"आई-बाप" काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलं'', सामनाच्या रोखठोकमधून पुन्हा एकदा नारायण राणेंवर हल्लाबोल.!
अरुण पाटील, भिवंडी, दिं 29 :
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यासोबतच संजय राऊतांनी राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि नीलेश राणे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केलं आहे. टीका करणे आणि स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्याचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केलंय, असं राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्याने कारवाई केली तर राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाहय़ असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री कोणीही असोत, त्यांचा जाहीर उपमर्द करण्याचा अधिकार कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करीत राहिले! त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहेत.
राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. "तुम्ही बिनबापाचे आहात काय?" असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल.
उद्धव ठाकरे व इतरांवर धोरणात्मक टीका करणे समजू शकतो. तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, पण राणे व त्यांची दोन्ही मुले राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांच्याविषयी जी भाषा वापरतात तो भाजपच्या नव्या संस्कृतीचा उदय आहे! राणे व त्यांच्या मुलांनी काँग्रेस पक्षात असताना नरेंद्र मोदी, वीर सावरकर यांच्याविषयी याच असभ्य भाषेचा वापर केला होता. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींचा एकेरी पद्धतीने अपमानास्पद उल्लेख करण्याचा अधिकार राणे व त्यांच्या मुलांना कोणी दिला?
राणे महाराष्ट्रात येऊन ज्या प्रकारची विधाने करीत आहेत तो केंद्रीय मंत्री म्हणून मर्यादांचा, परंपरांचा भंग आहे व पंतप्रधान मोदी यांनी वेळीच दखल घेतली नाही तर त्याचे फार मोठे परिणाम
भोगावे लागतील. एका गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला. मोदी तर जाहीर सभांतून मला ते "नीच" म्हणाले हो म्हणून अश्रू ढाळत होते. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे.
भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. निदान त्यावर त्यांची प्रवचने तरी असतात, पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जे घडवले जात आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सत्ता गमावली हे दुःख समजू शकतो. पण म्हणून महाराष्ट्रातील टोलेजंग व्यक्ती व राज्याच्या संस्कृतीवर हल्ला करत राहणे योग्य नाही.
नारायण राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सगळय़ात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. हे भांडवल तोकडे पडत असल्यामुळेच भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणारे बाहेरचे लोक वापर करण्यासाठी लागतात. “या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळय़ांचे परिणाम भाजपास भोगावे लागतील. भाजपास अस्वस्थता, अस्थिरतेची वाळवी लागेल. राणे यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये बहुजन समाज विरुद्ध इतर अशी सरळ फाळणी होईल. राणेच ती करतील. त्या विघटनास सुरुवात झाली आहे.
No comments:
Post a Comment