Wednesday 29 December 2021

म्हारळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याच्या बदलीसाठी सरपंच आणि सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड !!

म्हारळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याच्या बदलीसाठी सरपंच आणि सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या बहुचर्चित म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी आर वाघचौडे हे मनमानी कारभार करतात म्हणून यांची बदली करण्यात यांवी अशी मागणी सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी केली होती, परंतु ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित व चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे त्यांची बदली करण्यात येवू नये अशी मागणी एकूण १७ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी स्वाक्षरी करून कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली असून सरपंच, उपसरपंच विरुद्ध काही सदस्य असा "सामना" म्हारळ गावात रंगणार आहे, यामुळे ऐन थंडीत या परिसरात वातावरण भलतेच तापले आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही सर्वाधिक महसूल देणारी, १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. प्रगती प्रकाश कोंगिरे (सरपंच), अश्विनी निलेश देशमुख (उपसरपंच), वेदिका गंभिरराव, किशोर वाडेकर,
अँड दिपक अहिरे, बेबी सांगळे, अनिता देशमुख, अमृता  महेश देशमुख, प्रकाश चौधरी, लक्ष्मण कोंगिरे, योगेश देशमुख, निलिमा म्हात्रे, प्रमोद देशमुख, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, विकास पवार आणि मोनिका गायकवाड असे १७ सदस्य सुमारे एक ते दिड लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. लोकांची कामे करण्यासाठी यांना नागरिकांनी निवडून दिले आहे. परंतु सध्या म्हारळ ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी कसे वाईट व कसे चांगले याचा सामना सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये सुरू झाला आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही वादग्रस्त व कटकटीची म्हणून ओळखली जाते. यामुळे येथे कोणी ग्रामविकास अधिकारी यायला तयार नसतात आँगस्ट २०२१ मध्ये बी आर वाघचौडे हे येथे हजर झाले, म्हारळ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. शिवसेनेच्या सरपंच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपसरपंच तर भाजपा विरोधक असे सत्ता विभाजन झाले आहे. परंतु सरपंच प्रगती कोंगिरे या सरपंच पदी विराजमान झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे मनमानी कारभार करतात, लोकप्रतिनिधींचा अपमान करतात, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, सदस्यांनी मंजूर केलेली कामे करीत नाहीत, फोन उचलत नाही, सरपंचाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, इतिवृतात परस्पर बदल करतात, असे अनेक आरोप करत. त्यामुळे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी व पत्र सरपंच प्रगती कोंगिरे व इतर ४ सदस्यांनी  सीईओ यांना दिले आहे.

तर ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे हजर झाल्यापासून ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित व चांगल्या प्रकारे सुरळीतपणे सुरू आहे, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत आहे, उलटपक्षी सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे या चुकीची कामे करण्यासाठी दबाव आणत आहेत पण ते दबावाला बळी पडत नाही, म्हणून त्यांची बदली करण्याचा खटाटोप सुरू आहे, एकाच वार्डात जास्तीत जास्त कामे निवडणे, वार्डात मतभेद, एका व्यक्तीच्या फायद्यासाठी ४० लाखाचा निधी खर्च करणे, मासिक सभेची मान्यता न घेता परस्पर निविदा आदेश काढण्यासाठी सूचना देणे, ग्रामविकास अधिकारी यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, संवेदनशील ग्रामपंचायत असून १० वर्षात मोठे घोटाळे, अंदाजपत्रकाशिवाय खर्च करणे, ग्रामविकास अधिकारी यांची स्वाक्षरी होऊनही सरपंच प्रगती कोंगिरे यांनी आँगस्ट २०२१ पासून इतिवृत्त दिले नाही, अशा प्रकाराच्या दबावांंचा समावेश असून यामुळेच त्यांची बदली करण्यात येवू नये अशी मागणी १२ सदस्यांनी लेखी पत्राद्वारे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे केली आहे. या पत्रावर अँड दिपक अहिरे, बेबी सांगळे, अनिता देशमुख, अमृता देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, योगेश देशमुख, निलिमा म्हात्रे, प्रमोद देशमुख, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, विकास पवार, आणि मोनिका गायकवाड आदी सदस्यांचा समावेश आहे, सध्या म्हारळ परिसरात सरपंच, उपसरपंच व काही सदस्य यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी वाघचौडे यांच्या "बदली" वरुन सुरू झालेला हा "सामना" निर्णायक होतो की काही "तडजोड" होते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. तसेच येत्या ३१ डिसेंबर म्हणजेच "थर्टी फस्ट" दिवशी होणाऱ्या मासिक सभेत याचा 'धुरळा' उडणार का? हे लवकरच स्पष्ट होईल या बाबतीत ग्रामविकास अधिकारी वाघचौडे यांना संपर्क साधला असता आपण कार्यशाळेत आहोत, असे त्यांनी सांगितले..

*प्रतिक्रिया

ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे हजर झाले पासून काय कामे केली, उलट सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा अपमान करतात, मनमानी कारभार करतात, त्यांची तक्रार केली आहे -श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे,(सरपंच, म्हारळ ग्रामपंचायत)

'आमच्याकडे तक्रार आली आहे, त्याची आम्ही चौकशी सुरू केली आहे -डॉ भाऊसाहेब दांंगडे* मुख्य कार्यकारी अधिकारी, जिप, ठाणे)

'ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे कायदा जाणणारे, कायदेशीर काम करणारे, हुशार आहेत, गेल्या ६ वर्षात दलितवस्ती मध्ये ७३ लक्ष रुपये खर्च केले नाहीत, हे त्यांच्या मुळे समोर आले, ते बेकायदेशीर कामे करत नाहीत म्हणून त्यांच्या बदलीची मागणी सरपंचाकडून होत आहे -अँड दिपक अहिरे, सदस्य, ग्रामपंचायत, म्हारळ.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...