा केले आहे. आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते.  गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६/ २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने अठ्ठावीस दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे.

२८ दिवसांत रोज चार सफाई कामगार चौवीस तास उपोषण करत होते. आंदोलनात जवळजवळ सर्व सफाई कामगार सहभागी झाले होते. महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उत्साहाने सहभाग घेतला.  

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युनियनच्या अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वराज अभियानचे सुभाष लोमटे, एन.ए.पी.एम व समता विचार प्रसारक संस्थेच्या मीनल उत्तूरकर, धर्म राज्य पक्षाचे नितीन देशपांडे, अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदनाताई शिंदे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या रितू जतिंदर सेंखों, माजी नगरसेवक विकास रेपाळे,  सुहास देसाई, भारत जोडो अभियानचे राजेंद्र चव्हाण,  युनियनचे सचिव सुनील कंद, अजय भोसले, संघटक सुनील दिवेकर, बहुजन विकास संघाचे नरेश भगवाने, नरेश बोहित, घर बचाओ घर बनाओ आंदोलनचे नंदू शिंदे, पुजा पंडित, श्रमजीवी कामगार संघटनेचे किरण कांबळे आदींनी आंदोलनाला पाठींबा देऊन कामगारांचे मनोबल वाढवले. श्रमिक जनता संघाचे ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध खात्यांचे कामगार प्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. 

श्रमिक जनता संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन यशस्वी होण्यासाठी युनियनच्या संघटक, अनिता कुमावत, शर्मिला लोगडे, दीनानाथ देसले, महेश निचिते, संजय सेंदाणे, पुष्पा भद्रे, सुविधा बांदल, सोनी चौहान, किशोर खर्डीकर, किशोर शिराळ, गीता झेंडे, रंजना मोरे आणि नंदकुमार गोतारणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...