Saturday 29 January 2022

क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह आहेत -- अनिल देशमुख

क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह आहेत -- अनिल देशमुख


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) : विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा पैसे वसूल करताना ही रक्कम ‘नंबर १’ साठी करत असल्याचे काही लोकांना सांगितले. तर त्याने नंबर १ हा मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासाठी वापरायचा, हे चांदीवाल आयोगासमोर स्पष्ट झाल्यामुळे क्रमांक -१ हा मी नसून परमबीर सिंह असल्याचे देशमुख यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. 

अनिल देशमुख पदाचा गैरवापर करून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपये वसूलचे आदेश सचिन वाझे व अन्य काही पोलिसांना दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. सुरुवातीला त्यास वाझेनेही दुजोरा दिला. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखालील आयोगापुढे सचिन वाझेने ‘यू-टर्न’ घेतले. आपण देशमुखांच्या वतीने पैसे वसूल केले नाही, असे वाझेने साक्षीत म्हटले आहे. असे देशमुख यांनी ॲड. अनिकेत निकम यांच्याद्वारे दाखल जामीन अर्जात म्हटले. 

ज्याच्या जबाबाचा आधार घेत ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केला, त्या वाझेने साक्ष फिरविली आहे. त्याने (वाझे) आयोगाला सांगितले की, तो मला भेटला नाही आणि वसूल केलेले पैसे त्याने मला कधीच दिले नाही. ईडीने वाझेच्या चुकीच्या जबाबावर आधारित माझ्यावर गुन्हा नोंदविला. संशयास्पद भूतकाळ असलेल्या सचिन वाझे या  कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर पैसे वसूल केल्याचा आरोप करणे हे कितपत योग्य आहे असे देशमुख यांनी अर्जात म्हटले आहे. 

राज्यात २.२५ लाख पोलीस कर्मचारी आहेत. राज्यभरात १०,००० सहायक पोलीस निरीक्षक आहेत. अशा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत थेट प्रवेश मिळाला, असे मानणेही चुकीचे आहे, असा दावा देशमुख यांनी अर्जात केला.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...