Saturday 27 June 2020

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"

"चिनी माल विक्री बंदी : दोंडाईचा न .प . चे अनुकरण करा !"


धुळे - धुळे, जिल्ह्यातील दोंडाइचा नगरपालिका ही संपूर्ण देशात चीनी वस्तुंच्या विक्रीवर बंदी आणणारी पाहिली नगरपालिका ठरली आहे . दोंडाईचा नगरपालिका देशात एक उत्कृष्ट नगरपालिका म्हणून नावलौकिक मिळवित असताना , त्याच नगरपालिकेने याबाबतचा ठराव केला आहे . त्यामुळे या पुढे आता दोंडाइचा  शहरात व्यापाऱ्यांना चिनी माल विक्रीसाठी ठेवता येणार नाही . सीमेवर चिनने जी धोकेबाजी चालविली आहे व आपल्या देशाचे वीस सैनिक मारले त्यामुळे देशभरात असंतोष आहे. देशभरात चिनी मालावर बहिष्काराची मोहिम सुरू आहे . चिनी मालाची होळी देखील जागो जागी होत आहे . चिनी अॅप  डिलिट करा , म्हणून मोहिम देखील चालविली जात आहे . एकिकडे देशप्रेमाचे हे वातावरण असताना दुसरीकडे गेल्या आठवड्यात नवीन लॉन्च झालेला चायनाचा महागडा मोबाईल भारतात  काही तासातच संपला . डोकलामच्या वेळी देखील अशी चिनी मालावर बहिष्काराची मोहिम चालली होती , पण  ती मोहिम वाढू शकली नाही , निकर्षाप्रत जावू शकली नव्हती. दरम्यान सरकारनेच शेकडो , हजारो कोटींचे ठेके चिनी कंपन्यांना देणे सुरु ठेवले . या प्रकारच्या बातम्या पाहून चिनी वस्तुंवरील जनतेची बहिष्काराची भावना कमजोर पडते . यासाठी जनतेला दोष देणे सोपे आहे . परंतू सरकारची भुमिकाही ' लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ! ' अशी असता कामा नये . म्हणूनच आता राज्य सरकारने चिनी कंपन्यांचे पाच हजार कोटी रूपये गुंतवणूकीचे प्रस्ताव रोखून धरले , केंद्र सरकारने सीमेस लागून असलेल्या देशांची गुंतवणूक  सरकारच्या संमतीशिवाय होणार नाही , असेही जाहिर केले . सरकारांच्या या कृतीचे जनतेने स्वागतही केले  आहे , त्याच प्रकारे दोंडाइचा नगर पालिकेने  चिनी माल विक्री वर बंदीच्या केलेल्या ठरावाचे जनतेत स्वागत होणार आहे . बऱ्याच नागरिकांच्या मनात अशी शंका असते की , चिनी माल आयातीवर सरकारच बंदी कां घालत नाही ? प्रश्न सरळ आहे. पण आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गॅट करारावर सही केलेली आहे . त्यामुळे सरकार म्हणून अशी बंदी घालता येत नाही . शिवाय चिनने इतक्या वर्षात विविध वस्तूंचे उत्पादन केंद्र बनून संपूर्ण जगाचे चिनवर मोठे अवलंबित्व  निर्माण करून टाकले आहे . हा सुध्दा एक मुद्दा आहे . असे असले तरी जनतेनेच चिनी वस्तू विकायच्या नाहीत, विकत घ्यायच्या नाहित असे ठरविले , तर  त्यास गॅट किंवा अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रिय कराराची बाधा येत नाही . त्यामुळे देशभरात जर नागरिकांनी चिनी वस्तु घ्यायच्या नाहित ठरविले , चिनी वस्तु विकायच्याच नाहित , असे दुकानदारांनी ठरविले तर त्यास कुठलीच बाधा येवू शकत नाही . आता दोंडाइचा न प ने शहरात अशा चिनी वस्तू विक्रीवर बंदीचा ठराव केला आहे . त्यांनी सर्व बाबी तपासून घेवूनच हा ठराव केला असेल . या ठरावाचे परिणाम व महत्व मोठे आहे . याच प्रकारे विविध ग्रा. पं. , नगर पालिका , नगरपंचायत , नगर परिषद , महानगर पालिका यांनी गावोगावी ठराव करुन चिनीमाल विक्रीस बंदी घातली तर देशभरात खूप मोठा रिझल्ट मिळू शकतो. शासनाने देखील ऑनलाईन विक्री होणाऱ्या मालावर तो कोणत्या देशात उत्पादित झाला आहे . हे नमूद करणे बंधनकारक केले आहे . बऱ्याच ऑनलाईन  व्यापार कंपन्या परदेशी आहेत . त्धांनी स्वतः मेड इन चायना , मेड इन पी आर  सी असणारे प्रॉडक्ट विकणे बंद केले नाहि , तरी  संपूर्ण देशभरातील डिलिव्हरी बॉय  यांनी ठरविले, की  आम्ही चायना मेड मालाची डिलेव्हरी करणार नाही , तरी सुध्दा खूप फरक पडू शकतो . यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहिम चालली पाहिजे . त्या दृष्टीने दोंडाईचा नगरपालिकेच्या या ठरावाप्रमाणे संपूर्ण देशात न .प .मनपांनी ठराव केले, आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तर खूप मोठे काम होणार आहे .

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...