Wednesday 19 January 2022

कल्याणच्या तरुणाने श्रीमंत असल्याचे भासवून घातला कित्येक तरुणींना गंडा !!

कल्याणच्या तरुणाने श्रीमंत असल्याचे भासवून  घातला कित्येक तरुणींना गंडा !!


भिवंडी, दिं,19, अरुण पाटील (कोपर) :
                 कल्याण येथील रहिवासी असणाऱ्या एका 34 वर्षीय तरुणाने सोशल मीडिया आणि मॅट्रीमोनिअल साईटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आरोपीनं प्रत्यक्षात कधीही न भेटता तब्बल 35 ते 40 तरुणींना ऑनलाईन गंडा घातला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून त्यांची लाखोंची फसवणूक  केली आहे. मागील बरीच दिवस शोध घेतल्यानंतर, गुप्त माहितीच्या जोरावर सापळा रचून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  आरोपीला बेड्या ठोकल्या  आहेत. 
           विशाल चव्हाण उर्फ अनुराग असं अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपीनं सोशल मीडिया आणि मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 35 ते 40 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. आरोपीनं आपण श्रीमंत असल्याचं भासवून प्रत्यक्षात कधीही न भेटता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरोपीनं पीडित तरुणीला मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नासाठी विचारणा केली होती. त्यासाठी आपण खूप श्रीमंत असल्याचेही त्यानं पीडितेला भासवलं होते.
               त्यानंतर त्यानं आपल्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करायची असल्याचं सांगून पीडितेला अभ्युदय बँकेत सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितलं होतं. पीडित तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवून संबंधित बँकेत पैसे भरले. पण त्यानंतर आरोपी विशाल यानं पीडितेशी संपर्क तोडला. विशालने पीडितेशी प्रत्यक्षात एकदाही न भेटता तिला लाखोंचा गंडा घातला आहे. आरोपीनं अशाच प्रकार राज्यभरातील 35 ते 40 तरुणींना फसवलं आहे.
               या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पण आरोपीनं वापरलेले मोबाईल नंबर, सोशल मीडिया अकाउंट तसेच मॅट्रोमोनियल साइटवर पत्ता खोटा टाकला होता. एवढंच नव्हे तर आरोपीनं मॅट्रीमोनिअल साईटवरील फोटोदेखील भलत्याच तरुणाचा अपलोड केला होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणं कठीण बनलं होतं. पण पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास करत आरोपीचा पत्ता शोधून काढला.
              यानंतर पोलिसांनी सापळा रचून कल्याण पूर्वेकडील श्रद्धा महल या इमारतीतून अटक केलं आहे. आरोपी विशाल याने काही तरुणींना प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले आहेत. या सोबतच त्याने स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाखाली 20 ते 25 तरुणांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात शीव, वर्सोवा, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...