Sunday 31 October 2021

मोहने बाजारपेठेतील खाली करण्यात आलेल्या गाळे धारकांवर उपासमारीची वेळ !! "सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान"

मोहने बाजारपेठेतील खाली करण्यात आलेल्या गाळे धारकांवर उपासमारीची वेळ !!

"सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान"


मोहोने, बातमीदार : कल्याण सत्र न्यायालयाच्या आदेशाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोहने येथील सात दुकाने आणि बारा निवासी घरांवर खाली करण्याची कारवाई झाल्याने येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसात गाळे व  घरे  खाली करण्यात आल्याने व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.


येथील एक गाळ्यात अपंग असलेले मरुधर स्टोअर्सचे मालक विजयराज चुन्नीलाल जैन हे कागदपत्रे झेरॉक्स करण्याचा व्यवसायिक करत होते या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. त्यांच्या दुकानावर कारवाई झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे हसन अली यांचे केशकर्तनालयाचे दुकान होते या दुकानावरही कारवाई झाल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नसल्याने ते पुरते हवालदिल झाले आहेत.

जागेचे मूळ मालक अंजना पटेल यांच्या जागेवर गेल्या ४० ते ४५ वर्षापासून पगडी भाडेपट्टी तत्त्वावर राहत असलेले चंपलाल मेहता, विजयराज जैन, हसन अली हे व्यवसाय करीत असून त्यांच्याकडे भाडे पावती भरल्याच्या जुन्या पावत्या आहेत. 


जागा मालक अंजना पटेल यांनी दुकाने व घरे खाली करण्यासंदर्भात कल्याण कोर्टात दावा केला होता. कोर्टाने २००९ रोजी दुकाने खाली करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या या आदेशाविरोधात चंपालाल मेहता, विजयराज जैन, हसन अली, यांनी कल्याण न्यायालयात धाव घेऊन प्रतीदावा दाखल केला होता. हा दावा फेटाळण्यात आला असल्याचे सांगण्यात आले परंतु कोर्टाची कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक आमच्यावर जबरदस्तीने गाळे खाली करण्यात आले असल्याचा आरोप विजयराज जैन, हसनअली यांनी केला आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीने आम्हाला दुकाने खाली करण्यास सांगितले आहे आम्ही बेघर झालो असून उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नसल्याने आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे आता आम्ही कोठे जावे काय करावे काही सुचत नाही असे ६५ वर्षीय अपंग असलेले विजयराज जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोर्टाला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने व्यापाऱ्यांना स्थगिती आदेश मिळवता आला नाही. दिवाळीच्या सुट्ट्या संपताच उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध स्थगिती आदेश देण्याची विनंती मा. कोर्टाकडे करणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

असे असले तरी ऐन दिवाळीच्या खरेदीचा दिवसात व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा !!

देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा !! ** विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आ...