संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना !
मुंबई, प्रतिनिधी, (ता. २७) : मुंबई येथील कुर्ला पश्चिम स्थीत संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल येथे शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरित्या करण्यात आली.
शासन निर्णयातील सर्व नियम व अटींचे पालन करून ही स्थापना करण्यात आली असून, यावेळी संघाची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. त्यामध्ये श्री रुपेश गरड यांची अध्यक्षपदी, कविता मोरे यांची उपाध्यक्षपदी, श्री राकेश राक्षे यांची कोषाध्यक्षपदी तर रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच निशा सनस, राणी जाधव, अजय हरिजन, संगीता मोडक, जितू गायकवाड आदी माजी विद्यार्थी सदस्य म्हणून सहभागी झाले.
या माजी विद्यार्थी संघाने शासन निर्णयानुसार संघावर सोपविण्यात आलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. रात्र शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा कटिबद्ध प्रयत्न करण्यात येईल, असे मत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
तसेच विविध शाळेय समित्यांचे आयोजनही त्याच दिवशी करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन सहाय्यक शिक्षक श्री समाधान खैरनार सर यांनी केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांनी केले. यावेळी मासूम संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून निकिता पोळ मॅडम तसेच स्कूल लीडर श्री योगेश विरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रम प्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचे संघाने ठरवले आहे. या उपक्रमामुळे रात्र शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.