सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करावे - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
सिंदखेडराजा विकास आराखडा बैठक
बुलडाणा, बातमीदार, दि. २९ : सिंदखेडराजाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता सर्वंकष विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याठिकाणी विविध ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंचे संवर्धन करावे लागणार आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सोयी – सुविधांची निर्मिती करावी लागणार आहे. तरी सिंदखेड राजा विकास आराखडा बनविताना येथील सर्व ऐतिहासिक वारशाचे संवर्धनाच्यादृष्टीने कामांचा समावेश करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभगृहात सिंदखेडराजा विकास आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. यावेळी सिं.राजा नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक श्रीमती वहाने आदींसह केंद्रीय पुरातत्व विभाग, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुतळा बारव पर्यंत रस्ता बनिवण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, रस्ता बनविण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच सिंदखेडराजा येथे 100 बेडचे रूग्णालय करण्यासाठी जागा शोधावी. जागा मिळाल्यास तातडीने प्रस्ताव सादर करावा. केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या वास्तूंची कामे करण्यासाठी एकच आर्कीटेक्ट असावा. पुरातत्व विभागाचा प्रस्ताव व यंत्रणांच्या कामांचा प्रस्ताव स्वतंत्र तयार करण्यात यावा. तसेच संग्रहालयामध्ये त्याकाळातील पोषाख, शस्त्रास्त्र यांच्यासाठी दालन करावे. माहितीच्या दालनात परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती असावी. संग्रहालये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असावे. कामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड नसावी. याप्रसंगी राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग, क्रीडा विभाग, एमटीडीसी, नगरपालिका यांचे सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment