Saturday 26 February 2022

हवालदारांचे फौजदार होण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; शासनादेश झाला जारी, सतरा हजार पदे वाढणार--गृहमंत्र्याची माहिती !!

हवालदारांचे फौजदार होण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; शासनादेश झाला जारी, सतरा हजार पदे वाढणार--गृहमंत्र्याची माहिती !!


भिवंडी, दिं,26, अरुण पाटील (कोपर) : राज्यातील हजारो पोलिस शिपाई, हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय शुक्रवारी (ता. २५) जारी झाला आहे. या निर्णयामुळे पोलिस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहोचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव गृह विभागाने तयार केला होता. या निर्णयाला आज मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. 

पोलिस शिपाई ते सहायक पोलिस निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलिस नाईक या संवर्गातील ३८ हजार १६९ पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे पोलिस दलाची पुनर्रचना होणार असून पोलिस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलिस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१ वाढणार आहेत. 

पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी : गृहमंत्री या निर्णयामुळे पोलिस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...