Thursday 28 January 2021

निवडून आलेल्या सदस्यांची "जावया" प्रमाणे सेवा, हट्ट पुरवण्यासाठी लाखोंचा खर्च, नेतागिरी करणा-याचे दिवाळे ?

निवडून आलेल्या सदस्यांची "जावया" प्रमाणे सेवा, हट्ट पुरवण्यासाठी लाखोंचा खर्च, नेतागिरी करणा-याचे दिवाळे ?


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या लाडक्या मुलीला सासरी काही त्रास होऊ नये, ती सुखात नांदावी या करीता मुलीचे आई वडील प्रसंगी कर्ज काढून जावईबापूचे लाड पुरवतात. अगदी असेच निवडून आलेल्या सदस्यांच्या बाबतीत सध्या सुरू असून ते म्हणतील तसे त्यांच्या वर लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. यामध्ये नेतागिरी करणा-याचे मात्र दिवाळे निघत आहे.
तालुक्यातील वरप ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध निवड झाली आणि उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान झाले व मतमोजणी देखील झाली. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, आमच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या हे सर्वच पक्ष नेते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत सुटले. त्यातच सरपंच आरक्षणानंतर हे स्पष्ट होणार असल्याने व त्याची तारीख निश्चित नसल्याने प्रत्येकाने आपआपले सदस्य सुरक्षित अशा फार्म हाऊस, हाॅटेल, अशा ठिकाणी ठेवले. ४/५ दिवसानंतर डायरेक्ट सरपंच निवडणूकीलाच सदस्य हजर करायचे असे नियोजन टिम प्रमुखांचे होते. पण झाले उलटेच, सरपंच पदाचे आरक्षण निवडणूकीनंतर लगेच न पडता ते चक्क १६ दिवसानंतर जाहीर केले. आणि यानंतर देखील प्रत्यक्ष सरपंच निवड होण्याकरिता काही दिवस लागू शकते आणि तोपर्यंत पळवलेल्या सदस्याला सांभाळावे लागत आहे.
कल्याण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीपैकी म्हारळ, कांबा, गोवेली, म्हसकळ, खोणी, बेहरे, घोटसई, आदी ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे काही झाले तरी सदस्य आपल्या बाजूने रहावेत म्हणून त्याचेवर लाखांचा खर्च केला जात आहे. गोवा, अलिबाग, माळशेज, अशी ठिकाणे निवडली जातात. तसेच काही फाऊ स्टार, थ्री स्टार हॉटेलमध्ये देखील यांची सोय केलेली असते. एका दिवसाला ३लाख रुपये खर्च येतो असे एका सदस्याने सांगितले. त्यामुळे सध्या पैशाचाच बाजार मांडला जात आहे. म्हणून तर भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव होतो. असे एका पराभव झालेल्या उमेदवारांचे म्हणने आहे. तर ऐवढा खर्च गाव विकासासाठी केला तर गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल असे सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितले. दरम्यान ३फेब्रुवारीला काय आरक्षण पडते यावर पुढील गणीतं अवलंबून आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...