आमदार कुमार आयलाणी यांनी संकटात तीन गावांना सोडले वा-यावर? उपसरपंचाचा गंभीर आरोप !
कल्याण, (संजय कांबळे) : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यापासून ते आजपर्यंत या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या म्हारळ, वरप, आणि कांबा या गावाकडे कायम दुर्लक्ष केलेल्या भाजपाचे आमदार कुमार आयलाणी यांनी कोरोनाच्या संकटात देखील काहीही मदत केली नाही. असा गंभीर आरोप वरप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडू यांनी केला आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा ही गावे उल्हासनगर शहरानजीक आहेत. सन १९९४/९५ मध्ये म्हारळ आणि वरप या दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. म्हारळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या ६०/७० हजाराच्या वर आहे तर वरप आणि कांबा ग्रामपंचायतीची १५ /२० हजाराच्या आसपास आहे. झपाटय़ाने नागरीकरण झाल्याने येथे मुलभूत सोईसुविधा पुरवताना ग्रामपंचायतीची नाकी नऊ येत आहे. प्रारंभी ही गावे उल्हासनगर महानगरपालिकेत समाविष्ट होती. त्यावेळी ग्रामस्थांनी मोठा लढा देऊन ही गावे वेगळी केली होती. यावेळी सिंधी मराठी हा मुद्दा भंयकर चर्चेत आला होता.
गावे जरी महानगर पालिकेतून वेगळी झाली तरी मतदारसंघ मात्र उल्हासनगर विधानसभा असाच राहिला. तरीही येथील नागरिकांनी ते मान्य केले. ते या आशेवर की येथील आमदार आपल्या कडे लक्ष देतील, पण ग्रामस्थांची घोर निराशा झाली. कारण मागील २००५ च्या महापुरात म्हारळ वरप कांबा या गावाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले, उल्हासनगरातील विविध संस्था व सिंधी बांधवांनी भरपूर मदत केली. परंतु लोकप्रतिनिधी कुठे दिसले नाहीत. अशीच परिस्थिती मागील वर्षांपासून सुरू आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका म्हारळ वरप कांबा या गावांना बसला, बेड नाही, रुग्णवाहिका नाही, वेळेवर औषध उपचार नाही. त्यामुळे अनेकांचा जीव गेला. मात्र स्वतः ला लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमदार कुमार आयलाणी यांना याचे काही सोयरसुतक नव्हते. प्रचंड वाढणा-या या लोकसंख्येच्या गावाकरीता स्वतंत्र कोरोना कोविड सेंटर असावे असे अनेकांचे म्हणणे होते. पण येथेही आमदार साहेब कुठेही दिसले नाही. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता किंवा इतर अनेक सोईसुविधा साठी या लोकप्रतिनिधीनी ग्रामस्थांची कधी बैठक आयोजित केली नाही. ऐवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसर्या लाटेत भंयकर रुग्ण वाढले असताना, वरप कोरोना कोविड सेंटर मध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या असताना, यामध्ये आॅक्शिजन, पाणीपुरवठा, आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच पेंशट यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
आज इतक्या मोठ्या म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, पठारपाडा, नाणेपाडा, वाघेरापाडा, वरप आदीवाशी वाडी आदी लोकसंख्येच्या गावातील लोकांना कोरोना कोविड लसीकरणासाठी कित्येक किलोमीटर अंतरावरील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र व गोवेली ग्रामीण रुग्णालय येथे जावे लागते आहे. हे दुर्दैवी नाही का? असा प्रश्न उपसरपंच निलेश कडू यांनी उपस्थित केला आहे. तसेच आज कल्याण ग्रामीण २७ गावे परिसरातील आमदार राजू पाटील हे त्यांचा मतदानाची संबंध नसतानाही म्हारळ वरप कांबा या गावातील लोकांसाठी वरप कोरोना कोविड सेंटर करीता मदत करतात आणि आमचे हक्काचे, जे आमचे नेतृत्व करतात ते आमदार कुमार आयलाणी या गावाकडे ढुंकूनही पाहत नाही याला काय म्हणावे? याचा नागरिकांनी गंभीर विचार करावा असे आवाहन उपसरपंच निलेश कडू यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment