Wednesday, 6 October 2021

वाहतूक पोलिसांच्या श्रमदानातून ताम्हिणी घाटाचा वाढला थाट ! वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक !!

वाहतूक पोलिसांच्या श्रमदानातून ताम्हिणी घाटाचा वाढला थाट ! वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक !! 


      बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : मुंबई आणि पुणे येथून पर्यटक वर्षाच्या बारा महिने ताम्हिणी घाट मार्गे कोकणामध्ये मोठया प्रमाणात येत असतात. रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटाच्या पायथ्याला मोठी औदयोगिक वसाहत असल्याने ताम्हाणी घाटात छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ कायमच असते. ताम्हाणी घाटामध्ये चढ- उतार नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात.
       या ठिकाणी अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा आला की रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे वाढतात, त्यामुळे वाहन चालकांना झाडांच्या वाढलेल्या फांद्या व साईड पट्टीवर वाढलेले गवत यामुळे समोरून येणारी वाहने नीट दिसून येत नाहीत व चढ-उतार वळणे असल्याने वाहनावर ताबा मिळवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा या ठिकाणी अपघात होत असतात. याची दखल घेत महाड वाहतूक विभागाचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी ताम्हिणी घाटातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तसेच साईड पट्टीवरील वाढलेले गवत जेसीबी च्या सहाय्याने काढून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.
     तसेच ताम्हिणी घाटामधील ब्लॅक स्पॉट वर खडी माती टाकून रस्ता वाहतुकीस चांगला बनविण्यात आला आहे, यामुळे अपघात होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. त्यामुळे वाहन चालकांना सुखाचा प्रवास होण्यास मदत होणार आहे. सदर मोहिमेत महाड वाहतूक विभागाचे वाहतुक पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील , माणगाव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस श्री. लालासाहेब वाघमोडे ,श्री .निवास साबळे हे उपस्थित होते. सदर काम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पोळेकर यांनी जेसीबी देऊन मदत केली. सदर काम केल्यामुळे वाहन चालकांकडून आणि सर्व प्रवासी जनतेकडून या कामा बद्दल वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !!

बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची धडक कारवाई !! *कल्याण, दि. 23 एप्रिल 2026* कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’...