लोकनेते स्व. एकनाथ गायकवाड यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व. एकनाथ गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा देण्यासाठी आज गुरुवार 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते एकनाथराव गायकवाड विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे. श्री. मानव सेवा संघ, सायन मेन रोड, सायन (पूर्व), मुंबई येथे हा कार्यक्रम होत असून काँग्रेस पक्षातील अनेक मान्यवर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व कार्यक्रमाचे निमंत्रक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना राजहंस म्हणाले की, लोकनेते स्व. एकनाथराव गायकवाड यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास थक्क करणारा होता. एका मागास कुटूंबात जन्मलेल्या आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमि नसताना केवळ जिद्द, संघर्ष, दांडगा जनसंपर्क आणि झुंजार वृत्ती याच्या बळावर त्यांनी विविध पदांना गवसणी घालतानाच लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. विधानसभा व लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत असताना कोरोना महामारीच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गायकवाड यांनी मुंबईकरांची सेवा केली. कोरोना महामारीत मुंबईकरांची सेवा करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली व नंतर 28 एप्रिल 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या कार्यक्रमाला राजकिय, सामाजिक व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत असे राजहंस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment