Saturday 27 June 2020

"कोरोना बाधितांसाठी पुरेशा रुग्णशय्या (बेड) उपलब्ध, ‘वॉर्ड वॉर रूम’ मुळे योग्यरित्या व्यवस्थापन होत असल्याचे निदर्शक"!

"कोरोना बाधितांसाठी पुरेशा रुग्णशय्या (बेड) उपलब्ध, ‘वॉर्ड वॉर रूम’ मुळे योग्यरित्या व्यवस्थापन होत असल्याचे निदर्शक"!


कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक ती व योग्य ठिकाणी रुग्ण शय्या उपलब्ध व्हावी, या मुख्य उद्देशाने आणि रुग्णवाहिका व इतर बाबींचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी महानगरपालिकेने सुरु केलेल्या विभागीय नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रुमची मात्रा हमखास लागू पडली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने रुग्ण शय्या उपलब्ध आहेत. ऑक्सिजन पुरवठा, अतिदक्षता उपचार आणि जीवरक्षक प्रणाली असलेल्या रुग्ण शय्या देखील निरंतर उपलब्ध असून बेड मिळत नसल्याच्या तक्रारी निकालात निघाल्‍या आहेत.

कोविड १९ संसर्ग प्रारंभी वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होऊ लागला होता. सर्वव्यापी प्रयत्न करण्यात येत असताना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या आणि भविष्याच्या अंदाजानुसार गरजेच्या असलेल्या रुग्णशय्या तसेच उपचार केंद्रांची संख्याही महानगरपालिका प्रशासनाने वाढवली. असे असले तरी, रुग्णशय्या वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. महानगरपालिकेची नागरी मदतसेवा दूरध्वनी क्रमांक १९१६ वर मुंबईभरातून मोठ्या संख्येने येणाऱया दूरध्वनींमुळे सर्वांना समाधानकारक प्रतिसाद देताना, त्याची कार्यवाही विभाग स्तरावरुन करताना साहजिकच विलंब होत होता. यावर तोडगा म्हणून महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी या कामाचे विकेंद्रिकरण करण्याचा तातडीने निर्णय घेतला. त्यानुसार पद्धतीने विकेंद्रीत रुग्णशय्या व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) अंमलात आली असून त्यासाठी सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रूम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वॉर्ड वॉर रूम सुरु करतानाच, दुसऱया बाजूला सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना दररोजच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल विनाविलंब महानगरपालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे सादर करण्याचेही निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी दिले. दैनंदिन बाधितांचे अहवालांची माहिती मिळाल्यानंतर त्यातून विभागनिहाय २४ यादी बनवून त्या वॉर्ड वॉर रुमकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. वॉर्ड वॉर रुममध्ये नियुक्त डॉक्टर्स आपापल्या विभागातील बाधित रुग्णांशी तातडीने संपर्क व सुसंवाद साधून त्यांना गरजेनुसार व योग्य ठिकाणी रुग्णशय्या मिळवून देण्याची पूर्ण कार्यवाही करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आल्याने व त्याप्रमाणचे कार्यवाही होऊ लागल्याने रुग्णांनी गोंधळून अथवा घाबरुन जाण्याचे प्रकार थांबले, वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून रुग्णशय्या नेमून देणे, व्याप्त व उपलब्ध रुग्णशय्यांची माहिती सातत्याने अद्ययावत करणे ही कामेदेखील होवू लागली. या सर्व सुसूत्रतेचा दृश्य परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे.

आज (दिनांक २७ जून २०२०) दुपारी २ वाजता अद्ययावत केलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध रुग्णालये व कोरोना काळजी केंद्र (२) मिळून १८ हजार ७४४ खाटांची क्षमता आहे. पैकी १२ हजार १२१ व्याप्त आहेत. तर तब्बल ६ हजार ६२३ उपलब्ध म्हणजे रिकाम्या आहेत. 

यामध्ये विविध समर्पित कोरोना रुग्णालये व समर्पित कोरोना उपचार केंद्र यांतील खाटांची एकूण क्षमता १२ हजार ४७८ इतकी आहे. पैकी ९ हजार २९९ व्याप्त असून ३ हजार १७९ उपलब्ध आहेत.

ठिकठिकाणचे कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) मिळून सध्या ६ हजार २६६ खाटा उपलब्ध आहेत. ताज्या आकडेवारीनुसार यातील २ हजार ८२२ व्याप्त असून त्यापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ४४४ उपलब्ध आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्यासह उपचारांची सोय असलेल्या ७ हजार ७०५ रुग्णशय्यांपैकी ५ हजार ९८५ व्याप्त आहेत, तर १ हजार ७२० उपलब्ध आहेत. अतिदक्षता उपचारांचा विचार करता, १ हजार ३९४ पैकी १ हजार २९० रुग्णशय्यांवर उपचार सुरु असून १०४ बेड उपलब्ध आहेत. तर जीवरक्षक प्रणालीसह उपलब्ध असलेल्या ७७० खाटांपैकी ७४४ व्याप्त असून २६ उपलब्ध आहेत. 

याशिवाय, ठिकठिकाणी मिळून ३२४ कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १) तयार करण्यात आले आहेत, ज्यामध्ये बाधितांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्‍तिंना अलगीकरण (क्वारंटाईन) करण्यात येते. या केंद्रांची मिळून एकूण क्षमता ४८ हजार ६४० आहे. मात्र सध्या १६ हजार ३५६ व्यक्ती या केंद्रांमध्ये असून ३२ हजार २८४ जणांना सामावून घेण्याची क्षमता उपलब्ध आहे.
या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते की, सर्व रुग्णालये व केंद्रांमध्ये पुरेशा संख्येने बेड उपलब्ध असून रुग्णांनी व जनतेनेही अनावश्यक भीती बाळगून घाबरुन जाण्याचे कारण नाही. रुग्णशय्यांची क्षमता वाढवत असतानाच त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याची निकड वेळीच ओळखून महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आता संपुष्टात आल्या आहेत. फक्त रुग्णशय्याच नव्हे तर रुग्णवाहिकांचेही व्यवस्थापन होऊ लागल्याने त्याबाबतही तक्रारी नगण्य आहेत. रुग्णांशी थेट डॉक्टर्स सुसंवाद असल्याने अनावश्यक भीती कमी करण्यासह प्रत्यक्ष जनजागृती करण्यातही हे वॉर्ड वॉर रुम मोलाची भूमिका बजावत आहेत.
या विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

ए विभाग २२७० ०००७, बी विभाग २३७५ ९०२३, सी विभाग २२१९ ७३३१, डी विभाग २३८३५००४, ई विभाग २३०० ०१५०, एफ/दक्षिण विभाग २४१७ ७५०७, एफ/उत्तर विभाग २४०११३८०, जी/दक्षिण विभाग २४२१ ९५१५, जी/उत्तर विभाग २४२१ ०४४१.

एच/पूर्व विभाग २६६३ ५४००, एच/पश्चिम विभाग २६४४ ०१२१, के/पूर्व विभाग २६८४ ७०००, के/पश्चिम विभाग २६२० ८३८८, पी/दक्षिण विभाग २८७८ ०००८, पी/उत्तर विभाग २८४४ ०००१, आर/दक्षिण विभाग २८०५ ४७८८, आर/उत्तर विभाग २८९४ ७३५०, आर/मध्य विभाग २८९४ ७३६०.

एल विभाग २६५० ९९०१, एम/पूर्व विभाग २५५२ ६३०१, एम/पश्चिम विभाग २५२८ ४०००, एन विभाग २१०१ ०२०१, एस विभाग २५९५ ४०००, टी विभाग २५६९ ४०००.

प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये संलग्न या दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असल्याने नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत नाही. तसेच २४x७ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱया या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी कार्यरत असल्याने कोणत्याही क्षणी नागरिकांना मदत उपलब्ध होते. विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मुळे कोरोना बाधितांना प्रभावी सेवा देण्यात महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...